Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
 

युद्ध सुरू केलें. पण फिलिपनें या दोघांही लोकांच्या फौजांचा शिरोनिया गांवीं सडकून पराभव केला. अर्थात् जे लोक अनुकूल होते ते होतेच; व जे प्रतिकूल होते ते पराभूत झाले. याप्रमाणें फिलिपचा जम उत्तमच बसला. पराभूत शत्रूंना त्यानें फार उदारपणानें वागविलें. लवकरच सर्व ग्रीक संस्थांची परिषद् भरली व तेथे सर्वानुमतें फिलिप याची "ग्रीस देशाचा सेनापति" म्हणून निवड झाली. लवकरच ग्रीक लोकांचें पर्शियन लोकांशी झुंज सुरू होणार होतें; त्याचें पुढारीपण घेण्याचीही त्याने तयारी दाखविली. पण इतक्यांत या हव्यासी व शूर शिपायाचा खून झाला आणि मोठा जेता होण्याची त्याची मनीषा तशीच राहून गेली.
 पण जें त्याला साधलें नाहीं तें त्याच्या मुलानें करून दाखविलें. शिकंदर लहानपणापासूनच मोठा तेजस्वी होता. आपल्या पाणीदार मुलाकडे पाहून फिलिपला मोठे समाधान वाटे. त्यानें त्याच्या शिक्षणाची फार उत्तम व्यवस्था केली होती. शिक्षकांनींही या वांड मुलाला शिस्त लावण्याची पराकाष्ठा केली. पण रोजच्या रोज बापाच्या पराक्रमाचीं वर्तमानें घरीं येत असल्यामुळें मुलाचें लक्ष मात्र अभ्यासापेक्षां युद्ध विषयाकडेच जास्त लागे. आपण बापासारखे कधीं होऊं असें त्यास होऊन जात असे. फिलिपनें नित्य नवीन विजय मिळवून आज हा परगणा, उद्यां तो परगणा जिंकल्याच्या कथा त्याने ऐकल्या म्हणजे हा अल्पवयी शिपाई म्हणे कीं, "मला हे कांहीं राहूं देणार कीं नाहीं? का आपणच सगळे जग जिंकून टाकणार?" पण ही त्याची चुळबूळ चालू असतांना शिक्षणाचा असा कांहीं क्रम चालूच होता. खुद ॲरिस्टॉटल हा त्याच्या अध्यापकांपैकी एक होता! होमरचें महाकाव्य या गुरूनेच शिकंदरास शिकविलें; पण गुरु कितीही मोठे असले आणि शिकवावयाचीं पुस्तकें फार नामी असली तरी शिष्य हा हटकून अभ्यासी असतो असें थोडेंच आहे! शिकंदरचें लक्ष वर सांगितल्या-