Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६३
ऑलिव्हर क्रॉम्वेल
 

कामें मोठ्या धूर्तपणानें चालू ठेविली. वरचें 'राजशासन' सर्व पार्लमेंटनें मान्य केलें होतें असेंही नाहीं; तरी पण लोकांना आतां कांहीं स्थिरस्थावर व्हावयास हवीच होती व म्हणून अधिकाराच्या सनदशीरपणाचा फाजील हट्ट त्यांनी धरला नाहीं. तिकडे क्रॉम्वेलनें आणखी एक युक्ति योजिली. देशांतील लोकांचें लक्ष दुसरीकडे कोठेतरी गुंतविलें पाहिजे हें त्यानें ओळखलें. म्हणून फारसें कारण नसतां त्यानें एकदां स्पेन देशाशीं व एकदां फ्रान्सशीं युद्धाचा पुकारा केला.
 सुदैवानें क्रॉम्वेलच्या आरमाराने स्पेनच्या आरमाराचा चांगलाच पराभव केला आणि त्यावरील सर्व चांदीचे पाट त्यानें लुटून इंग्लंडास आणिले. इकडे घरीं उरल्यासुरल्या पार्लमेंटशीं क्रॉम्वेल याचीं भांडणे चालूंच होतीं. त्यानें म्हणावें, "नवी स्वारी काढावयाची आहे, पैसा द्या." पार्लमेंटनें म्हणावें, "लोक आधींच गांजले आहेत, पैसा द्या कुठला?" पण इतक्यांत ही लुटून आणलेली चांदी अडतीस गाड्यांवर भरून जेव्हां राजधानीच्या शहरांत वाजतगाजत आली तेव्हां विरोधकांचा विरोध अगदीं वितळला आणि राजकीय वातावरण त्याला सर्वथा अनुकूल असें होऊं लागलें; पण असें झालें तरी राज्यघटनेची एक घडी उसकटून टाकण्यांत त्याला यश आलें एवढेच काय तें खरें व फौजेच्या बळावर आपला अंमल जरी त्यानें सडकून चालविला होता तरी राज्यघटनेची नवीन घडी कोणती याचा जाब त्याचा त्यालाच देतां येण्यासारखा नव्हता. बरें, कांहीं नवीन कल्पावें व बळजबरीनें अमलांत आणावें तर आतां त्याला तें वयाच्या मानानें शक्य दिसेना.
 वयाची पहिलीं त्रेचाळीस वर्षे त्यानें संथ रोजगारांतच घालविलीं होतीं. जवळ जवळ पंचेचाळिशीला आल्यावर तो युद्धाच्या धामधुमीत