Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४३
कोलंबस
 

वारली व त्यास कोणीही वाली नाहींसा झाला. त्याचें वयही बरेंच झालें व हळुहळू अशक्तता येऊ लागली. जवळचें सर्वस्व नाहीं होऊन ब्रह्मस्वाची पाळी आली. संधिवातादि रोगांनीं शरिरांत घर केलें. त्याला स्वतःला अवघ्या पृथ्वीवर आपली म्हणून एक टीचभरसुद्धां जागा राहिली नाहीं. आपल्या मुलास तो काकुळतीनें लिहितो: "माझ्या इनामांपैकीं एक कपर्दिकही मला मिळत नाहीं. मी उचापतीवर जगत आहे. वीस वर्षे मीं हाडांची काडे केली, नवीन पृथ्वी माणसांना दाखविली; पण माझी अशी अंगुळभरही जमीन स्पेन देशांत नाहीं. कोठें तरी भटारखान्यांत तुकडे खातों आणि आतां बिलाचे पैसे कोठले द्यावे म्हणून काळजी मला खाते." अशा आपत्तीत असतांनाच आपलें आटपत आल्याचें त्यास दिसूं लागलें. कागदोपत्रीं जें काय त्याजपाशीं होतें तें सर्वांना यथायोग्य वांटून देऊन श्रद्धाळूपणानें त्यानें देवाची करुणा भाकिली व वयाच्या ७० व्या वर्षी म्हणजे इ. सन १५०६ मे महिन्याच्या २० तारखेस प्राण सोडला.

 पु. श्रे....११