Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१२४
 

दिसत असे. त्याची चालण्याची ढब मोठी ऐटदार होती. चेहरा किंचित् लांबट असून मांसानें लदबदलेलाही नव्हता अगर वाळकाही नव्हता. डोळ्यांखालची हाडे मात्र जरा वर आलेली दिसत. नाक चोंचदार असून डोळे कांहींसे घारे असत. डोळ्यांची भिंगें स्वच्छ आणि लखलखणारी होतीं. एकंदरीनें हा गृहस्थ मोठा रुबाबदार दिसे. पण बत्तिशी पार पडली नाहीं तोंच केंस मात्र शुभ्र पांढरे होऊन गेले होते. कपडालत्ता आणि खाणेपिणें यांत त्याची मिजास म्हणून कांहीं नव्हती. जवळचा असो, परका असो, कोणाशींही बोलत असला तरी मोठ्या प्रेमळपणानें बोले. घरीं मुलांमाणसांशीं त्यानें कधींही खेकसाखेंकशी केली नाहीं त्यामुळे घरींदारीं आनंद असे. तो मोठा श्रद्धाळू होता पण त्याची धर्मबुद्धि तान्त्रिक नसून चित्तांत गूढपणें भरलेली होती.
 लिस्बन येथें असतांना त्यानें न चुकतां प्रार्थनेला जात असावें. त्याच देवळाच्या शेजारीं डोना फिनिपा नांवाची एक मोठी प्रतिष्ठित व उच्च दर्जाची स्त्री रहात होती. हिचा बाप एक मोठा प्रसिद्ध दर्यावर्दी म्हणून लोकांत प्रसिद्ध होता. या स्त्रीचें मन कोलंबसावर बसलें. लवकरच विवाहविधि होऊन त्याला सासूबाईंनीं घरजांवई केलें. हा सर्व योग मोठा चमत्कारिक असा म्हणावयास हवा, कारण कीं, यानें कोलंबसाच्या जीवितहेतूच्या रेषा स्पष्ट झाल्या. त्याला सफरी करण्याचा हव्यास होताच. पण आतां सासूबाईंनीं त्यास प्रोत्साहन दिलें. सासरा वारलाच होता, पण आपल्या हयातीत त्यानें ज्या कांहीं सफरी केल्या होत्या त्यांचे नकाशे इत्यादि सर्व गोष्टी त्यानें फार काळजीपूर्वक राखून ठेवल्या होत्या. सासूनें हे सर्व कागदपत्र जांवयाच्या हवालीं केले व रोज नवऱ्याच्या वेळच्या समुद्रावरील गोष्टी ही बाई त्यास बारकाईनें सांगे. कोलंबसानें आतां समुद्राचे नकाशे तयार करून देण्याचा धंदाच सुरू केला. धंदाच तो झाल्यामुळे घरींदारी दिवसांरात्रीं अष्टौप्रहर त्यानें समुद्राचाच ध्यास घेतला. कोण कोठें