पान:पाकिस्तानचे संकट.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट विचाराची बैठक न सोडतां, परिस्थितीचा पुरा फायदा घेतला असता. स्वराज्याचा पुढील हप्ता पांच वर्षांत मिळवून, योग्य वेळ येतांच स्वातंत्र्यप्राप्तीची सिद्धता करण्याची भाषा टिळक मृत्यूपूर्वी बोलतच असत; आणि, मामुली राजकारणाच्या घडामोडी आपल्या विश्वासांतल्या इतर माणसांवर सोंपवून, स्वतःचे लक्ष वरच्या राजकारणांत गुंतवावें असा विचार त्यांच्या मनांत शेवटी शेवटी घोळतहि होता. भारताच्या राजकारणी नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा गांधीजींनी धरली यांत गैर कांहीं नाहीं. आफ्रिकेंतल्या लढयांत त्यांनी मिळविलेलें यश, त्यामुळे त्यांना लाभलेली आंतरराष्ट्रीय कीर्ति, हिंदुमनाचा कबजा मिळविण्याला अत्यंत अनुकूल अशी त्यांची विचारसरणी व आचारसरणी या सर्व गोष्टींचा समुच्चय त्यांना भारतीय नेतृत्वाकडे खेंचीतच होता. पण, सरकारच्या कारभारांत धोरणाचे सातत्य (Continuity of Policy) असणे जसें अवश्य, त्याप्रमाणेच देशाच्या राजकारणांतहि हे सातत्य शक्य तोंवर टिकविणे अवश्य असतें! 'शठे सत्यं' की 'शठे शाठ्यम्' या शुष्क, शाब्दिक वादांची झुंज टिळकांशी खेळत बसण्याऐवजी, टिळकांच्या खोल राजकारणी बुद्धीचे आकलन करण्याचा व कोणती धोरणे बांधून टिळक राजकारण चालवितात हे समजून घेण्याचा प्रयत्न गांधीजींनी आपलेपणाने केला असता तर, याच खिलाफतीच्या चळवळीचा उपयोग त्यांना उत्तम रीतीने करून घेता आला असता! पण, तसे घडलें नाहीं! 'नक्रः स्वस्थानमाश्रित्य गजेंद्रमपकर्षति' याच तत्त्वाचा आश्रय करून मुसलमानांना आपल्याकडे खेचणे हितावह आहे हे विसरून, गांधीजी खिलाफतीच्या चळवळीमुळे काहीसे बेभान बनले आणि हा मौलवी-मौलानांच्याहि पेक्षा अधिक उत्साहाने ते रान उठवू लागले! .. याचा परिणाम असा झाला की, चळवळ खूप तेजीत आली! पण, नुसतें जळण खूपसें जळून काम भागत नाहीं ! जळण जाळल्यामुळे शिजलें काय. व में शिजलें तें पदरांत कोणाच्या पडलें हेच प्रश्न स्वाभाविकपणे महत्त्व पावतात ! चळवळींत खूप वारा भरल्यामुळे, पुष्कळशा लोकांना 'सैतानी सरकार' नष्टच झाल्याचा भास होऊ लागला. १९२१ साली मलबारांत झालेले