पान:पाकिस्तानचे संकट.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ पाकिस्तानचे संकट पायऱ्या होत. बंडाचा बीमोड करण्यासाठी सैन्य रवाना करणे ही या उपक्रमांतली चौथी पायरी होय. अशा रीतीने रक्तपात झाला, गोंधळ माजला व राज्ययंत्र खिळखिळे झाले की, सात्त्विकपणाचे सोंग उभे करणे ही अखेरची पायरी होय. 'आम्हांला न्यायाची चाड फार; म्हणून इथे आम्ही मोठ्या नाखुषीने राहिलों' असें आकाशांतल्या बापाची आठवण व आळवण करून सांगणे आणि आमचा पाय येथून निघाला तर या ठिकाणी जी दुरवस्था निर्माण होईल तिच्याकडे स्थितप्रज्ञाच्या शांत वृत्तीने पाहणे कोणत्याहि सुसंस्कृत सत्ताधाऱ्याला सहन होणार नाही अशी बढाई मारणे ही या सोंगाच्या बतावणीची अंगे आहेत.) - व्यापार व राजकारण या दोन हेतूंच्या सिद्धयर्थ साऱ्या जगभर पिंगा घालणाऱ्या ख्रिस्ती राष्ट्रांच्या आक्रमक वृत्तीची परिणति कसकशी होते याचे वर्णन वरील अवतरणांत केलेले असून, ब्रिटिश लोकांच्या हिंदुस्थानांतल्या राज्यविस्तारालाहि तें लागू पडते. हिंदु-हिंदूंमधला फुटीरपणा, मुसलमानमुसलमानांमधला वेबनाव, हिंदु-मुसलमानांमधले हेवेदावे यांचा आपल्या राज्यविस्ताराला प्रसंगी किती नामी उपयोग होतो याचा अनुभव, राज्यविस्ताराची चटक लागल्यावर, इंग्रजांना लौकरच येऊ लागला होता. बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांतांचे सुभेदार अलिवर्दीखान व सिराजउद्दौला यांची सत्ता पोखरतांना त्यांना राजा तिलचंद, रायवल्लभचा मुलगा किसनदास व पंजाबी व्यापारी अमीनचंद (बंगाली उमीचंद नव्हे) यांचा पुष्कळच उपयोग झाला होता.* पूर्वभारत पचविण्याची पहिली पायरी म्हणून क्लाइव्हनें त्या भागांत दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली व त्याने सत्ताधारी नबाबाला नामधारी बनविले. या कामी महमद रेझाखान हा क्लाइव्हच्या उपयोगी पडला होता. रेझाखानला निष्प्रभ करतांना वॉरन हेस्टिग्जनें नंदकुमाराच्या खटाटोपी स्वभावाचा भरपूर उपयोग करून घेतला व शेवटी नंदकुमारावरच बालंट रचून त्याने त्याचा कांटा कायमचा दूर केला. या गोष्टी ब्रिटिश सत्तेच्या उत्कर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या असल्या तरी, 'प्रसादचिन्हानि पुरः फलानि' या न्यायाने त्या सूचक आहेत. — वॉरन

  • Rise of the Christian Power in the East, Vol. I, pp. 62-75.