पान:परिचय (Parichay).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्रपाणि । ७७

म्हणून ते गृहत्याग करतात. हीही वैराग्याची प्रवृत्ती आहे. पण स्वस्त्रीविषयी असणारे हे वैराग्य रतिक्रीडेतून परमार्थसाधना करू पाहणाऱ्या परकीया साधिकेशी देहसंबंध ठेवून ऊर्ध्वरेतेपदी नेऊन बसविणाऱ्या तंत्रसाधनेच्या दिशेने जाणारे आहे. एक दिवस तंत्राचार लोककल्याण करू शकत नाही या निर्णयावर चांगदेव राऊळ येतात. इथून ते तंत्रमार्ग तर सोडतात, पण त्याबरोबर सगळी शैव उपासना सोडतात. आणि जीवनाच्या नैतिक पुनर्माडणीसाठी कृष्णप्रधान वैष्णव भक्तिमार्गात येतात. स्वस्त्रीच्या संबंधात जे वैराग्य येते, त्या साधनेच्या कीर्तीतून योगिनी कामाख्या रतिक्रीडेच्या अपेक्षेने यावी, इतकेच घडते. या कामाख्येला पाहून जे वैराग्य येते, तिथून नवा भक्तिमार्ग आहे. वैराग्याची खरी उपासना आणि नैतिकतेचा आग्रह आहे. जुना चांगदेव मेलाच. जो नवा जन्मला आहे, त्या चक्रधरांनी महाराष्ट्राचे धर्मजीवन आणि साहित्य कायमचे ऋणाईत केले आहे.
 त्या शैवांच्या काव्यशास्त्रातून शांतरसाची उदात्त ज्ञानेश्वरी चिखलातून कमळ उगवावे तशी बाहेर पडते. चक्रधररूपाने वैष्णवपरंपरेचा स्वीकार करणाऱ्या या प्रवाहातून दर्शनी शृंगारप्रधान, पण अंतरंगाने भक्तिरसपर्यवसायी अशा वाङमयाला आरंभ होतो. हा भक्तिरस शिशुपालवध वजा जाता उरलेल्या सर्व महानुभाव काव्यांतून सारखा डोके वर काढतो. दामोदर, रवळोव्यास, नारोव्यासही याचे नरेंद्रानंतरचे प्रमुख प्रतिनिधी आहेत. पुढच्या वाङमयात शांतरस आणि भक्तिरस दोन्हींना एकत्रित करणारा भक्तिप्रधानतेचा महापूर येतो. या सगळ्याच संकीर्ण व्यापाराचा अनाग्रही, चिकित्सक, डोळस व सावध असा सर्वांगीण अभ्यास व्हायला पाहिजे. त्याचा आरंभ तेराव्या शतकापुरता ढेरे यांच्या या अपूर्व प्रबंधामुळे होत आहे, असा माझा विश्वास आहे. संस्कृतचे गाढे व्यासंगी. आणि वैदिक परंपराभिमानी पं. बाळाचार्य खुपेरकर आणि महानुभाव वाङमयाचे ज्येष्ठ संशोधक डॉ. कोलते हे दोघेही या प्रबंधाचे परीक्षक होते. या उभयतांनाही एवढी प्रचंड उलथापालथ करणारा हा प्रबंध प्रशंसनीय वाटावा, हीच या प्रबंधाची खरी थोरवी आहे. समोर आलेला पुरावा खोडून दाखवणे अगर मान्य करणे हे दोनच पर्याय ज्यांच्यासमोर असतात, त्या सर्व अभ्यासकांना हा प्रबंध नवी दिशा दाखविणारा वाटेल, याची मला खात्री आहे.



 (चक्रपाणि : डॉ. रा. चिं. ढेरे, प्रस्तावना)