पान:परिचय (Parichay).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्रपाणि । ७१

माहिती देतो; महानुभावेतर लेखकसुद्धा याच पद्धतीने विचार करू लागतात, त्या वेळी हा मुद्दा निर्णायक आहे, असे म्हणणे भाग पडते. महानुभाव आपल्या तिसऱ्या कृष्णाला अवैदिक वैष्णव मानत नाहीत; वैदिक मानतात. चौथ्या कृष्णाला शांकर संन्यासी आणि पुन्हा शैव मानतात. त्या वेळी ते ऐतिहासिक सत्य नोंदवीत आहेत, ही गोष्ट मान्य करणे भाग पडते. विवेकसिंधूत महानुभाव वाङमयाने रुजविलेले शब्द विपुल प्रमाणात सापडतात. या घटनेकडे यापूर्वी आमचे मित्र प्रा. भु. द. वाडीकर यांनी लक्ष वेधलेले होते. त्यांच्या नजरेतुन सुटलेला सर्वज्ञ हा अजून एक शब्द ढेरे यांनी दाखवलेला आहे. जर महानुभाव वाङमय परंपरेचे शब्द विवेकसिंधूत आढळत असतील, जर विवेकसिंधूच्या प्रती महानुभावांनी आपल्याशी निगडित असणारे ग्रंथ म्हणून जतन केलेल्या असतील, जर महानुभाव हरिनाथ आणि चक्रधर एकच मानत असतील, आणि जर महानुभावतरही यालाच दुजोरा देत असतील, तर या घटनेचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. तो म्हणजे हरिनाथ आणि चक्रधर या दोन नावांनी ओळखली जाणारी व्यक्ती एकच आहे. मला स्वत:ला या मुद्दयावर ढेरे यांचे लिखाण निर्णायक वाटते.
 हरिनाथ आणि चक्रधर या दोन नावांनी ओळखली जाणारी व्यक्ती एकच आहे. ही व्यक्तिनिश्चिती आहे. नारायण सूर्याजी ठोसर आणि समर्थ रामदास ही दोन्ही नावे एकाच व्यक्तीची आहेत, ही सुद्धा व्यक्तिनिश्चितीच आहे. पण या व्यक्तिनिश्चितीमुळे आपल्या आजवरच्या समजुतीत कोणती उलथापालथ होणार नाही. तसे हरिनाथ-चक्रधर-ऐक्याचे नाही. हरिनाथ आणि चक्रधर यांचे ऐक्य आपण मान्य केले, म्हणजे चक्रधरांचे शिष्य रामदेव दादोस आणि त्यांचे शिष्य मुकुंदराज, असे मानावे लागते. यामुळे मुकुंदराजांचा काळ शके १११० असण्याचा संभवच नष्ट होतो आणि मग इतर पुरावा लक्षात घेऊन हा काळ ज्ञानेश्वरांच्यानंतर पाचपन्नास वर्षांनी पुढचा गृहीत धरावा लागतो. विवेकसिंधु हा ग्रंथ ज्ञानेश्वरोत्तरकालीन आहे. कालोल्लेखाची ओवी प्रक्षिप्त असल्यामुळे ती प्रमाण नाही. ही बाब यापूर्वी अनेकांनी उजेडात आणली आहे. आता विवेकसिंधु हा ज्ञानदेवोत्तर ग्रंथ म्हणून विचारात घेण्याची अपरिहार्यता निर्माण झाली आहे. मुकुंदराजांच्या या कालनिश्चितीबरोवरच स्थाननिश्चितीचा एक वाद नव्याने निर्माण होण्याचा संभव आहे.
 आजतागायत मुकुंदराज आंबेजोगाईचे की भंडारा जिल्ह्यातील अंभोरचे, एक वाद होता. या वादामध्ये आता नव्याने फलटणचा समावेश होत आहे. फलटण याचे एक नाव अंबापूर हे आहे. तिथे बाणगंगाही आहे. यामुळे अंभोरे, आंबेजोगाई, की फलटण, असा हा प्रश्न निर्माण होतो आहे. अंभोरे पक्षाच्या बाजूने जो पुरावा यक्षदेवआम्नायाचा वृद्धान्वय म्हणून दिला जात होता, तो अंभोरे पक्षाचा पुरावा नसून फलटण ही अंबानगरी आहे, असे सांगणारा पुरावा आहे, हे आता उघड