पान:परिचय (Parichay).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



३. मुडलगीचे स्वामी


धारवाडचे प्रथितयश संशोधक पंडित आवळीकर ह्यांचा 'मुडलगीचे स्वामी' हा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. कर्नाटक विश्वविद्यालय व पुणे विद्यापीठ ह्यांचे संयुक्त प्रकाशन म्हणून ही उपलब्धी झालेली आहे. महाराष्ट्रा- बाहेर महाराष्ट्राच्या अनुसंधानाने मराठी साहित्याच्या अनेक परंपरा पसरलेल्या आहेत. त्यांपैकी मुकुंदराजी परंपरेची मुडलगी मठपरंपरा ही अनेक कारणांनी महत्त्वाची असलेली परंपरा आहे.
संशोधनाच्या क्षेत्रात काही योगायोग असतात. महत्त्वाचे साधनसाहित्य- भांडार उपलब्ध होणे हा प्रकार, असा असतो. त्याबाबत आवळीकर सुदैवी ठरले असेच म्हटले पाहिजे. पण जे दैवगत्या हाती आले त्याचे महत्त्व ओळखणे, साधनांचे संपादन व विवरण करणे, त्यांतून जी माहिती उजेडात

येते तिचे दुवे नीट जुळविणे हा भाग परिश्रमाचा व प्रज्ञेचा असतो. पंडित आवळीकरांचे खरे ऋण ह्याबाबत मानावे असे आहे. एक नवा धागा सर्वांच्या समोर ठेवून त्यांनी मराठीच्या अभ्यासकांना ऋणी केले आहे यात वाद नाही.
सध्या कर्नाटकात असलेल्या बेळगाव जिल्ह्यात मुडलगी हे एक छोटेसे गाव आहे. मराठीचे आद्य कवी मानले जाणारे मुकुंदराज हे, एका महत्त्वाच्या शैव परंपरेचे संत होते. त्यांच्या शिष्य परंपरेतील एक संत सहजबोध परभणी जिल्ह्यातील कुंभकर्ण टाकळी ह्या गावात राहात. ह्या सहजबोधांचे शिष्य रंगबोध ह्यांच्यापासून मुडलगी मठाची परंपरा सुरू होते. ह्या मठाचे स्वामी म्हणून अनेक जण परंपरेने, येथे राहून अध्यात्मचिंतन व धर्मप्रचार करीत आले. त्यांनी ग्रंथरचनाही केली. ह्या