पान:परिचय (Parichay).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२. शक्तिपीठाचा शोध


माझे मित्र रा. चिं. ढेरे हे आता संशोधनाच्या क्षेत्रात नवखे राहिलेले नाहीत. प्राचीन मराठी वाङमयाचे व भारतीय संस्कृतीचे संशोधक, अभ्यासक आणि मीमांसक म्हणून आता त्यांना स्थिर प्रतिष्ठा मिळालेली आहे. त्यांच्या-माझ्या पिढीतील विद्वानांच्या मध्ये तर ढेरे सर्वांत मान्यवर आहेतच, पण हयात ज्येष्ठांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या- इतका चौरस व व्याप असणारा अजून दुसरा मराठीत कोण आहे, हे एकदा तपासूनच सांगावे लागेल. ढेरे यांचे लहान-मोठे कोणतेही पुस्तक असले तरी त्यात काही नवे संशोधन, अनाग्रही, चौरस आणि बारकाईची अशी पुराव्याची मांडणी व थोडी काव्यमयतेकडे झुकणारी भाषाशैली यांचा समन्वय असतोच. आता हेही इतके सरावाचे झालेआहे की, त्यात कौतुकाने सांगावे, अशी नवलाई उरलेली नाही.

ढेरे यांचे संशोधन निर्विवाद आणि बिनतोड असते, असे निदान मी तरी मान्य करणार नाही. वादरहित संशोधन करणाऱ्या अभ्यासकांचा बहुतेक काळ साधने छापण्यात व त्यावर टीपा

देण्यात व्यतीत होत असतो. हेही काम मी महत्त्वाचे मानतो. पण जिथून मीमांसेचा आरंभ होतो, तिथेच विवाद्य-तेचा जन्म होतो, याला इलाज नाही. ढेरे माझ्यासारखे भौतिकवादी नास्तिक नाहीत. त्यांचा पिंड श्रद्धाधारकाचा आहे. पण जेव्हा पुरावा काही निराळेच सांगू लागतो, तेव्हा त्यांचा नाइलाज होतो. गेल्या एक तपात प्रस्थापित मतांना सर्वांत जास्त हादरे त्यांनी दिलेले आहेत. प्रज्ञावंत अभ्यासकाच्या जवळ जमणाऱ्या माहितीचे स्वरूप सुपीक जमिनीत पडणाऱ्या पाण्याप्रमाणे असते. तेथे प्रत्येक थेंब ओलाव्याची नुसती खोली आणि व्याप्तीच वाढवीत