पान:निवडक अंतर्नाद.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिजित काही बोलला नाही. थोडा वेळ तसाच बसून राहिला, पण धुसपुसत उठता आणि शर्ट घालून बाहेर पडला. जाताना दार दाणकन आपटून बंद केलं. पाव घेऊन परत येताना वाटेत त्याच्या कॉलेजमधला दीपक भेटला. त्याच्याशी गप्पा मारत उभा राहिला. बोलताना वेळेचं भान राहिले नाही. अचानक त्याच्या लक्षात आलं, घरी आपली वाट बघत असतील. "चल, जातो रे आता घरी –" असं म्हणून तो वळला आणि त्याचे डोळे भयानं विस्फारले. समोरची बिल्डिंग वाळूचा किल्ला कोसळावा तशी खचत होती. आभाळ फाटल्यासारखा प्रचंड आवाज करत एकेक मजला खाली कोसळत होता. धुळीचे लोट उठत होते. दोन क्षणापूर्वी उभ्या असलेल्या त्या पाच मजली इमारतीच्या जागी आता सिमेंटकाँक्रिटचा ढिगारा दिसू लागला. भोवतालचं सगळं जग थिजून गेल्यासारखं झालं. मातीच्या पुतळ्यासारखा अभिजित तिकडे बघत जागच्या जागी उभा होता. मग एकदम त्याला वास्तवाची जाणीव झाली. "आई - बाबा...” असा आक्रोश करत तो पुढे धावला. कुणीतरी त्याला घट्ट पकडून ठेवलं. "सोडा सोडा मला, माझे आईबाबा तिथं...” अभिजितनं त्या पकडीतून सुटायचा प्रयत्न केला आणि क्षणभर धडपड करून तो खाली कोसळला. पांडेंच्या घरचा फोन वाजला. "हॅलोऽऽ” "साहेब, मी नवरे बोलतोय, साहेब पार्वतीसदन बिल्डिंग कोसळली. ” धापा यकत नवरे सांगत होता. "क्या बकते हो ?" "हो साहेब. खरी गोष्ट आहे आपलं काम चालू होतं ती बिल्डिंग आत्ता दहा मिनिटांपूर्वी कोसळली. मला इस्माईलचा फोन आला. तो समोरच राहतो. " "बापरे ! पक्की खबर आहे ना?" पांडे धीर एकवटून म्हणाले. " हाँ जी. पक्की खबर इस्माईलच्या घरातून बिल्डिंग दिसते, पुरती बिल्डिंग कोसळलीय. आतली सगळी माणसं गाडली गेलीत. " “आता बोलण्यात वेळ घालवू नका. तुम्हाला अटक होण्याची शक्यता आहे. घाई करा. मी तुमच्यासाठी अटकपूर्व जामीन मिळतो का ते बघतो" "हाँ यही ठीक रहेगा." "लगेच निघा. मी इथलं सगळं सांभाळतो. काळजी करू नका, महिना पंधरा दिवसांनी सगळं व्यवस्थित होईल. लोकांची स्मरणशक्ती खूप कमी असते!” - मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब घटनास्थळाला भेट देऊन मदतकार्यांची पहाणी केली. जखमींना एक हजार रुपयांची आणि • मृताच्या नातेवाईकाना दोन हजार रुपयांची मदत जाहीर केली. ह्या दुर्घटनेमागे जे जबाबदार असतील त्यांची कसून चौकशी केली जाईल, कुणाचीही गय केली जाणार नाही, ह्याची ग्वाही दिली. क्षणभर फोनच्या दुसऱ्या टोकाला शांतता होती. "साहेब, तुम्हाला धोका आहे. आपलं काय चाललं होतं ते आसपासच्या लोकांना माहीत आहे. प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता आहे. तुम्ही लगेचच मुंबईबाहेर निघून जा. कुठं कुणाला सांगू नका, मी तिवारीसाहेबांना फोन करून जाताय ते सांगतोय बाहेर जायला.” "आपण कुठल्याच कागदपत्रात गुंतलो नव्हतो. बिल्डिंगच्या जागी आता एक सिमेंटकाँक्रिटचा ढिगारा उरलाय. त्यामुळं आपण पाडापाडी केल्याचा पुरावा सापडणं शक्य नाही. चिंता नको." "गॉड इज ग्रेट!” पांडेंच्या जिवात जीव आला. पार्वतीसदनच्या ह्या शोकांतिकेनं सारी मुंबई हादरली. वर्तमानपत्रांना हेडलाईन मिळाली. साप्ताहिकांना कव्हरस्टोरी मिळाली. टीव्ही चॅनेल्सना 'ह्यूमन अँगल' वाले विषय मिळाले. पडलेल्या इमारतीचे, त्याखाली दबल्या गेलेल्या माणसांचे फोटो... इस्पितळात हातपाय गमावून विव्हळत पडलेल्या जखमींच्या मुलाखती घेण्यास गर्दी उसळली. पंचवीस वर्षं जुनी इमारत पडतेच कशी? ह्या विषयावर चर्चा झाल्या वर्तमानपत्रात पत्रे आली. महिन्याभरात निवडणुका जाहीर झाल्या आणि हा विषय मागे पडला, पार्वतीसदन नावाची एखादी बिल्डिंग होती हे लोक विसरून गेले. 0 दोन महिन्यांनंतरच्या एका रात्री शंकरनिवासमध्ये राहणाऱ्या उमराणींच्या दारावरची घंटा वाजली. उमराणी कुटुंब टीव्ही बघत बसलं होत. "कोण आलंय ह्या अवेळी," असं पुटपुटत उमराणींनी दार उघडलं. बाहेर दोघंजण उभे होते. एकाने सफारी सूट घातला होता. दुसरा पांढऱ्या शुभ्र शर्टपँटमध्ये होता. "तुमच्याकडे थोडं काम होतं, साहेब आत येऊ का?" सफारीसूट घातलेला माणूस अदबीनं उमराणींना विचारत होता, "तुमच्या ह्या जागेबद्दल बोलायचं ह्येतं...” (जुलै १९९६) निवडक अंतर्नाद ९१