पान:निवडक अंतर्नाद.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाटचाल सव्वीस वर्षांची गेल्या वर्षीचा अंतर्नादचा सव्विसावा दिवाळी अंक हा अखेरचाच अंक होता. मागील पंचवीस वर्षांतील काही निवडक लेखनाचा समावेश असलेला दुर्दैवाने तो प्रकाशित झाला तेव्हा कोविडच्या साथीमुळे अवतीभवतीचे सगळेच जीवन झाकोळून गेले होते, त्यामुळे तो अंक आमच्या गावोगावी विखुरलेल्या काही जुन्या वाचकांपर्यंत आणि वाचनालयांपर्यंत पोहोचू शकला नव्हता. शिवाय पुष्कळ उत्तम लेखने अंकात समाविष्ट करता आली नव्हती. त्या काळात प्रवासावर असलेल्या बंधनांमुळे इतर काही हितचिंतकांशी फारशी काही चर्चाही होऊ शकली नव्हती. सगळेच जरा अनिश्चिततेच्या सावटाखाली आणि घाईघाईत झाले होते. बऱ्याच वाचकांनी त्यावेळी अशी इच्छा प्रदर्शित केली होती की मासिक किंवा दिवाळी अंक या स्वरूपात अंतर्नाद यापुढे निघणार नसला तरी, अंतर्नादमधील निवडक लेखनाचे चार पाच खंड दीर्घकाळ संग्रही ठेवता येतील अशा स्वरूपात (कलेक्टर्स आयटम म्हणतात तसे) प्रकाशित करावेत, तसे पाहिले तर अजूनही कोरोनाचे संकट पुरते दूर झालेले नाही; पण केव्हातरी हे करायलाच हवे या दृष्टीने चार-पाच नाही तरी निदान एका खंडात निवडक अंतर्नाद हे संकलन प्रकाशित करत आहोत. संकलनाच्या प्रतीही अगदी मोजक्या छापल्या आहेत. पाचशेहून अधिक पृष्ठे, नॅचरल शेडचा मॅपलिथो कागद, पुठ्ठाबांधणी वगैरे असूनही व्यापारी रूप लाभू नये म्हणून कुठल्याच जाहिराती संकलनात घेतलेल्या नाहीत, तरीही किंमत शक्य तितकी कमी ठेवली आहे. ज्यांनी वर्षांनुवर्षे आम्हाला सोबत केली त्यांना आठवण म्हणून हे संकलन संग्रही ठेवता यावे हाच खरेतर या मागचा उद्देश आहे. ऑगस्ट १९९५ मध्ये अंतर्नाद मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला ते दिवस आजही डोळ्यापुढे स्पष्ट दिसतात. त्याच्या आधीचीच दहा-पंधरा वर्षे, साधारण १९८०-८५ पासूनच, मराठी मासिकांची पडझड सुरू झाली होती. तशा परिस्थितीत नवे साहित्यिक मासिक सुरू करणे आणि तेही पूर्णवेळाचे काम म्हणून करणे हे अवाजवी धाडस ठरेल असे अनेक मित्रांनी त्यावेळेलाही सांगितले होते. वृत्तपत्रांतूनही साहित्यापेक्षा राजकारण, मनोरंजन व इतर चटपटीत आणि मुख्य म्हणजे आटोपशीर लेखनालाच स्थान मिळत होते. लिह्यवेसे वाटते, पण ते प्रकाशित कुठे करायचे, हा प्रश्न अनेक लेखकांना सतावत होता. अशा परिस्थितीत एखाद्या चांगल्या व्यासपीठाची नितांत गरज आहे हे लक्षात घेऊन, समोर उघड उघड दिसणाऱ्या अनेक अडचणींवर मात करायच्या जिद्दीने अंतर्नाद सुरू झाले होते. ६ निवडक अंतर्नाद संपादकीय

'अंतर्नादची दशकपूर्ती थोडे प्रकट चिंतन हे ऑगस्ट २००५ अंकाचे संपादकीय या संकलनात पुनर्मुद्रित केले आहे. ते वाचताना जाणवते की त्यावेळच्या सर्व अडचणी पुढेही कायमच राहिल्या; किंबहुना अधिकच बिकट होत गेल्या. नुसती रिमोटची कळ दाबताच घरबसल्या उपलब्ध होणाऱ्या रंगीबेरंगी वाहिन्या, प्रत्येकाच्या हातात पोचलेल्या मोबाइलचा अखंड वापर, मराठी भाषेची सातत्याने होत गेलेली हेळसांड लाखाच्यावर पगार घेणाऱ्यांचीही मासिकाची वर्गणी भरायची तयारी नसणे, तरुणवर्ग अन्य जीवनक्षेत्रांकडे आकृष्ट होऊन वाचनाबद्दल कमालीचा उदासीन बनणे, वाचकांचे तसेच लेखकांचेही वाढत चाललेले सरासरी वय अशा अनेक अडचणी, आणखी एका अडचणीचा उल्लेख करायला हवा. या काळात संभाव्य वाचकापुढे अनेक आकर्षक पर्याय सहजगत्या उपलब्ध होत गेले. त्याला खिळवून ठेवायचे असेल, तर त्याच्या अधिक खोलवरच्या आंतरिक गरजा भागवणारे साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक होते. ते कुठून मिळवायचे हा या काळात अगदी कळीचा असा प्रश्न बनत गेला, उत्तम लिहावे आणि साहित्यक्षेत्रात नाव कमवावे अशी आस असणारे वेगवेगळ्या जीवनक्षेत्रातले प्रतिभावान तरुण पुढे फारसे दिसेनासे झाले. लेखकाचे - व एकूणच साहित्याचे समाजातील एकेकाळचे अग्रस्थान झपाट्याने ढळत गेले. अगदी आपल्या नातेवाईक व मित्रपरिवाराकडे, शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे नजर टाकली तर हे वास्तव कोणालाही कबूल करावे लागेल. परिणामतः मासिकांचा प्राणवायू मानता येईल अशा कसदार लेखनाचा स्रोत, पूर्ण आटलेला नसला तरी, काळाच्या ओघात बराच आक्रसत गेला आहे. तसे पाहिले तर अंतर्नादमध्ये लेखन केलेल्या नवोदित तसेच नामांकित लेखकांची यादी खूप मोठी होईल, अंतर्नादला चोखंदळ वाचकवर्गही लाभला होता. साहित्यविषयक पुरस्कार देणाऱ्या जवळजवळ सर्वच प्रमुख संस्थांचे अनेक पुरस्कार अंतर्नादला मिळाले होते. समीक्षकांनी व वृत्तपत्रांनीही अंकाची वेळोवेळी विस्तृत दखल घेतली होती. थोडेफार नावही झाले होते आणि ह्याचाही आनंद नाही म्हटले तरी होताच, पण हे सारे असूनही खोटा आत्मविश्वास जोपासणे आणि सर्व काही आलबेल होते असा शहामृगी पवित्रा घेणे ही आत्मवंचना ठरेल. कारण अंतर्नादच्या वर्गणीदारांची संख्या अडीच हजारापुढे कधीच जाऊ शकली नव्हती, स्टॉलवरील किरकोळ विक्री फारशी होत नव्हती आणि जाहिरातीदेखील फारशा मिळत नव्हत्या. या जाहिरातीही ज्यांच्याकडून अपेक्षा होती