पान:निवडक अंतर्नाद.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाडे दत्ता दामोदर नायक एक संवेदनाक्षम लेखक झाडांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधू लागतो, त्यांच्याशी मैत्र जोडतो आणि मग तीही त्याच्याशी आपुलकीने बोलू लागतात. प्रत्येक झाडाचे वेगळे टवटवीत सौंदर्य त्याला जाणवू लागते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांप्रमाणेच झाड हे सहावे महाभूत असे तो मानू लागतो. झाडांचे आणि माझे नाते हल्ली हल्लीपर्यंत दूरस्थ होते. झाडे सर्वप्रथम मला लहानपणी गोष्टींतून भेटली, पंचतंत्रातील माकड आणि मगरीच्या गोष्टीतून जांभळाचे झाड भेटले. पुराणांतल्या कृष्ण, सत्यभामा आणि रुक्मिणीच्या कहाणीतून पारिजातकाचे झाड भेटले. य. गो. जोशींच्या कथेतून शेवग्याच्या झाडाची ओळख झाली. वेताळपंचविशीत राजा स्मशानात वडाच्या झाडावर उलटे टांगलेले प्रेत आणायला जातो, तेव्हा प्रेतातला वेताळ जागा होतो हे वाचून झाडाविषयी गूढ वाढत चालले. कथा- कहाण्यांतली झाडे माणसाशी बोलणारी होती. सावत्र आईने उखळात ठेचून मारून परसात पुरलेल्या मुलीच्या कथेत ती कडुलिंबाच्या झाडाच्या रूपाने बोलत होती. पुढे विज्ञानात झाडांचे वनस्पतिशास्त्र शिकलो. झाडे हवेतला कर्बवायू शोषण करून हवेत प्राणवायू सोडतात. झाडांची मुळे जमिनीतले पाणी शोषतात आणि झाडांची पाने ह्या पाण्याचा हवेत उत्सर्ग करतात, म्हणून पाऊस पडतो हे शास्त्र शिकलो, नंतर एकदा आर्किटेक्ट चार्ल्स कोरिआ यांनी मला झाडांविषयी एक दंतकथा सांगितली. खूप खूप वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर लाखो झाडे होती. ही झाडे हवेतला कर्बवायू शोषण करून हवेत प्राणवायू सोडत होती. त्यामुळे हवेतल्या प्राणवायूचे 'प्रदूषण वाढल्याचे झाडांच्या लक्षात आले. मग झाडांमधल्या पर्यावरणवादी झाडांनी 'पृथ्वी बचाव समिती' स्थापन केली. या समितीने पृथ्वीवर जाणीवपूर्वक अधिक माणसांची 'लागवड' केली. त्यामुळे पृथ्वीवरील लोकसंख्या वाढली. हवेतला कर्बवायू वाढला. प्राणवायूचे प्रदूषण कमी झाले. अशा रीतीने पृथ्वीवरील लोकसंख्यावाढीचे श्रेयही ही दंतकथा झाडांना देते ! पृथ्वीवर झाडे नसती तर पृथ्वी वैराण झाली असती, हैराण झाली असती. झाडे नसलेल्या पृथ्वीला काळाने भस्मसात केले असते. याची समज मला विज्ञानाने दिली. त्यानंतर झाडे प्रवासात भेटली. धावत्या गाडीच्या खिडकीतून मागे पडणारी झाडे मी पाहिली. डोंगरावरून, जंगलातून फिरताना सभोवतालची गच्च, भरगच्च झाडे पाहिली. देशविदेशांत फिरताना ६६ निवडक अंतर्नाद विविध प्रकारची पानझाडे, फुलझाडे, फळझाडे पाहिली. पावसाळ्यात भिजून ओलीचिंब होणारी, हिवाळ्यात गोठणारी आणि उन्हाळ्यात फुलून फुलभारित होणारी झाडे पाहिली, तरी झाडांचे आणि माझे नाते जवळकीचे झाले नाही. ते दूरस्थच राहिले. हल्लीच मी शेतकरी झालो. सह्याद्रीच्या पायथ्याशी मांडवी नदीच्या किनारी पंचवीस एकरांची सुपीक बागायती जमीन विकत घेतली. या जमिनीत माड, पोफळी, काजू, आंबे, फणस, केळी अशी झाडे आहेत. ज्या गावात ही बागायती जमीन आहे. त्या गावाचे नाव सांगोड तिथे मी सेंद्रिय पद्धतीने लागवड करू लागलो. या बागायतीत झुळझुळत्या नदीच्या जवळच मी लाल चिऱ्यांचे एक फार्महाऊस बांधले. त्याचे नाव ठेवले 'सांतेर', सांतेर म्हणजे वारूळ. हा एक अर्थ. पण सांतेर ही गोव्याची आद्य भूदेवता, कृषी देवता हा दुसरा अर्थ. बागायतीत मी झाडांमध्ये आंतरपिके म्हणून स्थानिक भाज्यांची लागवड केली. भाज्यांचे मळे फुलले. सगळा परिसर हिरवागार दिसू लागला. झाडांना आता मी मुळांपासून शेंड्यापर्यंत ओळखू लागलो. झाडांशी आता मी बोलू लागलो. झाडेही आता माझ्याशी बोलू लागली. झाडांशी आता मी एकजीव झालो. झाडांशी माझे नाते आता अंतर्बाह्य बदलून गेले. ऋतुचक्रातले झाडांचे सांकेतिक इशारे मला कळू लागले. झाडांच्या पानांचे बदलते रंग, झाडांना येणारा मोहोर, त्यांना येणारा फुलांचा बहर, त्यानंतरचा फळांचा भार, झाडांची पानगळ, त्यांची निष्पर्णता, झाडांची जमिनीवर येणारी हताश मुळे आणि झाडांचे उन्मळून जाणे... हे सगळेच माणसाच्या जिण्यासारखेच आहे असे मी मानू लागलो. आकाश, प्रकाश, वारा, पाणी आणि पृथ्वी ह्या पंचमहाभूतांप्रमाणेच झाड हे सहावे महाभूत असे मी मानू लागलो. झाडांतून निसर्ग बोलत असतो. झाडे ही निसर्गाची चित्रलिपी आहे, रंगबोली आहे. झाडे ही रोपांच्या मूक भाषेतील विरामचिन्हे आहेत असा भास, आभास मला होऊ लागला. काही वर्षांपूर्वी मी अलास्काला गेलो होतो. तिथल्या बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांनी माणूस आणि निसर्गातील झाडे व प्राणी यांमधले द्वैत कधीच मानले नाही. गोव्यातही