पान:निवडक अंतर्नाद.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करकरणाच्या झडपांच्या खिडकीतून धूळच धूळ पाहत राहणं. कोणत्याही वाटेवर धुळीत लोळणारी गाढवं, गल्लीबोळांतून तुरुतुरु धावणारी डुकरं, झाडांना पानांसारखे लगडलेले कावळे. सकाळी सकाळी बंद गिरणीतले बेकार मजूर चौकातल्या माणसांच्या बाजारात स्वत:ला विकून घ्यायला टपलेले, वाढलेल्या दाढ्या, मळलेली पटकुरं, त्यांच्या केसांमध्ये शहराची धूळ. दिवसाचा बराच काळ सुत्र पडलेलं स्टेशन अन् रात्री छातीत कळ यावी तसली शिट्टी फुंकणारी मालगाडी. संध्याकाळी गिधाडासारखं झेपावत येणारं आभाळ, रात्रीच्या निर्जन रस्त्यांची झिंगलेली बरळणी, रातराणीचा हिंस्र गंध. भिंतीवरून सरकणाऱ्या पालींपासून वाचवीत रात्रभर जागत राहून पहाटे पहाटे पालींवर पाली पाहत चुरगळलेल्या शरीराला सकाळ होताच हौदातल्या करवती पाण्याच्या स्वाधीन करणं आणि धमकावल्यासारख्या स्तब्ध चेहऱ्यांच्या घोळक्यात शिरणं. लायब्ररीतल्या पुस्तकात एखाद्या क्षणाची शांतता शोधणं, उन्हात वाळत घातलेल्या कसरीनं खाल्लेल्या 'एनकाउंटर' च्या अंकांना चाळणं, वर्गात लक्ष नसलेल्या मुलांना बेकेट अन् आयनेस्को सांगणं, बाकांवर उगवलेल्या चेहऱ्यांवरचा अबोधपणा वाचणं, दुपारी दोन वाजता बाबूभाईंच्या मुकाट खाणावळीतून जेवून मरून गेल्यासारखं झोपणं, संध्याकाळच्या अस्वस्थ उजेडात पांढऱ्या कागदांवर पिळवटल्यासारख्या काळ्या रेघा ओढणं, जाळीजाळीच्या घरांपुढच्या खोल खड्ड्यातल्या नळांचं पाणी भरून देवीसारख्या वर येत असलेल्या मुली पाहणं, हीच होती कविता जी मला लिहीत होती धुळीनं भरलेल्या शहराच्या कागदावर हिंगणघाटसारख्या कुग्रामातील शंकर लॉज ही धूळ भरली इमारत – जिच्याशी वाचकांना काही देणे घेणे नाही - कवितेतही तिचा नामोल्लेख येत नाही, पण तेथील नीरस वास्तवात कवीला काव्य जाणवत आहे. ते नेमके काय आहे हे त्यालाही समजलेले नसावे, म्हणून तो तेथील तपशील नोंदतो आहे. तपशिलांना दिलेल्या उपमांतून निवेदकच नोंदला जातो आहे. म्हणूनच त्याला वाटते आहे हीच होती कविता जी मला लिहीत होती धुळीनं भरलेल्या शहराच्या कागदावर. ते अनाम काव्य कवीच्या स्मृतीत 'शंकर लॉज, हिंगणघाट आहे म्हणून तेच कवितेचे नाव झाले आहे आणि त्या तपशिलांतील काव्य वाचकांना प्रतीत करून देत आहे. थोड्याच कवितांची शीर्षके, त्या कवितेला काय सांगायचे आहे किंवा सुचवायचे आहे ते अधोरेखित करीत असतात. द. भा. धामणस्करांची एक कविता आहे : यापुढचं जीवन पुस्तकाचं नाव: 'यापुढचं जीवन' ते आहे मूलतः प्रेमाविषयी, मनाच्या हळुवारपणाविषयी सर्वच चराचराच्या संदर्भात ते तिने वाचून परत केलं तेव्हा कव्हराची SS दुर्दशा झालेली; पानं एखाद्या झंझावातानं हाताळल्यासारखी जागोजाग फाटलेली आणि त्यांना गुण्यागोविंदानं नांदवणारं सूत्र, जणू गृहकलहाला कंटाळून घराबाहेर पडलेलं. मुद्दाम शोध घेतला तर हळुवारपणा भरलेल्या पानांनीच नेमकं गठ्यानं पलायन केलेलं. तरीही मातीत खेळून आलेल्या मुलाला आईने आंघोळ वगैरे घालून पूर्वीचा स्वच्छ चेहरामोहरा द्यावा तसा मी नवे कव्हर घालून पुस्तकाला सुभग चेहरा देतो. त्यावर एवढ्या पडझडीनंतर पुस्तकानेच स्वतःचे नाव विसरू नये म्हणून जुन्याच हळुवारपणे, माझ्या पुस्तकाचे नाव परत कोरतो: 'यापुढचं जीवन, 'यापुढचं जीवन' हे या कवितेतील पुस्तकाचे नाव आहे. पण हे हळुवार प्रेमाचे पुस्तक तिच्याकडून परत येते, तेव्हा त्यातील हळुवारपणा भरलेली पानेच निखळून नाहीशी झालेली असतात. निवेदक पुस्तकाची डागडुजी करून कव्हरवर पुस्तकाचे नाव परत कोरतोही. पण आता ते केवळ पुस्तकाचे नाव राहत नाही. तिच्या या वागणुकीमुळे निवेदकाचेच यापुढचे जीवन असे प्रेमहीन झालेले आहे आणि हेच नेमके या कवितेच्या शीर्षकाने अधोरेखित केलेले आहे. थोड्या कविता अशाही असतात, ज्यांचे संदर्भ त्यांची शीर्षके स्पष्ट करतात आणि हे संदर्भच कविता उलगडून दाखवतात. मात्र कविता संपली की कटाक्षाने टाकावे घालून तिच्याखाली आपले नाव घराचे दार लावल्यावर कुलूप घालावे तसे निवडक अंतर्नाद ५७