पान:निवडक अंतर्नाद.pdf/५१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

‘अंतर्नाद' म्हणजे... समृद्ध साहित्यसृष्टी वाचकांना सुसंस्कृत करू पाहणारी सकारात्मक जीवनदृष्टी सर्वस्पर्शी रसिकतेचा अनाहत नाद आधुनिक, सर्जनशील आणि सौंदर्योपासक समाजनिर्मितीचा निरंतर ध्यास सकस मराठी साहित्याचा दुर्मिळ खजिना. जणू सूपभर लाह्यात दडलेला एकच बत्तासा... आणि 'निवडक अंतर्नाद' म्हणजे... प्रेयसीच्या आर्ततेनं प्रत्येक नव्या अंकाची वाट पाहणाऱ्या वाचकांचं कायमच्या वियोगाचं दुःख थोडं हलकं करणारी मर्मबंधातली ठेव... विवेक सावंत, चीफ मेंटॉर, एमकेसीएल (महाराष्ट्र ज्ञान महामंडळ)

गेली सव्वीस वर्षे अंतर्नादने मराठी वाचकाच्या मनाची मशागत केली. त्याची संवेदनशीलता तरल केली. वाचकाला ३६० अंशांच्या कक्षेतून फिरवत त्याच्या साहित्यिक जाणिवेची क्षितिजे विस्तृत केली. अंतर्नादने कुठलाच विषय वर्ज्य मानला नाही. भाषेपेक्षा साहित्य आणि साहित्यापेक्षा जीवन श्रेष्ठ असते याचे भान अंतर्नादने ठेवले. दत्ता दामोदर नायक, साहित्यिक आणि उद्योजक आमच्या जाणिवा समृद्ध करण्याचे काम अंतर्नादने सव्वीस वर्षे केले. यास्मिन शेख यांच्यासारखा व्याकरण- सल्लागार असणारे अंतर्नाद हे बहुधा एकमेव मराठी मासिक असावे. भानूदा व वर्षाताई यांची सांस्कृतिक समृद्धीची कल्पना नुसते वैभवशाली गतकाळाचे स्मरणरंजन करीत राहणारी नव्हती; तर ती वर्तमानातील चांगुलपणा टिपत आशादायी भविष्यकाळाचा वेध घेणारी होती. चंगळवाद व तुच्छतावाद यावर हा उतारा आहे. हे करण्याचे दोन मार्ग भानुदांसमोर होते. लेखन व संपादन. त्यांनी हे दोन्ही मार्ग चोखाळले. पण हे करताना त्यांच्यातील संपादकाने लेखकावर थोडीफार मात केली. बहुधा हा अन्याय दूर करण्यासाठी अंतर्नादने पूर्णविराम घेण्याचे ठरविले. अर्थात भानुदा आपल्याला त्यांच्या पुस्तकांमधून भेटत राहणारच आहेत. अनिल जोशी, पॅथोलॉजिस्ट सांस्कृतिक अभिरुचीच्या विकासप्रक्रियेत नियतकालिकांचा मोठा वाटा असतो. या संदर्भातले अंतर्नादचे श्रेय नोंदवायला हवे. अंतर्नादचा कालखंड हा दोन शतकांचा संधिकाल होता. त्या कालखंडातील आव्हाने ओळखून संपादकांनी परंपरेतील सत्त्वांश वेचलेच, पण त्याचबरोबर बदलत्या भविष्याचा वेध घेणारे लेखनही सामावून घेतले. विविध सदरांची योजना, मुखपृष्ठ, मांडणी यांतून प्रगट झालेली संपादकीय दृष्टी कलात्मकतेची जपणूक करतानाच जीवनाभिमुखही राहिली. भाषा, साहित्य आणि इतर कला या घटकांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंती कशी जपायची, याची जाणीव भानू काळे यांना होती. त्यामुळे अंतर्नादला स्वतःचा अमीट ठसा उमटवता आला. - नीलिमा गुंडी, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक ५१२ निवडक अंतर्नाद