पान:निवडक अंतर्नाद.pdf/४८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असे काय असणार? पण एका खवचट पत्रकाराने त्याची 'बातमी' कशी केली पाह्य त्याने पोपना आल्या आल्या प्रश्न विचारला, "न्यूयॉर्कमधल्या वेश्यावस्तीला आपण भेट देणार का?” (“Do you plan to visit New York's red light area?") पोपनी निरागसपणे विचारले, "न्यूयॉर्कमध्ये वेश्यावस्ती आहे ?" ("Is there red light area in New York ?”) झाले, दुसऱ्या दिवशी या पत्रकाराने दिलेल्या बातमीचा मथळा होता : "न्यूयॉर्कमधल्या वेश्यावस्तीची पोपकडून चौकशी” (“Pope enquires about New York's red light area") तांत्रिकदृष्ट्या सत्य, पण प्रत्यक्षात पूर्ण विपर्यस्त ! 'खास बातमी' ('स्कूप) मिळवण्यासाठी वृत्तपत्रे काय काय उपद्व्याप करतात यावर मीट जॉन डो (Meet John Doe) ह्य गॅरी कूपर व बार्बरा स्टॅनवाइक यांच्या भूमिका असलेला सुरेख चित्रपट फ्रँक काप्राने बऱ्याच वर्षांपूर्वी बनवला होता. (अमिताभ बच्चन आणि शबाना आझमी यांच्या भूमिका असलेले या चित्रपटाचे 'मै आझाद हूं' हे हिंदी रूपांतरही नंतर आले होते.) एका पत्रकार तरुणीची नोकरी तिने एखादा 'स्कूप मिळवण्यावर अवलंबून असते, पण खूप प्रयत्न करूनही तिला खास काही सापडत नाही. मग ती एक काल्पनिक बातमी तयार करते, दुःखाला आणि अन्यायाला कंटाळलेला 'जॉन डो' नावाचा एक तरुण अमुक अमुक तारखेला जाहीर आत्महत्या करणार आहे, अशी. वाचकांमध्ये प्रचंड खळबळ माजते. वातावरण तापत जाते. त्याच्याविषयी रोज काही ना काही सनसनाटी (अर्थात काल्पनिक) छापले जात असल्याने त्या बातमीचा 'टेंपो' वाढत जातो, वृत्तपत्राचा खपही गगनाला भिडतो. राजकारणासाठीही या बातमीचा उपयोग केला जातो. संपादक पत्रकारावर खूश होतात. पण जसजसा प्रत्यक्ष आत्महत्येचा दिवस जवळ येऊ लागतो, तसतशी तिची अवघडल्यासारखी परिस्थिती होत जाते ही काल्पनिक व्यक्ती आता आत्महत्येसाठी प्रत्यक्षात कुठून आणायची? मग पैशाचे आमिष दाखवून ती एका गावठी बेकार तरुणाला तयार करते 'जॉन डो' म्हणून पुढे येण्यासाठी आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाचे तरी भले होईल या आशेने तो तयार होतो. पण पुढे 'जॉन डो' विषयीच्या सहानुभूतीची एवढी मोठी लाट उसळते, देशभर इतके 'जॉन डो फॅन क्लब्ज्' तयार होतात की ते लोकप्रेम बघून या नकली 'जॉन डो'चे 'हृदयपरिवर्तन' होते; म्हणजे, केले जाते. - 'खास बातमी' चा मोह माध्यमांना कुठल्या कुठे घेऊन जातो! असे 'स्टंट्स' जेव्हा क्वचित कधी केले जातात तेव्हा जगण्याच्या एकूण व्यामिश्र पसाऱ्यात ते खपून जाते. पण जर ते सतत व्हायला लागले तर एक मोठा धोका संभवतो 'लांडगा आला रे आला' अशी गत होऊन त्यातून माध्यमाची एकूण विश्वासार्हताच नाहीशी व्हायचा. तसे झाले तर मग एक दिवस कुठल्यातरी कारणाने खराखुरा लोकक्षोभ होईल, लोक कधी काळी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरतील, तेव्हा त्या खऱ्या आंदोलनाचे चित्रणही व्यापक समाजाला पेटवून उठणार नाही; त्या चित्रणालाही स्टंट समजून लोक आपापल्या घरी स्वस्थच बसून राहतील. भावनांच्या या निबरीकरणाचे कलात्मक चित्रण आपल्याला सुप्रसिद्ध हिंदी कथालेखिका सूर्यबाला यांच्या एका कथेत आढळते. (मराठी अनुवाद : 'जीजी आणि रिमोट', अंतर्नाद, जुलै २००६) आपल्या घाईगर्दीच्या दैनंदिन प्रपंचात म्हाताऱ्या आईने एकसारखी लुडबुड करू नये म्हणून मुलगा तिच्या खोलीतच एक स्वतंत्र टीव्ही घेऊन देतो. तिथे सतत टीव्ही बघत ती आपला वेळ काढू लागते आणि मग हळूहळू केवळ घरच्यांपासूनच नव्हे, तर एकूण जगण्यापासूनच तुटते. टीव्हीवरचे जग हेच जणू तिचे वास्तव जग बनते. जेव्हा शहरात खराखुरा दंगा सुरू झाल्याची बातमी तिला तिचा नातू धावत धावत जाऊन कळवतो, तेव्हा तिला त्या घटनेचे गांभीर्य जाणवतच नाही; जणू टीव्हीवरचाच तो एक कार्यक्रम होता, आणि काय घडते ते तिला आधीच ठाऊक होते, अशी तिची यांत्रिक प्रतिक्रिया होते. दृक्श्राव्य माध्यमाचे सामर्थ्य एवढे असते, की कळत- नकळत आपल्या दैनंदिन जगण्यावर त्याचा प्रभाव पडतच असतो. मोठमोठे नट आपल्या पडद्यावरच्या प्रतिमेचे कैदी बनतातच, पण आपल्या सगळ्यांचेच वागणे वेगवेगळ्या प्रतिमांवर बेतले जाऊ लागते – मयताला पांढरे कपडे, मैफलीला सुरवार-कुर्ता आणि वीकएंडला जीन्स-टीशर्ट हे प्रतिमांनुरूपच ठरले असते. देव गोरेगोमटे आणि राक्षस काळे केसाळ हेही माध्यमप्रतिमांनीच निश्चित झाले आहे. कार्यकर्त्याची शबनम आणि उद्योगपतीचा चिरूट, 'गांव की गोरी' आणि 'बल्ले बल्ले' याही माध्यमप्रतिमाच. समाजात प्रत्यक्ष वावरतानाही आपल्या वेगवेगळ्या लोकांविषयी वेगवेगळ्या प्रतिमा बनलेल्या असतात व त्यानुसारच आपण एकमेकांशी वागत असतो; त्यालाच तर पूर्वग्रह म्हणतात. ते दूर सारून एकमेकांना भेटतो, प्रतिमा बाजूला सारून प्रत्यक्षाला भेटतो, तेव्हाच एकमेकांची खरी भेट होते, 'अद्भुत' प्रतिमा केवळ भडक चित्रणातूनच निर्माण होतात असे नाही, तर घाईघाईने व्यापक निष्कर्ष काढण्याच्या माध्यमांच्या प्रवृत्तीतूनही त्या निर्माण होतात. उदाहरणार्थ, माध्यमांनी केलेल्या वेगवेगळ्या लोकमतचाचण्या तरुणांमधील सर्वांत लोकप्रिय राजकारणी कोण' इथपासून ते 'विवाहबाह्यसंबंधांचे प्रमाण कुठल्या शहरात सर्वाधिक आहे' इथपर्यंत कुठल्याही विषयावरची ही सर्वेक्षणे असतात. अत्यंत अपुऱ्या पाहणीवर ती आधारित असल्याने त्यांचे निष्कर्षही फसवेच असतात; पण वाचकांना मात्र काहीतरी 'महत्त्वाची' माहिती मिळाल्यासारखे उगाचच वाटते. एखादी निवडणूक भा. ज. प. ने जिंकली की लगेच 'हिंदुत्वाची नवी लाट' ही मुखपृष्ठकथा बनते आणि एखाद्या दुय्यम गुंडाच्या कथित वक्तव्यावरून 'सिनेसृष्टीवर माफियाचा कबजा' हा निष्कर्ष निघतो! सरधोपट मतांना (जनरलायझेशनला) काही सीमाच नसते. कुणीतरी म्हटले आहे : "आजचे पत्रकार दोन सायकलस्वारांच्या टक्करीवरून थेट संस्कृतीच्या विनाशावर येतात!" ("Modern journalists often confuse the collision of two cyclists with the collapse of civilization!") निवडक अंतर्नाद •४७९