पान:निवडक अंतर्नाद.pdf/४७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हे सारे कशासाठी? जागतिकीकरणाच्या रेट्यात आपली अस्मिता, आपले 'स्व'त्व सांभाळण्यासाठी आपापल्या मातृभाषेचे संवर्धन करणे अधिकच निकडीचे बनले आहे. आपला मराठीचा अभिमान गैर किंवा अवाजवी मुळीच नाही. एखादी भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार भाषांचा अनुक्रम लावायचे ठरवले, तर मराठी भाषेचा क्रमांक जगात बारावा लागेल व म्हणूनच केवळ संख्याबळ विचारात घेतले तरीही, मराठी भाषेला जागतिक पातळीवरही महत्त्व आहे. पण त्याचबरोबर केवळ संख्याबळापेक्षा भाषेच्या समृद्ध साहित्यिक वारशाची जाणीव ही आपला भाषाभिमान अधिक सार्थ ठरवणारी आहे आणि 'श्रेष्ठ पुस्तके' हा या साहित्यिक वारशाचा एक मोठा हिस्सा आहे. तेजस्वी पूर्वजांचे स्मरण व 'त्यांची तेजोमय परंपरा म्हणजे मी' ही जाणीव समाजाच्या सामूहिक अस्मितेचा एक मोठा आधार असतो. 'श्रेष्ठ पुस्तके हा त्या तेजोमय परंपरेचाच एक भाग आहे. 'अरे वा, मराठीतही एवढी चांगली पुस्तके आहेत तर,' असे प्रत्येक मराठी वाचकाला वाटायला हवे. आपल्या भाषाप्रेमाला समृद्ध साहित्यिक वारशाच्या जाणिवेचा आधार पुरवणे हा या उपक्रमाचा एक उद्देश म्हणता येईल. या उपक्रमाचा दुसरा उद्देश आहे, अशा श्रेष्ठ पुस्तकांच्या वाचनातून आपली अभिरुची अधिक संपन्न करण्याचा श्रेष्ठ पुस्तकें' ('क्लासिक्स') कळत-नकळत आपल्या मनावर खोलवर रुजणारे संस्कार करत असतात, त्यांच्या वाचनाने पुनर्वाचनाने आपली अभिरुची अधिकाधिक संपन्न होत जाते यात शंकाच नाही. आपल्या सर्वांच्याच अभिरुचीवर असे श्रेष्ठ साहित्याचे संस्कार होत राहणे व त्यातून आपल्या सांस्कृतिक जाणिवांचे उन्नयन होत राहणे हे आजच्या बकाल, उथळ जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर अधिकच अगत्याचे वाटते. वृत्तपत्रांच्या पुरवण्या आणि साप्ताहिकांचे 'स्पेशल रिपोर्ट यांच्या पलीकडच्या जगात आपण जायला हवे, आपले मन रमायला हवे. "Classics are the books that everyone wants to have read but no one actually reads !” असे मार्क ट्वेन याने म्हटले आहे. ("श्रेष्ठ पुस्तके ती, जी वाचलेली असावीत असे प्रत्येकाला वाटते, पण जी प्रत्यक्षात कोणीच वाचत नाही!”) यातला चेष्टेचा भाग सोडून द्या; पण हे मात्र खरे, की खूपदा अनेक उत्तम पुस्तके वाचायची राहून जातात. कधी आपल्याला सवड होत नाही, कधी पुस्तक वेळच्या वेळी उपलब्ध होत नाही. कधी अशी उत्तम पुस्तके एकेकाळी वाचलेली- चाळलेली असतातही, पण नंतर ती विस्मरणात गेलेली असतात. पुस्तकपरिचय हा प्रत्यक्ष पुस्तकवाचनाला पर्याय नाही, याची आम्हांला जाणीव आहे; पण या उपक्रमाद्दारे वाचकांचे लक्ष या पुस्तकांकडे निदान वेधले गेले, यांतली काही जरी त्याला (प्रथमच वा पुन्हा एकदा) वाचावीशी वाटली, तरी या उपक्रमाचे सार्थक झाले असे आम्ही मानू. ज्यांचा प्रभाव दीर्घकाळ रसिकांच्या मनावर टिकून राहतो ४७६ निवडक अंतर्नाद अशी पुस्तके फारच थोडी असतात. इंग्रजी वाचनाचा पर्याय ज्यांना उपलब्ध आहे अशांच्या दृष्टीनेतर श्रेष्ठ मराठी पुस्तकांचा हा परीघ अधिकच आक्रसलेला असतो. त्यादृष्टीने एक सांगावेसे वाटते. निदान ही वीस पुस्तके तरी वाचकांनी पुन्हा एकदा अवश्य वाचावीत, शक्य असेल तर विकत घ्यावीत, संग्रही ठेवावीत, या वीसांतील प्रत्येक पुस्तक हे त्या-त्या साहित्यिकाचा 'मास्टरपी' म्हणता येईल असे आहे; त्याचा 'अंतर्नाद' त्या पुस्तकात प्रकर्षाने जाणवेल. श्यामची आई आजही आपले डोळे पाणावेल, चिमणराव आजही हसवेल, दगडू मारुती पवारची वेदना अजून तीच आहे, आणि पांडुरंग सांगवीकरचे तुटलेपणही. आजही अनेक कळ्या निःश्वास सोडताना दिसतील आणि आपल्या प्रत्येकातच उपभोगांमागे धावणारा एक अतृप्त ययाति दडलेला आजही जाणवेल. श्रेष्ठ कलाकृती कधीच कालबाह्य होत नाही; ती अजर असते. शाश्वत सत्याच्या वाटेवर ती आपल्याला कायम साथ देते. "Art is a lie that enables us to realize the truth" ("कला म्हणजे आपल्याला सत्याप्रत नेणारे एक असत्य) हे 'मॉडर्न आर्ट'चा प्रणेता पाब्लो पिकासो याचे उद्गार या वीसापैकी प्रत्येक पुस्तकाला लागू पडावे. कुठल्याही मराठी माणसाच्या घराचे भूषण ठरतील अशीच ही पुस्तके आहेत आणि म्हणून ती वाचकांपुढे आणावीत, याच सुस्पष्ट भूमिकेतून अंतर्नाद हा उपक्रम राबवत आहे. मराठीत साधारण चारशेच्या आसपास दिवाळी अंक प्रसिद्ध होतात व तसे ते या वर्षीही प्रसिद्ध होतीलच. या सर्वच दिवाळी • अंकांची रचना चार पाच कथा, दोन-तीन लेख, एखाद दुसरा परिसंवाद, एखादी कादंबरी, एखादे आत्मकथन, काही कविता, अशा काहीशा ठरून गेलेल्या साच्यानुसार होत असते. श्रेष्ठ पुस्तके विशेषांकाच्या निमित्ताने या पारंपरिक साच्यापेक्षा काहीतरी वेगळे व बऱ्यापैकी संग्राह्य असे वाचकांना द्यायचा आमचा प्रयत्न आहे. ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांचा मराठी वाचकांना वेगळा परिचय करून द्यायची गरज नाही. त्यांची रेखाटने हे या अंकाचे एक वैशिष्ट्य ठरावे. रेखाटनांखालील जन्म-मृत्यूच्या तारखा 'संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश' या जी. आर. भटकळ फाउण्डेशन, मुंबई, यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथातून घेतल्या आहेत. गेल्या काही वर्षांप्रमाणे या दिवाळी अंकाचेही मुखपृष्ठ आहे श्याम देशपांडे यांचे – भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या कमळांचे, संस्कृत वचने लीला अर्जुनवाडकर यांनी तपासून दिली. या सर्वांचा अंतर्नाद आभारी आहे. या वीस श्रेष्ठ पुस्तकांचा इतक्या सुजाण रसिकतेने परिचय करून देणाऱ्या सर्व वीस लेखकांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. त्यांच्या - तसेच आमचे जाहिरातदार व व्यावसायिक संबंधित यांच्या - मनःपूर्वक दिलेल्या सहकार्याशिवाय हा अंक साकार झालाच नसता. या सर्वांना, तसेच आमच्या सर्व वाचकांना, ही दिवाळी सुखसमृद्धी ची जावो आणि प्रत्येकाला आपापल्या अंतर्नादाप्रमाणे जगण्याचे- फुलण्याचे स्वातंत्र्य व सामर्थ्य लाभो ही सदिच्छा! (दिवाळी २००६)