पान:निवडक अंतर्नाद.pdf/४३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिल्लीत जिम्नॅस्टिक्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या, तेव्हा त्या पाहायला चिटपाखरूसुद्धा आले नाही. अर्थात आपले राष्ट्रगीत एकदाही वाजले नाही, हे सांगायला नकोच. समारोपाच्या कार्यक्रमाला मात्र अमिताभ बच्चन आल्यामुळे तुफान गर्दी झाली. अजिंक्यपद जिंकणाऱ्या जपानच्या संघाच्या प्रशिक्षकाला अमिताभ बच्चन हे सिनेनट आहेत असे कळल्यावर धक्काच बसला. पण त्याने यावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी होती, तो म्हणाला, "तुम्हां भारतीयांना पदकं का मिळत नाहीत, हे आता ध्यानात आलं! तुम्हांला जिंकण्याचा अभिनय पुरतो. आमच्याकडेसुद्धा सिनेनटनट्या लोकप्रिय आहेत. पण खेळाच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी सिनेनटनट्या बोलवायची गरज कधीच भासत नाही. " विकासाच्या आणि महासत्ता बनण्याच्या गप्पा मारणाऱ्या भारताचे क्रीडाक्षेत्राकडे अक्षम्य असे दुर्लक्ष झालेले आहे. कोणत्यातरी राजकीय नेत्याच्या मनात आले, की प्रचंड पैसा खर्च करून क्रीडासंकुले उभारली जातात. त्यांचा वापर कोण, केव्हा, कसा करणार याचे नियोजन नसते आणि देखभाल दुरुस्तीसाठीही काहीच व्यवस्था नसल्याने त्यांचे भग्नावशेष बनायला वेळ लागत नाही. मोठमोठ्या व्यक्तींची नावे दिलेली स्टेडियम्स प्रत्येक शहराच्या चेहऱ्यावर कोडाचे डाग पडल्यासारखी जागोजागी दिसतात. दिल्लीला राष्ट्रकुल स्पर्धा घेण्याचे ठरल्यावर आधी असलेली क्रीडासंकुले पाडून टाकण्यात आली. ती पाडण्याच्या आधी खेळाडू कोठे सराव करणार, याचा विचारही झाला नाही. ट्रॅप नेमबाजीच्या खेळाडूंचे तर फारच हाल झाले. आधीच आपल्याकडे ट्रॅप अँड स्कीटच्या रेंजेस फार थोड्या, दिल्लीची रेंज पाडून टाकलेली. पुण्याला शिवछत्रपती क्रीडासंकुलात रेंज बांधताना सुरक्षेचा विचारच केला गेला नाही. सराव सुरू झाल्याबरोबर आसपास राहणाऱ्या लोकांच्या घरांमधे छयांचा वर्षाव व्हायला लागला व मग त्यांनी खटले भरण्याची धमकी दिली, तेव्हा तेथली रेंज बंद करून टाकण्यात आली. सैन्यदलाकडे महूला रेंज होती; पण त्यांनी इतर खेळाडूंना सराव करू देण्याचे नाकारले. जसे काही ते पाकिस्तानातून आलेले खेळाडू होते! ऑलिंपिकमध्ये सहा सुवर्णपदके असलेल्या या क्रीडाप्रकारातल्या खेळाडूंची फारच परवड झाली. काही निवडक खेळाडूंना परदेशात पाठवण्यात आले. जे धनिक घरातले होते ते स्वतःच्या खर्चाने परदेशी जाऊन आले. पण इतरांचे काय? ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक, जागतिक अजिंक्यपद मिरवणाऱ्या भारताच्या वाट्याला योग्य नियोजनाच्या अभावी फक्त दोन रौप्य आणि एक कांस्यपदक येऊ शकले. कमीत कमी चार सुवर्णपदके जिंकण्याची क्षमता असलेल्या आपल्या संघाला या प्रकारात एकदाही आपले राष्ट्रगीत वाजवता आले नाही. राष्ट्रकुल स्पर्धा भारतात घेण्याचे ठरल्यावर भरमसाट खर्च करणे सुरू झाले. पुण्याला बालेवाडीत युवा राष्ट्रकुल स्पर्धा घेण्यात आल्या. सराव स्पर्धा यापलीकडे या स्पर्धांना महत्त्व नसल्याने इतर देशांच्या खेळाडूंचा सहभाग अत्यंत नगण्य होता. अशा स्पर्धांसाठी ऑलिंपिक दर्जाचे स्टेडियम बांधण्याची ४३८ निवडक अंतर्नाद काय गरज होती? स्पर्धांचे निमित्त करून बांधायचेच होते तर ते नंतर कसे वापरात येऊ शकेल, आपल्या खेळाडूंचा दर्जा वाढवण्यासाठी त्याचा कसा उपयोग होईल, या सर्व बाबींचा विचार न करता शेकडो कोटी रुपये काय म्हणून उधळले? ८० खेळाडू एका वेळी स्पर्धा करू शकतील अशी १० मीटरची रेंज, तेवढीच क्षमता असलेली ५० मीटरची रेंज, ५० खेळाडू एका वेळी भाग घेऊ शकतील अशी २५ मीटरची रेंज, मुळीच वापरात न आलेली ट्रॅप अँड स्कीट रेंज या सर्व रेंजेस या स्पर्धेसाठी बांधण्यात आल्या. ऑलिंपिक दर्जाची अंतिम फेरीची रेंज बांधण्यात आली. पण ती रेंज तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याने एक दिवसही वापरली गेली नाही. युवा राष्ट्रकुल स्पर्धांत नेमबाजीमध्ये कोणत्याच प्रकारात ८ ते १० च्या वर स्पर्धकांनी भाग घेतला नाही. अत्यंत महागडी संगणक यंत्रणा बसवण्यात आली. आव असा आणला गेला, की आपण जणू ऑलिंपिक स्पर्धाच पुण्यात भरवत आहोत! अशा स्पर्धा आपल्या संयोजकांना, त्यांच्या स्वयंसेवकांना, पंचमंडळींना मोठ्या स्पर्धांचा सराव व्हावा म्हणून घ्यायच्या असतात. पण या युवा राष्ट्रकुल स्पर्धांचे संयोजन इतके भिकार होते, की भारताची सर्व राष्ट्रकुल देशांत बदनामी मात्र झाली. आपल्या नेहमीच्या पद्धतीने स्पर्धा सुरू होईपर्यंत बांधकाम चालूच होते. सफाई व्यवस्थित नव्हती. परदेशांतून आलेल्या पंचांना, प्रशिक्षकांना आणि स्वयंसेवकांना चारपाच दिवस जेवायचीही धड सोय नव्हती. राष्ट्राध्यक्ष येणार असल्याने सुरक्षा व्यवस्था कडक असल्याचे निमित्त सांगण्यात आले. राष्ट्रकुल स्पर्धांसाठी आपल्याकडे पुरेसे आणि चांगले प्रशिक्षक नसल्याने परदेशांतून अनेक खेळांसाठी प्रशिक्षक आणावे लागले. स्टॅनिस्लाव लॅपिड्स हा रायफल - जगात सर्वोत्तम प्रशिक्षकांत गणला जाणारा रशियन प्रशिक्षक आपल्याला मिळाला, ट्रॅप अँड स्कीट नेमबाजीत मार्सेल्लो ह्य इटालियन प्रशिक्षक आला. या दोन्ही प्रकारांत राष्ट्रकुल स्पर्धेत प्रत्येकी १२ सुवर्णपदके असतात. पण पिस्तुल नेमबाजीत एकूण २० सुवर्णपदके असतात. त्यासाठी प्रशिक्षकच नेमला नाही. बराच आरडाओरडा झाल्यावर लॅपिड्सलाच एखादा चांगला प्रशिक्षक पाहाण्यास सांगण्यात आले. त्यानेही दिमेन्तिएव या जगप्रसिद्ध पिस्तुल नेमबाजीच्या प्रशिक्षकाचे मन वळवले. पण त्याने होकार कळवल्यानंतरही चार महिने त्याच्याशी कोणी संपर्कसुद्धा साधला नाही. शेवटी तो कंटाळून अमेरिकेला निघून गेला. त्यामुळे पिस्तुल नेमबाजीला प्रशिक्षकच शेवटपर्यंत नेमला नाही आणि ट्रॅप अँड स्कीटच्या सरावाला रेंजच मिळाली नाही. या साऱ्या गलथानपणामुळे आपली ६ ते ८ सुवर्णपदके हुकली, या काळात माझी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संचालकांशी गाठ पडली. पिस्तुल नेमबाजी प्रशिक्षक नसल्याबद्दल मी तक्रार केली, तेव्हा त्यांनी मला सांगितले, की लॅपिड्सने सुचवलेला रशियन पिस्तुल प्रशिक्षक नेमला असून तो पुण्यात हजरसुद्धा झाला आहे. पुण्याच्या पुढल्या भेटीत मी उत्सुकतेने नव्या प्रशिक्षकाला भेटायला गेलो, तेव्हा मला समजले, की हजर झालेला रशियन हा संगणकतज्ज्ञ आहे आणि त्याचा पिस्तुल नेमबाजीशी काहीही