पान:निवडक अंतर्नाद.pdf/४१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बेगम अख्तर अरविंद गजेंद्रगडकर पं. अरविंद गजेंद्रगडकर बनारस हिंदू विश्वविद्यालयात संगीताचे प्राध्यापक होते. त्यानंतर आकाशवाणीमध्ये संगीतसंयोजक. भारतातल्या जवळजवळ सर्व प्रमुख संगीत मैफलींत त्याचप्रमाणे परदेशातही त्यांचे बासरीवादनाचे कार्यक्रम झाले आहेत. संगीतक्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या आठवणी सध्या ते खास अंतर्नादसाठी लिहित आहेत. कुमारगंधर्व आणि ओंकारनाथ ठाकूर यांच्यानंतर या अंकात बेगम अख्तर, नियतीची खरोखरच मेहेरबानी! नाहीतर जगद्विख्यात गजल आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचा इतका निकट सहवास मला कसा लाभला असता? गजलची सम्राज्ञी म्हणून विख्यात असलेल्या बेगम अख्तर यांना प्रथम मी रूपेरी पडद्यावर पाहिलं. फार वर्षांपूर्वीची गोष्ट. प्रख्यात दिग्दर्शक मेहबूब यांचा 'रोटी' नावाचा सिनेमा लागला होता. त्यावेळचे प्रख्यात अभिनेते चंद्रमोहन यांच्यासाठी मी तो सिनेमा पाहिला. त्याच सिनेमात अख्तरी फैजाबादी या गायिकेनं नायिकेचंपण काम केलं होतं. अनिल विश्वास यांनी संगीत दिलं होतं. प्रभावी कथा आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शन यामुळे तो चित्रपट प्रभावी वाटलाच पण मनात खोल रुतून बसले ते अख्तरींचे स्वर ! त्या वयात उर्दू विशेष कळत नव्हतं, पण अख्तरींच्या विलक्षण आर्जवी आणि व्याकूळ स्वरातील भाव मात्र मनात कुठेतरी खोल खोल रुतून बसले. 'रहने लगा है दिलमे अंधेरा तेरे बगैर अशी त्या गाण्याची पहिली ओळ अजून आठवते. पुढे वय वाढत गेलं, गाण्याची थोडी समजही वाढत गेली, तशी अख्तरीबाई (ज्या आता बेगम अख्तर झाल्या होत्या) आणि त्यांच्या ठुमरी, दादरा, गजल यांच्या ध्वनिमुद्रिकांचा परिचय होत गेला आणि पुढे पुढे तर त्यांच्या गाण्याची अनिवार ओढच लागली. रेडिओवर त्यांचा कार्यक्रम असला की न चुकता ऐकणे आणि नंतर त्या धुंद स्वरांचं चिंतन करीत मस्त राहणे हा छंदच लागला. ठुमरी, दादरा, गजल या गीतप्रकारांना त्याकाळी तुच्छ समजलं जायचं. कधी मैफलीत ठुमरीची फर्माईश झाली तर "आम्ही असले क्षुद्र प्रकार गात नाही" असं गायक-गायिका आढ्यतेनं सांगायच्या. पण ठुमरी, दादरा आणि गजल हे गीतप्रकार झपाट्यानं लोकप्रिय होत चालले होते आणि या गीतप्रकारात एकच नाव सर्वत्र दुमदुमत होतं मलका-ए-तरन्नुम, मलका-ए-गजल बेगम अख्तर ! या श्रेष्ठ गायिकेचा प्रत्यक्ष सहवास व्हायचा पहिला योग आला तो धारवाडला. मी नुकताच आकाशवाणी केंद्रावर संगीतसंयोजक म्हणून रुजू झालो होतो. त्या काळी चेन बुकिंग म्हणजे साखळी कार्यक्रमाची प्रथा होती. निरनिराळ्या केंद्रांवर ओळीने कार्यक्रम करीत कलाकार मंडळी हिंडत असत. या साखळी कार्यक्रमांमुळे अनेक दिग्गज अशा कलावंतांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला. हे माझं भाग्यच! अशाच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बेगम अख्तर यांचा प्रत्यक्ष सहवास घडला. त्यांना डाकबंगल्यात उतरविण्याचं आणि त्यांची सर्व व्यवस्था बघण्याचं काम माझ्याकडे होतं आणि ते मी मोठ्या उत्साहाने स्वीकारलं होतं. "गजल हा जगण्याचा पंथ आहे. जीवनाकडे पाहण्याची ती एक विशिष्ट दृष्टी आहे. ती ज्याला समजली तोच गजलचा असली 'मझा' घेऊ शकतो. त्याचा 'लुत्फ लूटू शकतो, बेबंद, बेहिशेबी, धुंद जीवन जगण्याची ज्याची तयारी आहे त्यानंच गजलशी सलगी करावी. आपलं सर्वस्व लुटू देण्याची हिंमत असणाराच गजलचा आत्मा जाणू शकतो. जळत्या 'शमा' वर बेदरकारपणानं झेप घेऊन स्वत:चे पंख जाळून घेणाऱ्या परवान्याची तडप जाणून घेणाराच गजलची 'धडकन' अनुभवू शकतो. जीवन हे केवळ जगायचं नसतं, ते सर्वांगानं भोगायचं असतं हे जो जाणतो त्यालाच गजल खऱ्या अर्थाने अनुभवता येते," बेगम अख्तर शांतपणाने सांगत होत्या. गेल्या अर्ध्या तासात त्यांनी तिसरी सिगरेट पेटवली होती आणि फ्रिजमधल्या थंडगार पाण्याची अर्धी बाटली संपवली होती. पानाचा विडा खाणं तर अविरत सुरू होतं. चांदीच्या नक्षीदार डब्यात व्यवस्थित रचून ठेवलेले मघई पानाचे विडे होते. दर पाच मिनिटांनी त्या विडा तोंडात ठेवत होत्या. आणखीन एक विडा तोंडात ठेवून नवी सिगरेट पेटवीत त्या म्हणाल्या, "जीवनाला इष्काची आच लावून काढलेला अर्क म्हणजे गजल. ही आच, हा दर्द ज्याला समजला त्याला गजल समजली." असं म्हणून त्यांनी समोरच्या पेटीवर हळूच बोटं फिरवली आणि त्या गाऊ लागल्या. 'ऐ मुहब्बत तेरे अंजाम से रोना आया, जाने क्यूं आज तेरे नाम पे रोना आया.' "वाहव्वा! बहोत अच्छे!" मी नकळत दाद दिली. त्या हसल्या. मग सिगरेटचा एक झुरका घेत त्या म्हणाल्या, "तुम्हाला थोडं तरी उर्दू समजतं, पण ज्याला उर्दू अजिबात समजत निवडक अंतर्नाद ४१५