पान:निवडक अंतर्नाद.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाहिलं तेव्हा धग थंडावली होती. गाडी थांबवून लाईट लावून पाहिलं, तर डोळे निर्जीव झाले होते. शरीर शांत झालं होतं. मग उतरून त्याला उचलून बाजूच्याच एका पुलावर ठेवलं व खचलेल्या मनाने गाडीकडे परत आलो. आजही माझी होळी माझ्या पॉमेरिअन कुत्र्यांशी खेळण्यापासून सुरू होते. त्यांना वेगवेगळ्या रंगांनी मी रंगवतो. पुढे महिनाभर अनेकदा आंघोळ करूनही ते त्याच रंगाचे राहून होळीच्या स्मृती जागवत असतात. टिपू नावाचा पॉमेरिअन कुत्रा व डॉन नावाचा डॉबरमन कुत्रा हे दोघे आमच्याकडे जवळपास पंधरा वर्षं राहिलेत. त्यांच्या बारीकसारीक भावना व दुखणं खुपणं आम्हांला व आमचे बारीकसारीक मुड्स त्यांना कळण्याइतपत ते 'ह्युमन' झाले होते. टिपू तर गाडीचं दार उघडलं की टुणकन उडी मारून आत सीटवर बसायचा व चक्कर मारून आणण्याचा लाडिक हट्टाचा चेहरा करायचा, लग्नानंतर काही दिवस भूप अपार्टमेंटमधील फ्लॅटवर मी व मनीषाच राहत असू. पलंगावर खेळलं की मनीषा रागावते म्हणून आम्हांला झोप लागल्यावर उडी मारून पलंगावर येऊन तो माझ्या पाठीशी घट्ट बिलगून झोपे. फ्लॅटमध्ये आम्ही दोघंच असल्यामुळे कुठेही बाहेर जायचं असलं की मनीषाला त्याला बरोबर न्यावं लागे. आत कोंडून गेलं, तर ओरडून ओरडून आकांत करायचा. पण पार्किंगमध्ये गाडीत मात्र तासन्तास शांत राही. मी रनिंगला कधी गेलो, तर गाडीमध्ये त्याला नेई. तेव्हाही मी जाऊन परत येईपर्यंत डौलदारपणे व उत्सुक नजरेनं इकडेतिकडे पाहत तो शांतपणे बसलेला असे. गाडी व प्रवास हे त्याच्या अत्यंत आवडीचे. एकदा आजारी होता म्हणून त्याला आम्ही सोबतच ताडोबालाही नेलं होतं. तिथे कुठे मोकळा सुटला, तर जंगलात हरवेल असं सतत टेन्शन असायचं. एकदा वणीच्या डॉक्टरांच्या चुकीने याच्या नर्व्हमध्ये इंजेक्शन दिलं गेल्यामुळे याच्या मागच्या एका पायातला जीव नाहीसा झाला होता, मग तो स्वतःच तो पाय कुरतडून घेई. सगळ्याच डॉक्टरांनी पाय कापून टाकण्याचा सल्ला दिला होता. पण पीव्हीसीच्या पाईपमध्ये घालून ठेवून शेवटी आम्ही तो पाय वाचवला. त्यात थोडा जीवही नंतर आला होता, पण शेवटपर्यंत तशा अधू पायाने थोडासा रखडतच तो चालायचा. बंगल्यात राहायला आल्यावर असाच तो डायनिंग टेबलखाली आईच्या पायाच्या तळव्यांवर तिची साडी अंगाभोवती ओढून घेत झोपे. मी बाहेरगावी गेलो तर तो जेवण सोडायचा व दारात उदासवाणेपणे वाट बघत बसायचा. माझ्या गाडीचा हॉर्न कुठूनही ओळखून आनंदाने उड्या मारायचा. डॉन हा डॉबरमन, उंच, काटक व अंगापेराने मजबूत होता. आवाज बुलंद, अत्यंत ग्रेसफुल, डौलदार अशी त्याची चाल होती. पाहूनच लोक घाबरायचे, भुंकणं ऐकलं तर बघायलाच नको, अत्यंत चपळ व स्वाभिमानी, आक्रमक व चिडखोर असा तो होता. पण असं असलं तरी तो मनाने अतिशय संवेदनशील, जीव ४० निवडक अंतर्नाद लावणारा व पझेसिव्ह होता. पॉमेरिअनपासून सगळ्या लहान • कुत्र्यांना अंगाखांद्यावर खेळवायचा. त्यांनी काहीही केलं, तरी हा चिडत नसे. पण मोठ्या कुत्र्यांनी थोडी जरी कुरापत काढली तर मात्र हा अक्षरश: त्यांना फाडून टाकेपर्यंत लढत असे. आम्ही वणीला असताना तिथल्या भटक्या डुकरांचा याला फार राग. कंपाउंडमधून कधी सुटला तर त्या डुकरांना पकडून हा अक्षरशः फाडून यकत असे. आम्ही कुठल्याच कुत्र्यांना मांस-मटण कधीच दिलं नाही. नाहीतर हा अजून किती आक्रमक झाला असता देव जाणे. हुशारही खूप याला वास देऊन बॉल बगीच्यात सहा इंचापर्यंत जमिनीत गाडून लपवून ठेवला तरी तो बरोबर ती जागा हुडकून, उकरून बॉल परत आपल्या हाती आणून देत असे. हा त्याचा अत्यंत आवडीचा खेळ परत परत बॉल तोंडात धरून आपल्या हातात आणून देऊन आपल्याला तो लपवायला सांगत असे. मोकळा असला आणि मी किंवा आई दिसलो की धावत येऊन उडी मारून छातीवर दोन्ही पाय ठेवून उभा राहायचा. पुढच्या दोन्ही पायांनी कमरेला अगदी लहान मुलासारखी मिठी मारून पोटावर डोकं घुसळत 'कुंई कुंई आवाज काढायचा. ह्य त्याचा आवाज मग त्याच्या इतर वेळेच्या आवाजापेक्षा अगढ़ी वेगळा असे. त्याच्या घराजवळ कधी गेलं, तर चेहऱ्यावर हात फिरवून फिरवून त्याचे लाड करावे लागायचे. तेव्हाही तो असाच 'कुंई कुंई आवाज काढायचा. लाड न करता परत जायला निघालो तर नेहमीच्या त्याच्या मोठ्या आवाजात आकांडतांडव करायचा. आई बाबांच्या खोलीची पलंगामागची खिडकी थोडी जरी उघडी राहिली, तरी हा ग्रीलमधून तोंड आत घालून कुंई कुंई आवाज काढत बसे. मग बाबांनी चेहऱ्यावर हात फिरवून लाड केल्याशिवाय तो स्वस्थ होत नसे. त्याचे दात एवढे मोठे, अणकुचीदार व तीक्ष्ण होते व अंगात जोरही खूप, त्यामुळे थोडा वेळ जरी भांडण सोडवलं नाही गेलं, तरी याच्या समोरचा विरोधक रक्तबंबाळ व्हायचा. पण लाड करायला गेलं की ह्यत तोंडात घेऊन तो चावत बसे, तेव्हा जखम काय, एवढासा ओरखडादेखील माझ्या हाताला कधी झाला नाही. डॉन व आईचं असंच भावनिक नातं होतं. मी व मनीषा नागपूरला व बाबांचे दौरे सुरू, या १९८६ ते १९९१ या काळात ती कित्येकदा वणीला घरात एकटीच असायची व डॉन तिचा रक्षक, रात्री दारं बंद करून ती आत असायची व घराच्या चारही बाजूला धावत पळत फिरत डॉन रात्रभर खडा पहारा देत असे. एवढंसंही कुठे खुट्ट वाजलं की भुंकायचा, त्या जागेवर पळत जायचा. कंपाउंड वॉलवर पाय ठेवून बाहेर डोकवत, भुंकून भुंकून आकांत करायचा. त्याचा आकांत वाढला तर आई खिडकी किलकिली करून बाहेर पहायची, अदमास घ्यायची. त्याला आवाज द्यायची. त्याने त्याला बळ मिळायचं, उत्साह यायचा. किमान दोनदा तरी त्याने असेच चोर परतवलेत, कारण रात्री त्याचा असा आकांत झाल्यावर त्याच रात्री कॉलनीत आजूबाजूला चोऱ्या झाल्याचं दुसऱ्या दिवशी लक्षात आलं.