पान:निवडक अंतर्नाद.pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिसते. हा विरोधाभास आहे, कारण अस्मितेची कुठलीही साचेबंद कसोटी नाही. थोडक्यात, आपले मराठीपण जपताना सगळे जग आपल्याविरुद्ध कट करते आहे, अशी भावना सर्वस्वी त्याज्य आहे. एवढेच नव्हे तर, ती मराठीपणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने पराकोटीची धोकादायक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, एकच व्यक्ती अनेक अस्मिता घेऊन जगत असते. आपण सगळे मराठी बाण्याचा अभिमान बाळगतो, तरी आपले नागरिकत्व व म्हणून पासपोर्ट भारतीय आहे हे विसरून कसे चालेल? शिवाय, जगाच्या कोणत्याही देशातील प्रवेशद्वारावर, म्हणजे विमानतळ असो वा बंदर, तिथे आपले स्वागत भारतीय म्हणूनच होईल. मराठी म्हणून नव्हे. हा सर्व विचार गोंधळात टाकणारा आहे यातून सर्वसाधारण माणसाने मार्ग कसा काढायचा? मार्ग सोपा आहे. शिवाजीमहाराज मराठ्यांची फौज घेऊन लढले, पण त्यांना मराठी राज्य नको होते, 'हिंदवी स्वराज्य' हवे होते. ( हिंदवीचा अर्थ हिंदूंचे किंवा हिंदुस्तानचे.) शिवाय, त्यांच्या या राज्याची अस्मिता 'महाराष्ट्र मराठ्यांचा' अशी नव्हती, तर वर्धिष्णु विश्ववंदिता' अशी होती. 'वर्धिष्णु विश्ववंदिता' या शब्दांत राज्यविस्ताराच्या महत्त्वाकांक्षेइतकीच जगाच्या आदरास प्राप्त होण्याची इच्छा आहे. ज्या क्षणी आपण 'महाराष्ट्र मराठी माणसाचा' म्हणतो, त्या क्षणी आपण दोन प्रमाद करतो. एक, मराठी माणसाची अस्मिता महाराष्ट्रात कैद करतो आणि दोन, आपल्या अस्मितेचे परराज्यातील किंवा परदेशातील स्थान ठिसूळ करतो. त्यामुळे आपल्या राज्याइतकाच हक्क आपण संपूर्ण देशावर सांगितला पाहिजे. शिवाय, तो आता कायद्यानेही आपला हक्क आहे. पण संपूर्ण देशावरच कशाला, संपूर्ण जगावर आम्हांला हक्क दाखवता आला पाहिजे. कारण जात, धर्म, राज्य, देश ही सगळी परिमाणे मानवनिर्मित आहेत. आपल्या सर्वांच्या अस्मितेला शतदा छेदणाऱ्या या आयामांपलीकडचे हे जग हा आपला सर्वांचा एकमेव नैसर्गिक आयाम आहे. या जगाशी जोडणारे हजारो धागे आहेत आणि मानवता हा त्यांतील सर्वांत महत्त्वाचा धागा आहे. केवळ हवा, पाणी, डोंगर, जमीन, सागर व आकाश यांच्यामुळेच नव्हे, तर खाद्यसुरक्षा, जलसुरक्षा आण्विक व इतर संहारक शस्त्रे, विषमता व गरिबी या समस्यांद्वारेही आपण संपूर्ण जगाला जोडले गेले आहोत, तापमान बदल, आतंकवाद, धार्मिक कट्टरतावाद यांच्या प्रभावानेही संपूर्ण मानवतेला एकमेकांशी असलेल्या अद्वैताचा अधिकाधिक प्रत्यय येऊ लागला आहे. त्यामुळेच एकदा संपूर्ण मानवता किंवा संपूर्ण जगच आपले असे मानले, की त्यात भारतीयत्व, मराठीपण या सर्वांचे एक स्थान आपोआप आहे. आपली भाषा, संस्कृती, विचार यांना जगभर पोहोचवण्यासाठी आता फेसबुकपासून ट्विटरपर्यंत कित्येक अमराठी आणि अभारतीय साधने उपलब्ध आहेत, नाहीतरी फोन, संगणक, घड्याळ, आगगाडी, विमान सगळ्यांना आपण आपलेसे केलेलेच आहे ना! यांतली एकही गोष्ट मराठी नाही. पण म्हणून काय झाले? 'अहं ब्रह्मासि' या भारतीय विचारात सगळे आपले आहे, असा गूढ संदेश आहे. ज्ञानेश्वरांनी त्याला 'विश्वचि माझें घर' असा समजणारा पर्याय दिला आणि विनोबांनी 'जय जगत्' असे सर्वांसाठी सुलभ रूपांतर केले. एकदा फक्त मानवतेलाच नव्हे, तर चराचराला जोडणारी एकात्मता समजली आणि ती 'एकता' किंवा तो 'योग' मनातून अनुभवला, तर मराठीपणाची विविधता किंवा वेगळेपणा कसा जपायचा, याचे धडे राजकारण्यांपासून घेण्याची गरज कुठे आहे? (दिवाळी २०११) National character is the keystone on which rests the future of our public affairs, not on this or that 'ism'. This national character, again, depends on the individual rectitude. If the parched field of Indian administration has to get fresh green life, we need the monsoon of purity in national character. And the monsoon consists of little drops falling and uniting to make the rain. Individual purity of character alone can revive the parched field. Politics, economics, administration, education, health and a score of other things, all call for good character in the individual. Individuals make or mar the nation. (आपल्या सार्वजनिक जीवनाचे भवितव्य या किंवा त्या 'इझम'वर नव्हे, तर राष्ट्रीय चारित्र्याच्या पायावर अवलंबून आहे. हे राष्ट्रीय चारित्र्य पुन्हा व्यक्तिगत चारित्र्यावर अवलंबून आहे. भारतीय प्रशासनाच्या वैराण भूमीत जर ताजे हिरवे अंकुर फुटायला हवे असतील, तर त्यासाठी आपल्याला शुद्ध राष्ट्रीय चारित्र्याच्या पावसाची गरज आहे आणि छोटे-छोटे थेंब एकत्र येऊन कोसळतात, तेव्हाच पावसाच्या धारा बनतात. शुद्ध व्यक्तिगत चारित्र्यच केवळ या वैराण भूमीचे पुनरुज्जीवन करू शकेल, राजकारण, अर्थकारण, प्रशासन, शिक्षण, आरोग्य व अशा इतरही अनेक बाबींसाठी व्यक्तीतील चारित्र्यसंपन्नता हवी आहे. राष्ट्राच्या उभारणीसाठी किंवा हासासाठी शेवटी व्यक्तीच कारणीभूत असतात.) ३७२ निवडक अंतर्नाद चक्रवर्ती राजगोपालाचारी (How to save Indian democracy from Money Power या पुस्तकातून ) (सप्टेंबर २०१३)