पान:निवडक अंतर्नाद.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असलेला 'जन्म' हा शब्द वापरून जणू काही ते शीर्षक दिल्याचे समर्थन देत राहते, 'रूट्स कथेतही शेवटून दुसऱ्या परिच्छेदात शीर्षक असलेला 'रूट्स शब्द अनेकवेळा येऊन जणू समर्थन देतो. सांगायचे ते कथेत समर्थपणे सांगितल्यावर पुन्हा शेवटी केलेला हा उपचार टाळला, तर मोनिकाची कथा अधिक प्रगल्भ आणि संपन्न होईल असे वाटते. वाचक हा आपल्या दोन इयत्ता वरचा आहे असे समजून केलेले लेखनच नेहमी श्रेष्ठतेची वाट चालू शकते असे मला वाटते. 'आर्तं संग्रातली 'श्रद्धा' ही मोनिकाची कथा हा तिच्या कथालेखनातला एक उत्कर्षबिंदू आहे. अनिर्णायकता आणि नाजूक विषयाची प्रगल्भ हाताळणी यांमुळे ही कथा विलक्षण प्रभावी ठरते. अत्यंत आक्रमक आणि हिंस्त्र शैलीतला शेवट असूनही कथेचा परिणाम नकारात्मक नाही हे विशेष. एका धाडसी विषयाला धाडसाने पण सनसनाटी अभिनिवेश न आणता मोनिका या कथेत भिडल्याचे जाणवते. मुस्लीम धर्माची पार्श्वभूमी असली तरी ही काही त्याच धर्माची कथा नव्हे. माणसाच्या प्रेरणा शोधणारी ही कथा आहे. जगण्यातले वैफल्य आणि अपयश याला चुकीच्या मार्गदर्शनाची जोड मिळाली, की मनातला अतिरेकी कसा तयार होतो, याचे हे प्रत्ययकारी चित्रण आहे. त्यात कथेचा शेवट हिंस्त्र असला तरी विलक्षण कारुण्याने भरलेला आहे अर्शद या अँटीहीरोचे मोडून पडणे अंगावर येते. असहाय वनितेवर बलात्कार करणारा अर्शद स्वतःलाही पट्ट्याने फोडून काढतो, हे आत्मक्लेशाचे सर्ग वाचकाला अंतर्मुख करतात. त्यामुळे ही कथा वाचूनही संपत नाही. मनात चालूच राहते. यातली यशोदा, असलम, अर्शद, वनिता वगैरे पात्रे केवळ घटनाचक्राचे घटक न उरता समाजातल्या निरनिराळ्या प्रवृत्तींची प्रातिनिधिक चित्रे होत जातात, हे मोनिकाचे लेखिका म्हणून यश. शिवाय घटना आणि पात्रांचे कृष्णधवल चित्रण टाळून तटस्थता राखण्यात मोनिकाला बऱ्याच अंशी यश आल्याचे जाणवते. श्रद्धा, अंधश्रद्धा आणि कट्टर दुराभिमान यांवरचे मोनिकाचे भाष्य सखोल चिंतनातून आल्याचे जाणवत राहते. कथेतली प्रमुख सुष्ट पात्रे दुर्दैवाने पलायनवादी मार्ग स्वीकारतात आणि 'दुष्ट' पात्र मार्गदर्शनाच्या अभावी वेगाने दयनीय होत जाते आणि दुष्कृत्यांच्या गर्तेत कोसळत जाते अशी मोनिकाची या कथेच्या घटनाक्रमाची योजना आहे. अर्थात सुष्ट आणि दुष्ट असे शिक्के मोनिका मारत नाही. ती फक्त त्या पात्रांना समजून घ्यायचा प्रयत्न करते. अनिर्णायक शेवटामुळे वाचक या कथेतून बराच काळ बाहेर न येता आपल्या सर्जक प्रतिभेनुसार आपले अन्वयार्थ आणि रंग भरत ही कथा मनात चालूच ठेवतो. 'आर्त' मधल्या इतर कथा कमीअधिक प्रमाणात यशस्वी असल्या तरी 'श्रद्धा' किंवा 'जन्म' च्या तोडीच्या मात्र वाटत नाहीत. 'नातं' ही अगदी सुरुवातीच्या काळात लिहिलेली कथा तर उमेदवारीच्या खुणाच दाखवते, तर 'बाबाची आईं' ही यशस्वी वाटणारी कथा यशस्वी वळणाकडे जाण्याची काहीशी रचीव, स्मार्ट आणि 'दिलों को जीतनेवाली' व्यावहारिक वाट चोखाळल्याचे जाणवून देते. मतिमंद वडिलांची स्वतःच जणू आई होणारी मनस्वी मुलगी रंगवताना या कथेचा तोल मात्र ढळल्याचे जाणवते. वाचकांना ३०६ • निवडक अंतर्नाद खूप आवडेल अशी ही कथा कथांतर्गत सुसंगतीशी तडजोड असल्याचे भास होत राहतात. आयुष्यभर मतिमंद नवऱ्याशी जुळवून घेण्याचे प्रयत्न करणाऱ्या आईचे सारे कष्ट मुलीच्या स्वप्नवत आणि रोमँटिक वागण्याने मळकट वाटू लागतात हे दुर्दैवी आहे. भलत्याच भाबड्या तिहाईने संपणारी ही कथा बऱ्याच वाचकांना मात्र लोभस वाटेल. भावुक आणि गोड शेवयमुळे या कथेतली दाहक समस्या पुसट आणि रचीव होत जाते. शिवाय एकांगी त्यागाने कोणतेही नाते हळूहळू करपत जाते याचे सूचन कथान्ताला असायला हवे होते असे वाटते. लग्नाने निर्माण होणारे वीर्यांचे नाते आणि जन्माने येणारे रक्ताचे नाते • यांतला अर्थपूर्ण छेदा खरे तर या कथेचा गाभा, पण तो ठळक होत नाही. पुरुषातले मतिमंदत्व स्त्रीबरोबरची सारी नाती मातृत्वात विलीन करते, असे काहीसे आदर्श तात्पर्य मोनिकाला अभिप्रेत असावे या कथेत. सततच्या कथालेखनाने मोनिकाच्या कथालेखनात येणारे कसदारपणा आणि चिंतनशीलता यांतले लक्षणीय चढउतार मात्र मला चिंताजनक वाटतात. विशेषत: 'आर्त' संग्रहानंतरच्या यंदाच्या दिवाळी अंकांतल्या काही कथा तर मौलिकपण गमावलेले प्रयोग वाटतात. अर्थात प्रत्येक कथाकाराच्या प्रवासात असे टप्पे येतातच, 'भूप' या यशस्वी कथासंग्रहानंतर मोनिकाने 'आर्त' च्या निमित्ताने श्रेष्ठ कथेच्या दिशेने दोन पावले प्रवास केल्याचे मात्र नक्कीच जाणवते. ते स्वागतार्ह तर आहेच, पण मुख्य म्हणजे आशादायक आहे प्रयोगशीलता, चिंतनशीलता, अनिर्णायकता अशा अनेक गुणांनी मोनिकाची कथा समृद्ध आहे. तिने आजवर प्रामुख्याने दीर्घकथेचीच वाट पकडली आहे. पण केवळ वैविध्य म्हणून नव्हे तर अधिक मोठ्या अवकाशात (काळ आणि पट या दोन्ही अर्थाने), अधिक मुक्त आणि खोलवरचे स्तर तपासणारे आणि मुख्य म्हणजे यशापयशाची पर्वा न करणारे मनस्वी दीर्घ लेखन केल्यास मोनिकाची कथा श्रेष्ठतेच्या अधिकाधिक जवळ जाईल असे वाटते. त्याची सारी लक्षणे बाळगणाऱ्या जन्म आणि श्रद्धा यांसारख्या कथा तिच्या सहप्रवाशांना तिचा हेवा वाटेल इतक्या समृद्ध आहेत. 'भूप'मध्येही तिच्या नाळ, आधार यांसारख्या कथा अशाच जमून आलेल्या होत्या. स्त्रीत्वाचे ● सौंदर्य असूनही स्त्रीवादाचे बंधन अन् बेड्या नसणारे अभिनिवेशहीन लेखन करणाऱ्या मोजक्या लेखिकांत मोनिकाचा समावेश करता येईल. त्यात कांगावाही नाही आणि अरण्यरुदनाचे वैफल्यही नाही. जगण्याचे अंतःस्तर तपासण्याचे धाडस आहे जगण्याच्या कुतूहलाची बोअरवेल अजून खोल नेल्यास श्रेष्ठतेचे पाणी या कथेला नक्कीच सापडेल. यशानुगामी कथेच्या रचीवतेचे आणि सततच्या लेखनाने येणारे वरवरच्या प्रयोगशीलतेच्या दडपणाचे धोके मात्र या कथेने टाळायला हवे. 'आर्तं' संग्रहामुळे मोनिकाबद्दलच्या आशा आणि अपेक्षा (काकणभर) अधिकच वाढल्या आहेत असे मात्र आवर्जून म्हणायला हवे. (आर्त, मोनिका गजेंद्रगडकर मौज प्रकाशन, किंमत रुपये १६०, पृष्ठे १६९) (फेब्रुवारी २००९) परीक्षण: संजय भास्कर जोशी