पान:निवडक अंतर्नाद.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेक्सपीअर विशेषांकामागची संपादकीय भूमिका एप्रिल २३ ही शेक्सपीअरची जयंती आणि पुण्यतिथी ही जागतिक ग्रंथदिन म्हणून तो साजरा होतो. त्या निमित्ताने हा शेक्सपीअर विशेषांक वाचकांच्या हाती देताना आनंद होत आहे. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी झटणाऱ्या अंतर्नादसारख्या मासिकाने शेक्सपीअरसारख्या इंग्लिश साहित्यिकावर विशेषांक काढावा यात सकृतदर्शनी विरोधाभास वाटले. परंतु मराठी साहित्याची जाण समृद्ध होण्यासाठी इंग्रजी साहित्याचा अभ्यास पोषक आहे आणि इंग्रजी साहित्याचा अभ्यास करण्यासाठी शेक्सपीअर समजून घेणे पोषक आहे हे लक्षात घेतले तर यातली सुसंगती, किंबहुना अपरिहार्यता, जाणवेल. मातृभाषेची ओढ ही माणसाची एक स्वाभाविक, झडीमांसी रुजलेली प्रवृत्ती आहे सोव्हिएट संघराज्यांचा अनुभव हेच पुन्हा एकवार सिद्ध करतो. सत्तर वर्षांच्या मॉस्कोकेंद्रित कठोर एकाधिकारशाही नंतर ही उझबेकीस्तान किंवा युक्रेनमधल्या माणसाला रशियन ही 'परकी' भाषाच वाटते ही वस्तुस्थिती पुरेशी बोलकी आहे अंतर्नादसारख्या मासिकांना तर प्रतिकूल परिस्थितीतही तग धरण्यासाठी आंतरिक बळ देणारी ही वस्तुस्थिती आहे. पण आपले मराठी प्रेम इंग्रजीच्या संदर्भात कधीकधी अकारण हळवे बनते. कॉम्प्युटरला संगणक म्हणण्याइतपत ठीक आहे; पण नंतर कॉम्प्युटरशी संबंधित ड्रायव्हर, फ्लॉपी, मॉडेम, इंटरफेस, हार्ड डिस्क, सॉफ्टवेअर, Y2K अशा असंख्य शब्दांना, संस्कृतशी कसरत करत क्लिष्ट प्रतिशब्द शोधण्याऐवजी, आपल्यातच सामावून घेतले तर? जगातल्या (इंग्रजीसह) सर्वच भाषा असे नवेनवे शब्द सामावून घेतच जास्त समृद्ध होत आहेत. इंग्रजीबाबतची अंतर्नादची भूमिका यानिमित्ताने स्पष्ट करावीशी वाटते. ज्ञानभाषा म्हणून, आंतरराष्ट्रीय संपर्कभाषा म्हणून इंग्रजीचे अनन्यसाधारण महत्त्व आज जगन्मान्य झाले आहे. फ्रेंचांसारखे इंग्रजीचे दीर्घकालीन स्पर्धकही आज आंतरराष्ट्रीय संपर्कभाषा म्हणून इंग्रजीचे अनन्यसाधारण महत्त्व खुल्या मनाने स्वीकारत आहेत. काही ऐतिहासिक कारणांमुळे भारतातील सुशिक्षितांना इंग्रजी (तुलनेने) बऱ्यापैकी अवगत असते व त्याचा बराच ऐहिक फायदा आज आपल्याला जागतिक स्तरावर मिळत आहे. मराठी भाषा आणि साहित्य चैतन्यशाली व्हायला हवे असेल तर आपल्या मराठीप्रेमाचे रूपांतर इंग्रजीद्वेषात होऊ देता कामा नये. 'वसुधैव कुटुम्बकम्' ह्य आपला खरा वारसा जपला पाहिजे, कारण इंग्रजीशी (आणि खरेतर हिंदीशीही) वाढते साहचर्य मराठीच्या विकासाला मारक नव्हे तर तारकच ठरणार आहे. मराठी साहित्यावरील इंग्रजीचा प्रभाव व्यापक आणि सखोल आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांच्या सतारीचे बोल, झपूर्झा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कवितांवर इंग्रजी २७२ निवडक अंतर्नाद कवींची छाप आहे. फडके- काणेकरांच्या लघुनिबंधांचा धागा ए जी. गार्डिनरच्या पर्सनल एसेज्शी तर दिवाकरांच्या नाट्यच्छटांचा धागा ब्राऊनिंगच्या ड्रॅमॅटिक मोनोलॉग्ज्शी जुळलेला आहे. आपल्या ऐतिहासिक वा सामाजिक कादंबऱ्यांवरील स्कॉट वा हार्डीचा आणि नवकथेवरील चेकॉव्ह ओ हेन्रीचा प्रभाव उघड आहे. इब्सेन-मोलिएर- शॉ-ओनील यांचा मराठी नाटकांवरचा किंवा जेरोम-चेस्टरटन- वुडहाऊस यांचा मराठी विनोदावरचा ठसा वरवरचा नाही. अर्नाळकरांच्या रहस्यकथाही कमी परपुष्ट नाहीत! एकूणच, माती इथलीच असली तरी बीजे खूपदा बाहेरची आहेत; कधी वाऱ्याबरोबर उडत आलेली तर कधी मुद्दाम आणून लावलेली. अर्थात या सगळ्यात वावगे काहीच नाही, इंग्रजी साहित्यावरील प्राचीन ग्रीक लॅटिनचा किंवा अर्वाचिन फ्रेंच- रशियनचा प्रभावही सर्वश्रुत आहे. महत्त्वाचा मुद्दा हा की मराठीतील कुठल्याही साहित्यशाखेचा अभ्यास आपल्याला अपरिहार्यपणे इंग्रजीच्या दारात आणून सोडतो. आणि इंग्रजीच्या दारात आपण येऊन ठेपलो की शेक्सपीअरचे अस्तित्व नजरेआड करताच येत नाही, इतका शेक्सपीअरचा इंग्रजी भाषेवर पगडा आहे. "आम्ही एकवेळ आमचे सगळे साम्राज्य देऊ, पण आमचा शेक्सपीअर कदापि देणार नाही' हे मूळ कार्लाईलचे व नंतर चर्चिलने उद्धृत केलेले विधान वरवरचे नाही. All that glitters is not gold किंवा Rose will smell sweet even when called by any other name यांसारखी असंख्य सुभाषिते ही इंग्रजी भाषेला शेक्सपीअरने प्रदान केली आहेत याची खूपदा आपल्याला कल्पनाही नसते. अशा सुभाषितांनी शेक्सपीअरचे साहित्य इतके खचाखच भरले आहे की शेक्सपीअर प्रथमच वाचणारी एक वृद्धा एकदा उद्गारली, "What is original about him? He is just full of quotations!” Sound of Music किंवा Brave New World यांसारखी संस्मरणीय शीर्षके मूळ शेक्सपीअरच्याच शब्दरचना आहेत. सर लॉरेन्स ऑलिव्हिएपासून नसीरुद्दीन शहापर्यंत कुठचाही जातिवंत नट शेक्सपीअरचे नायक साकार करणे हे अभिनयक्षेत्रातले सर्वांत मोठे आव्हान समजतो. कुठच्याही क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला सर्वश्रेष्ठ ठरवणे तसे धाडसाचे असते; पण जगातला सर्वश्रेष्ठ साहित्यिक कोण यावर यदाकदाचित जाणकारांमध्ये मतदान घेतले तर तो सन्मान शेक्सपीअरलाच मिळेल याविषयी दुमत व्हायची शक्यता खूप कमी आहे. असे असूनही शेक्सपीअरविषयी मराठीत तुरळक अपवाद वगळता फारसे अभ्यासपूर्ण लेखन उपलब्ध नाही. ही उणीव काही अंशी तरी भरून काढण्याचा हा प्रयत्न अंकाच्या निर्मितीत शेक्सपीअरचे गाढे व्यासंगी व प्रेमी श्री. परशुराम देशपांडे यांनी केलेल्या सहकार्याचा येथे कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावासा वाटतो. (एप्रिल १९९८, शेक्सपीअर विशेषांक)