पान:निवडक अंतर्नाद.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चिरस्मरणाची वचने त्याला कुठून आठवणार ? पुढे ती म्हणते - - • स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा वशहि वशीकरण तुला सहज जादुगारा लाभशील माझा मज केवि जसा होता? पुरुष हा जात्यां बहुगामी असतो. प्रेम हे स्त्रीचे सर्वस्व असते. पण पुरुषाच्या दृष्टीने तो त्याच्या जीवनाचा केवळ एक भाग असतो. स्त्री ही भूमीला चिकटून राहणारी, तिथे स्थैर्य शोधणारी आणि आपल्या प्रेमाचे सातत्य टिकवू बघणारी असते. तर पुरुष आकाशात भरारी मारणाऱ्या, दाही दिशांचा वेध घेऊ बघणाऱ्या पक्ष्यासारखा असतो. पक्ष्याप्रमाणेच कोणतेही बंधन - मग ते प्रेमाचे का असेना, त्याला अल्पावधीतच काचू लागते. पुन्हा आपला प्रियकर तर अत्यंत लाघवी, लडिवाळ आणि स्त्रीमनाला भुरळ घालणाऱ्या, त्याला वश करणाऱ्या अनंत कळा अंगी असणारा जादूगार आहे, याची तिला पूर्ण जाणीव आहे. कारण ती स्वतःही अशीच त्याला सहज वश झाली नव्हती का? मग परदेशी गेल्यानंतर त्याच्या या जादूला इतर स्त्रियाही बळी पडणार नाहीत. कशावरून? ही सारी संभाव्य वस्तुस्थिती तिच्या डोळ्यांपुढे उभी रह्यते आणि मग ती व्याकुळ होऊन म्हणते, 'हे सारे ध्यानी घेतले म्हणजे वाटू लागते, आज तू जसा आहेस तसा माझा, अगदी पूर्ण माझा, तू मला पुन्हा कसा लाभशील?' पण प्रणयिनीला केवळ पुरुषाच्या चंचलपणाचेच भान आहे असे नाही तर एकूण मानवी मनाच्या दुर्बलतेचीही तिला चांगली जाणीव आहे. इंग्रजीमध्ये एक सुंदर वचन आहे. Nature abhors vacuum, निसर्गाला पोकळी मंजूर नाही. वास्तव, भौतिक सृष्टीतली कोणतीही पोकळी निसर्ग जसा लगेच भरून काढतो, त्याप्रमाणे रिते मनही तो पुन्हा परिपूर्ण करतो. मानवी मन हे दुबळे आहे एकनिष्ठेची वचने आज देणारे हृदय अल्पावधीत ती वचने विसरून दुसऱ्या आकर्षणकक्षेत सहज बद्ध होऊ शकते. आज एका स्त्रीवर जिवापाड प्रेम करणारा पुरुष कालांतराने दुसऱ्या स्त्रीवरही तितक्याच उत्कटतेने आपल्या प्रणयभावनेचा वर्षाव करू शकतो. (हीच वस्तुस्थिती स्त्रीच्याही बाबतीत संभवनीय आहे.) यात काहीही अनैसर्गिक नाही किंवा इथे विश्वासघाताचाही प्रश्न येत नाही. काळाचा रेटा जबरदस्त असतो. म्हणूनच आज वियोगदुःखाखाली पार चिरडून गेलेली हृदयेही पुन्हा अंकुरित, पल्लवित होतात! म्हणून या कवितेतली प्रणयिनी आपल्या प्रियकराला दोष देऊ शकत नाही. उलट ती म्हणते स्वत्वाचे भान जिथे गुंतल्या नुरावे झुरणारे हृदय इथे हे कुणी स्मरावे? होईल उपहास खास आस धरू जाता! - उद्या आपला प्रियकर एखाद्या नव्या मोहात गुंतला तर आपले स्वत्वदेखील तो विसरून जाईल आणि जिथे स्वतःचाही विसर पडू शकतो तिथे मागे राहिलेले माझे आशाळभूत, व्यथित, विराने झुरणारे हृदय त्याने कसे स्मरणात ठेवावे? ते तो विसरून गेला तर २६ निवडक अंतर्नाद स्वाभाविकच नाही का? उलट इथे मी त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून, त्याची आशा मनात बाळगून बसले तर माझ्या त्या वेडेपणाबद्दल माझ्या वाट्याला जगाचा उपहास, कुचेष्टाच येण्याचा संभव ! लोक मला खचित हसणार! मीच मूर्ख ठरणार ! शेवटी ती व्याकुळ प्रणयिनी एका अतिरेकी आवेगाने आपल्या प्रियकराला म्हणते - अंतरिची आग तुला जाणवू कशाने? बोलवे न वेदनाच वचन दुःख नेणे या परता दृष्टिआड होऊ नको नाथा! माझ्या हृदयात संशयाची, भयाची, विरहाच्या दुःखाची जी आग भडकली आहे तिची जाणीव तुला कशी देऊ? माझी ही वेदना मूक आहे. माझे दुःख शब्दांना न कळणारे आहे. या साच्या दुःखाशोकाचा भोग मला देऊन तुला माझ्यापासून दूर जायलाच हवे का? त्यापेक्षा नाथा, प्रियतमा तू माझ्या दृष्टीआड झालाच नाहीस तर चालणार नाही का? नको, तू मला सोडून दूर जाऊच नकोस! ज. के. उपाध्ये यांनी आपल्या या कवितेत प्रेमासारख्या चिर- परिचित भावनेचा एक अगदी वेगळा पैलू फार परिणामकारकरीत्या दाखवून दिलेला आहे. प्रेम कितीही उत्कट असले तरी त्याला विस्मरणाचा शाप असतो. ही कविता, विशेषतः तिची पहिली ओळ वाचताना महाकवी कालिदासाच्या 'शाकुन्तल' नाटकाचे स्मरण झाल्यावाचून राहात नाही. दुष्यन्त शकुन्तलेच्या दृष्टीआड गेला • आणि तो तिला विसरला. त्याचे हे विसरणे स्वाभाविक वाटावे म्हणून कालिदासाने आपल्या प्रतिभेने दुर्वासाच्या शापाची नाटकात योजना केली. मूळ महाभारतातील दुष्यन्त अगदी वेगळा आहे त्याला शकुन्तलेशी जडलेला आपला प्रेमसंबंध, आपण तिच्याशी केलेला गान्धर्व विवाह स्पष्ट आठवत आहे. तरीही केवळ लोकनिंदेच्या भयाने तो शकुन्तलेची ओळख नाकारतो. तिला राजसभेतून परत पाठवण्यास सिद्ध होतो. कालिदासाला दुष्यन्ताचे हे निर्घृण वर्तन सहन झाले नाही आणि त्याने दुष्यन्ताचे विस्मरण स्वाभाविक वाटावे म्हणून दुर्वासाच्या शापाची नाटकात योजना केली. यात कालिदासाच्या सहृदयतेची, संवेदनाशील कविमनाची साक्ष पटते. पण त्याबरोबरच हा शाप प्रतिकात्मकही वाटतो. 'दृष्टीआड झाल्यावर सृष्टिही निराळी' हे प्रेमाच्या व्यवहारातले एक कठोर वास्तव आहे. जन्मजन्मान्तरीचे नाते जिथे जोडलेले असते त्या नात्याचाच कालांतराने विसर पडावा ही प्रेमाच्या सृष्टीतली एक विपरीत पण कठोर वस्तुस्थिती आहे. जयकृष्ण केशव उपाध्ये या कवीचे मोठेपण हे की त्याने ही विपरीत वस्तुस्थिती जाणली आणि एका सुंदर कवितेच्या द्वारा ती आपल्या निदर्शनाला आणली! प्रेम अमर असते, चिरंतन असते हे जितके खरे तितकेच ते भंगुर, विस्मरणशील असते हेही खरे. (सप्टेंबर १९९७)