पान:निवडक अंतर्नाद.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आधीपासूनच सुरू होत्या, त्या नंतरही चालूच राहिल्या. बिल्डर कॉन्ट्रॅक्टर, मालक व भाडेकरू या त्रिकोणातील ताणतणावांचा आलेख काढलेली 'एक बंगला बने न्यारा' ही माझी कादंबरी व आधी चौर्यकर्म करणाऱ्या पण नंतर पूर्ण सुधारलेल्या सहृदयी अशोक व्यासचे मी हिंदीतून अनुवादित व संपादित केलेले 'तिळा उघड' हे आत्मकथन अशी दोन पुस्तके मी 'ग्रंथाली' कडे १९९१मध्ये प्रकाशनार्थ दिली. त्या आधी १९६० पासून कादंबऱ्या व कथासंग्रह मिळून माझी १७ पुस्तके प्रसिद्ध झाली होती. पण म्हणून त्याला महत्व न देता गांगलांनी वरील दोन्ही पुस्तकांचा स्वतंत्रपणे विचार केला आणि 'तिळा उघड' व 'एक बंगला बने न्यारा' ही पुस्तके अनुक्रमे सप्टेंबर १९९१ व जानेवारी १९९२ मध्ये 'ग्रंथाली' च्या दर्जाला साजेल अशा प्रकारे प्रसिद्ध केली व त्यांचे वितरणही चांगले झाले. 'एक बंगला बने न्यारा' कादंबरीचे मुखपृष्ठ अपर्णा गांगल यांनी मॉडर्न पण सूचक असे केले होते. या पुस्तकाला ९२-९३चा उत्कृष्ट कादंबरीचा राज्यशासन पुरस्कारही मिळाला. या दोन पुस्तकांच्या संदर्भात माझी गांगलांशी वेळोवेळी जी चर्चा झाली ती माझ्यासाठी अत्यंत मार्गदर्शक व मौलिक ठरली. मी काही वेगळे व विशेष लिहिले तर आधी गांगलांना दाखवायचे, असे मग ठरूनच गेले. गांगलांचा विशेष म्हणजे क्वचित कधी 'राजकारण केले तरी एरवी ते कमालीचे प्रांजळ आहेत. कोणाला दुखवायचे नाहीत, पण रास्त मार्ग सोडून वाकड्या वाटेने कदापि जायचे नाही हे त्यांचे 'स्वाभाविक' व्रत आहे. उपेक्षित अशा दलित लेखकांचे तर गांगल हे तारणहार ठरले. दया पवारांच्या 'बलुतं' चे हस्तलिखित त्यांनी पुन्हा पुन्हा वाचून, त्यावर संस्कार केले व त्याचे पुनर्लेखन करून घेतले. त्यामुळे मराठीला आद्य दलित लेखक लाभला. 'उपरा', 'आयदान', 'उद्ध्वस्त क्षितिज,' 'कोल्हाट्याचे पोर' आणि इतरही अनेक उपेक्षित विषयांवरची पुस्तके 'ग्रंथाली' च्या गांगलांचीच साहाय्यकारी निर्मिती, पारंपरिक प्रकाशन व्यवसायाला छेद देऊन, जास्तीत जास्त पुस्तके, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त गाजावाजा करून पोहोचविण्याची तळमळ, जिद्द आणि व्यावसायिक दृष्टी गांगलांनी दाखविली. सामाजिक जाणीव साहित्यामधून व्यक्त व्हावी, संपूर्णपणे नवे आणि विदारक अनुभव नवोदितांच्या लेखणीतून धीटपणे व थेट बाहेर यावेत, लेखन ही कुणा एका वर्गाची मक्तेदारी राहू नये, यासाठी झुंबड उडवून देऊन 'ग्रंथमोहोळ' नव्या तसेच वेगळ्या वाटेवर नेण्याचे काम त्यांनी केले आणि मानवी जीवनाचा आजपावेतो लपलेला खरा चेहरा पुस्तकांच्या माध्यमातून मराठी साहित्याला दिला. प्रत्येक माणसांच्या अंतरंगात असणारी ऊर्मी प्रत्यक्षात फार वेगळे सांगत असते. गुळगुळीत शब्दांच्या पलीकडील अनुभव अनेकदा बोलीभाषेतूनच प्रकट होतात. ती भाषा ऐकायला ठीक वाटते, पण लिखित वाड्मयात अस्पृश्य ठरविली जाते. गांगलांनी मोठ्या हिमतीने जीवनाचा वास्तव अर्थ दाखविणारे हे २०८ निवडक अंतर्नाद साहित्य 'ग्रंथाली' च्या माध्यमातून वाचकांपर्यंत आणले व त्यातूनच गांगलांमधील अभिजात संवेदनशील संपादकाची ओळख मराठी प्रकाशनाला झाली. अनेकांना लिहिते करणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांना संधी देणाऱ्या गांगलांना नवोदितांचे खरे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक म्हटले जाते ते योग्यच होय. प्रगल्भ मनाचा, कायम माणसांच्या गराड्यात राहणारा, उत्साही, साहित्यप्रेमी आणि उत्तम संघटनकौशल्य असणारा वाड्मयीन संपादक दिनकर हरी गांगल ही त्यांची खरी ओळख. एकूणच ग्रंथप्रसार चळवळीसाठी गांगलांनी जितके रक्त आटवले, जितके केले तितके फार थोड्यांनी केले असावे. तेवढा वेळ व परिश्रम त्यांनी स्वतः ग्रंथलेखन करण्यात खर्ची घातले असते, तर मराठी लेखकांच्या पहिल्या श्रेणीत त्यांचे नाव निश्चित नोंदले गेले असते. पण असंख्यांना मदत करून स्वतः मागे राहण्याची, नामानिराळे राहण्याची भूमिका त्यांनी सतत निभावली व त्यामुळे स्वत: 'दिनकर' असूनही 'प्रकाशाआड राहणारे गांगल अशीच त्यांची ओळख मराठी वाचकांना आहे. त्यांनी वयाची सत्तर वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने ७० गांगल, ३५ ग्रंथाली' या अभिनव नावाने त्यांच्यावरील गौरवग्रंथ प्रसिद्ध झाला, ज्यात त्यांच्या स्नेह्यांनी परिचितांनी गांगलांच्या साहित्यसंवर्धन कार्याविषयी भरभरून लिहिले आहे. मात्र त्यात जवळच्या नव्हेच पण दूरच्या नातलगांपैकीही एकाचाही लेख नाही, पुस्तकाच्या नावात 'ग्रंथाली' हून दुप्पट 'गांगल' असूनही स्वतः त्यांच्यासंबंधीची व्यक्तिगत माहितीही पुस्तकात कमालीची जुजबी आहे. त्यांची २५ नोव्हेंबर १९३९ ही जन्मतारीख, तसेच 'नाना' म्हणून ओळखले जाणाऱ्या त्यांच्या वडिलांचे नाव 'हरी' होते, हेही कोठे आले नाही. मातोश्री व भावंडांबद्दलचा उल्लेख तर दूरच! त्याशिवाय त्या ग्रंथात मुख्य कमतरता जाणवली, ती म्हणजे ज्या दलित साहित्याला गांगलांनी अमर्याद योगदान दिले, आणि त्यातून जे दलित लेखक पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा व मानसन्मानांचे जे धनी झाले, त्यांनी गांगलांचे त्यांच्यावरील ऋण मानल्याचे, व्यक्त केल्याचे दिसत नाही. या गौरवग्रंथात त्यांच्यापैकी क्वचित अपवाद वगळता कोणीही लिहिले नाही. एकूणच कृतज्ञतेचा अभाव, जो आजकाल सर्वत्र आढळतो तो, गांगलांच्याही वाट्याला यावा यात नवल कसले ? पण एक चांगले झाले. पैसा, प्रसिद्धी व प्रतिष्ठा यांपासून सतत दूर पळणाऱ्या गांगलांचा मागोवा घेत एकाहून एक श्रेष्ठ पुरस्कार व सत्कार बऱ्याच उशिराने का होईनात पण त्यांच्याकडे आपण होऊन चालत आले. त्यावरून गांगलांच्या कार्यकर्तृत्वाची जाण व भान महाराष्ट्राला आहे याचे समाधान वाटते. 'तो' दिनकर जसा कायमचा कधी मावळत नाही, तसेच 'या' दिनकराचे वाड्मयीन योगदान कधीच अस्त पावणार नाही. त्यांचा ग्रंथरूप जीवनप्रवास शतकोत्तरही निर्वेधपणे चालू राहावा या शुभेच्छा! (फेब्रुवारी २०१४ )