पान:निवडक अंतर्नाद.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आमदारपदासाठी निवडणूक लढविते आणि त्यातून काय काय घडत जाते, याचे चित्रण या कादंबरीतून प्रकट होत जाते. परंतु यातील मुख्य जाणीव आहे ती एकूण भारतीय समाजाला प्राप्त झालेले पौरुषविहीन रूप प्रकट करण्याची. तसेच, भारतीय माणूस क्रमाने संवेदनाविहीन होत चाललेला आहे, याचीही जाणीव या कादंबरीतून व्यक्त होते. माझ्या दृष्टीने या दोन्ही कादंबऱ्या अनेक अर्थांनी महत्त्वाच्या आहेत. परंतु त्या दुर्लक्षित राहिल्या याची खंत आहेच. आणखी एक दुर्लक्षित राहिलेली माझी कादंबरी म्हणजे 'काळोखाचे पडघम' (पहिली आवृत्ती 'पराभव' या नावाने प्रकाशित). अर्थात या दुर्लक्षित राहिल्या, तरी काही जाणत्या वाचकांनी त्यांची नोंद घेतली आहे. या कादंबऱ्यांनी आणि कथांनी मला विलक्षण आनंद दिलेला आहे. जीवन उन्नत करणाऱ्या जीवनमूल्यांचा मी आविष्कार करू शकलो, हीच माझ्या समाधानाची मोठी बाब आहे. समीक्षालेखनामध्ये मी काही नव्या बाबी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः चळवळींचे साहित्यशास्त्र मांडता येईल का, मांडल्यास ते कसे असेल, याचा शोध मी घेतला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकांना साहित्य हे निरुपद्रवी असते, असे वाटते. मला तसे वाटत नाही. साहित्याचे- ललित साहित्याचे क्षेत्रही भूमिका मांडणारेच असते, अशी माझी धारणा आहे. त्यातूनच साहित्याचे क्षेत्र म्हणजे भूमिकांची रणभूमी असते, हा विचार मी मांडला. या विचाराच्या प्रकाशात प्रबोधने आणि साहित्य, समाजकारण सामाजिक चळवळी आणि साहित्य, राजकारण आणि साहित्य इ. बाबींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्यामध्ये लालित्याबरोबरच 'अन्वयार्थ' महत्त्वाचा असतो, असे माझे ठाम मत आहे. अशी सगळी एक वेगळी मांडणी मी माझ्या समीक्षेतून करण्याचा प्रयत्न केला आहे. या वेगळ्या मांडणीचे एक समाधान निश्चितच आहे. साहित्यातील चळवळींचा अभ्यास करता करता माझ्या असे लक्षात आले, की महाराष्ट्रातील प्रबोधन साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय साहित्याचा नीट अन्वयार्थ लावता येणार नाही. साहित्यातील प्रवाहांचा आणि चळवळींचाही अभ्यास करता येणार नाही. त्यातूनच माझे 'जोतिपर्व' हे पुस्तक आकाराला आले. त्याच्या आता चार पाच आवृत्त्या झाल्या आहेत. अर्थात प्रबोधन चळवळीतून निर्माण झालेल्या साहित्यासंबंधी आणखी खूप लिहिले पाहिजे, लिहावयाचे आहेच. कुठलाही लेखक, लेखक म्हणून एकदम समाधानी होऊन जातो, असे मला वाटत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्याला लिहावे, असेच वाटते. मलाही लिहावयाचे आहे विशेषतः महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेबद्दल लिहावयाचे आहे, तसेच, संतसाहित्याबद्दलही लिहावयाचे आहे. कथा तर लिहावयाच्याच आहेत. एक कादंबरी लिहावयाची आहे. आतापर्यंत राहून गेलेल्या बऱ्याच गोष्टी करावयाच्या आहेत. परंतु, समाजाचे वाचन हळूहळू कमी होत आहे की काय, अशी शंका येऊ लागलेली आहे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी एखादी कविता लिहिली, एखादी कथा लिहिली, की त्याला मोठा प्रतिसाद मिळावयाचा. कदाचित स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या समृद्धीसाठी पूर्वी वाचन ही एकमेव बाब असायची. आज व्यक्तिमत्त्वाच्या समृद्धीसाठी नाही, तर वेळ घालविण्यासाठी, करमणुकीसाठी चोवीस तास दूरदर्शन उपलब्ध आहे. या दूरदर्शनमुळे मुलांचे खेळणे संपले. त्याचे मुलांवरील परिणाम २०६ • निवडक अंतर्नाद जाणवायला लागले आहेत, माणूस कमालीचा एकाकी होत चालला आहे. या एकाकीपणाला दूरदर्शन, इंटरनेट यांसारख्या गोष्टी खतपाणी घालीत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे लोकांचा वेळ प्रवासातच जात आहे. त्यांना वाचायला वेळ तरी कुठे आहे? परंतु असा वेळ काढणे आवश्यक आहे, असे त्यांनाच काही दिवसांनी जाणवायला लागेल. इंग्रजी शाळांचे परिणाम आज आपणांस तेवढे जाणवणार नाहीत. परंतु आणखी २५-३० वर्षांनंतर इंग्रजी माध्यमाचे फार गंभीर परिणाम भारतीय समाजावर होणार आहेत. एक तर, ही सारी मुले आपल्या संस्कृतीपासून, मुळांपासून तुटतील. शिक्षणाचे स्वाभाविक माध्यम हे कधीही मातृभाषाच असू शकते. मातृभाषेमधून विद्यार्थ्यास जेवढे चांगले समजते, तेवढे चांगले दुसऱ्या भाषेतून समजू शकत नाही. ही मुले अर्धी कच्ची राहतात. मुख्य म्हणजे माणूस नेहमी आपल्या मातृभाषेतूनच विचार करीत असतो. विचार मातृभाषेत करावयाचा व तो इंग्रजीतून व्यक्त करावयाचा, यातून ज्ञानाची उपासना होऊ शकत नाही. शालेय वयातच विद्यार्थ्यांची विचारशक्ती विकसित होणे गरजेचे असते. त्यातूनच तो काही निर्मिती करू शकेल. विद्यार्थ्यांना निर्मितीशील बनविणे ही शिक्षणप्रक्रियेतील अत्यंत महत्वाची बाब असते. मातृभाषा हे माध्यम नसेल तर ती निर्मितिशील होणारच नाहीत. त्यांची विचारशक्ती विकसित होणारच नाही. परिणामी आपल्या देशात ज्ञानाची निर्मिती होणार नाही. फार झाले तर, 'अमेरिकन' किंवा 'ब्रिटिश' स्टाइलने इंग्रजी उच्चार करण्यात लोक धन्यता मानतील! ज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची फक्त आवक आज चालू आहे. उद्याही आपल्याकडे नुसतीच आवक होत राहील. आपण ज्ञान आणि तंत्रज्ञान बाहेर देऊ शकू किंवा नाही, याबद्दल मात्र मीतरी साशंक आहे. आज मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्यांना एक न्यूनगंड येतो आहे. त्याला विविध कारणे आहेत. परंतु असा न्यूनगंड येणार नाही, उलट अभिमान वाटेल, अशी परिस्थिती समाजाने आणि शासनाने निर्माण केली पाहिजे. आज इंग्रजी शब्दांचे प्रमाण वाढते आहे आणि मराठी ही काही महत्त्वाची भाषा नाही, असे इथे रोज मुलांच्या मनावर बिंबवले जात आहे. अशा अवस्थेत ही मुले मराठी का बरे वाचतील? खरे म्हणजे ही मुले काहीही वाचत नाहीत. इंग्रजी साहित्य - बालवाड्मय तरी वाचतात का? तर त्याचेही उत्तर नकारार्थीच द्यावे लागते. थोडक्यात, मराठी शाळा नष्ट होणे म्हणजे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला स्वतःच नख लावून घेणे होय. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये उद्याचे मराठी साहित्य कसे असेल, हा खरोखर अवघड प्रश्न आहे. एक मात्र खरे, की प्रत्येक पिढी आपले आपले साहित्य निर्माण करीत असते. ती तिची आंतरिक गरज असते. संस्कृतीच्या प्रारंभापासून साहित्य निर्माण होत आहे, ते आंतरिक गरजेतूनच उद्याही ही गरज असणारच आहे. कागदी पुस्तकांच्याऐवजी संगणकावर वाचता येणारी पुस्तके असतील; पण पुस्तके असतीलच. ती प्राथमिक गरज नसली, तरी सांस्कृतिक गरज असेल. ही गरज भागविताना उद्याचा माणूस विज्ञान, तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या गुंतागुंतीतून स्वत:ची सुटका करून घेण्याची धडपड करेल. अधिक निर्मळ जगण्यासाठी तो शेवटी साहित्याच्याच आश्रयाला येईल. (दिवाळी २०१२)