पान:निवडक अंतर्नाद.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ठेवलेली वाटी उचलली. तिच्यात पारिजातकाची ओंजळभर फुलं होती. ती त्यांनी माझ्या ओंजळीत टाकली. "तुमच्या पाहुणचारासाठी आत्ता माझ्याजवळ काहीच नाही, ही फुलं घ्या, " ते म्हणाले. मी भारावून जाऊन ती फुलं ओंजळीत घेतली. मग हळुवारपणे ती शर्टाच्या खिशात जपून ठेवली आणि त्यांचा निरोप घेतला. मला सोडायला ते जिन्यापर्यंत आले होते. "संध्याकाळी जमलं तर पुरस्कार वितरण सोहळ्याला येतो," म्हणाले, मी त्यांचा हात हातात घेतला, त्यांच्याकडे वळून बघितलं आणि पायऱ्या उतरू लागलो. रस्त्यावर आलो. रिक्षा केली आणि त्यांच्या माझ्यातला संवाद परत एकदा मनातल्या मनात ऐकू लागलो. त्यांच्या एकाकीपणाच्या आणि उपेक्षेच्या शल्यावर फुंकर घालावी असा माझा अनुभवही नव्हता आणि अधिकारही, तरी पण मला त्यांना सांगायचं होतं, की सरदेशमुख, तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका, आमची ही शतखंडित वाड्मयीन अभिरुची कायम कलावादी, जीवनवादी, रूपवादी, देशीवादी, अस्तित्ववादी, स्त्रीवादी, शहरी, ग्रामीण, दलित, ब्राह्मणी, मराठा, डाव्या, उजव्या, प्रतिगामी, पुरोगामी, पारंपरिक, आधुनिक आणि आता उत्तर- आधुनिक अशा अगणित राहुट्यांमध्ये विभागून क्षीण होऊन गेली आहे. तुम्ही लेखक म्हणून यांपैकी कुठल्या राहुटीत आश्रय घेतला होता ? प्रश्न फार महत्त्वाचा आहे सरदेशमुख. तो टाळू नका. या वेगवेगळ्या राहुट्यांमध्ये एखाद्या लेखकाबद्दल त्याच्या एखाद्या कलाकृतीबद्दल कधीतरी एकवाक्यता होती का? बोला, सरदेशमुख, बोला. आता तुम्हीच बघा नं, आजही मराठी सारस्वतात 'ज्ञानदेव तुकाराम' या दोन नावांशिवाय इतर कुठल्या नावावर एकवाक्यता आहे? तिथेही कोणा एकाच्या नावाने भुणभुण आहेच, तर ते शल्य विसरा सरदेशमुख, सरदेशमुख, या छिन्नभिन्न साहित्यिक अभिरुचींच्या लहान- मोठ्या, रंगीबेरंगी तंबूंमध्ये, चित्रविचित्र कनातींमध्ये, 'निष्ठावान' सैनिक दबा धरून बसलेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या पाठीवर 'निष्ठावान संवेदनशीलतेचे भाते लटकत आहेत. या भात्यांमध्ये शत्रूंसाठी फक्त उपेक्षेचे आणि अनुल्लेखाचे जिव्हारी बाण भरलेले आहेत. या बाणांची गंमत म्हणजे ते न मारल्यानेच लागतात, फक्त नेम धरला की झालं. या न मारलेल्या बाणांमुळे मग तुमच्यासारखा कलावंत जिव्हारी जखमी होतो. युरोपमध्ये पुढचा जन्म घेण्याची वांच्छा मनी बाळगतो. पण सरदेशमुख, तुम्हांला म्हणून सांगतो, की मीच नव्हे, तर माझ्यासारखे अनेक वाचक तुमच्या लिखाणावर मनापासून प्रेम करतात. करत राहू, कारण तुमच्या वाड्मयीन आस्थेचे प्रश्न हे शालेय गणिताच्या पाठ्यपुस्तकातल्या उदाहरण-संग्रहासारखे, आपापली तयार उत्तरं सोबत घेऊन आलेले नाहीत. आम्हांला हे माहीत आहे, सरदेशमुख. हे आणि असंच खूप काही मला त्यांना सांगावसं वाटलं होतं, पण माझी वेळ संपत आली होती. शिवाय त्यांच्या वयाचा धाक होताच, मला त्यांना काळजापासून सांगावंसं वाटलं होतं, की सरदेशमुख, पुढच्या जन्मीसुद्धा तुम्ही त्र्यं. वि. सरदेशमुख म्हणून महाराष्ट्रातच जन्माला या, मुंबई-पुण्याला नको, विदर्भ-मराठवाड्यातसुद्धा नको, तर आपल्या हक्काच्या सोलापूर गावीच जन्माला या. तोपर्यंत आमच्यामध्ये आस्थेचे नवे कोंभ फुटलेले असतील आणि वाचक म्हणून आम्ही कदाचित अधिक प्रगल्भ आणि दिलदार झालेले असू पण माझी ही प्रार्थना मनातल्या मनातच राहून गेली. माझा स्वर्गावर विश्वास नाही. पण सरदेशमुखांचा जर असेल तर आज तिथे माझी ही प्रार्थना पोहोचू दे. आज त्या भेटीला वर्षांहून अधिक काळ लोटला. त्यांचा अन् माझा क्वचित टेलिफोनवर संपर्क होता. त्यांचा 'सिद्धार्थ' आणि 'जर्नी टू इस्ट' चा मराठी अनुवाद मला विलक्षण आवडला, मी ते टू सांगायला लगेच त्यांना फोन केला. म्हटलं, "जर हर्मन हेसेची मातृभाषा मराठी असती तर त्यानी तुम्ही वापरलेले शब्दच वापरले असते.” ते खुषीत आले. म्हणाले, "ज्यांनी ज्यांनी हा अनुवाद वाचला त्यांनी त्याची फार तारीफ केली.” आम्ही परत एकदा अनेक पाश्चात्त्य लेखकांवर बोललो. त्यांनी खलील जिब्रानच्या 'द प्रोफेट'चा मराठी अनुवाद केला होता आणि तो त्यांना मला कुरियरने पाठवायचा होता. त्यासाठी त्यांना माझा पोस्टाचा पत्ता हवा होता. मी म्हटलं, "मी तुम्हांला पत्र लिहितो आणि माझा पत्ताही कळवतो.” त्यांच्या 'डांगोरा....' वर मला खूप काहीतरी लिहायचं होतं. जोपर्यंत माणूस सुटासुटा आहे, त्याची नियती सुटीसुटी आहे तोपर्यंत असूया राहील आणि म्हणून तुमच्या 'प्रॉब्लेम ऑफ इव्हिल' चं उत्तर संभवत नाही, असं काहीतरी मला त्यांना सांगायचं होतं. तीन चार महिन्यांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास अचानक त्यांचा मला फोन आला. खूप इकडलं तिकडलं बोलणं झालं. त्यांनी मला आपणहून फोन केल्यामुळे मी जरा भांबावून गेलो होतो, त्यांनी माझी कादंबरी तर दुसऱ्याकडून वाचून घेतली नसणार? माझी छाती धडधडू लागली. पण आमचं बोलणं काही माझ्या कादंबरीवर आलं नाही. मग त्यांना पत्र लिहिण्यासाठी शुभमुहूर्त शोधू लागलो. दिवस घरंगळून जात होते. मग एकदम ते गेल्याची बातमीच ऐकली. मन व्याकूळ झालं. सरदेशमुखांना आपण एका पत्राचं तरी देणं लागतो याची रुखरुख लागून राहिली. त्यांच्या कादंबरीत भेटणाऱ्या रघुवीर सिंह राजासारखे ते मला उमदे, संवेदनशील, कर्तव्यपरायण पण परिस्थितिशरण आणि विकल भासले होते. त्र्यं. वि. सरदेशमुख नावाचा राजा आता आपल्या राज्यातून, आपल्या राजवाड्यातून, आपल्या पार्थिव कुडीला सोडून निघून गेला आहे. त्याचे निर्गमन झाले आहे. त्याची फार रुखरुख लागून राहिली आहे. आजही मला अवचित पारिजातकाचा सुगंध आला, की सोलापूरात भेटलेले सरदेशमुख आठवतात, खिडकीबाहेरचा तो प्रकाश आठवतो आणि मग माझं अवघं अस्तित्व सुवासिक होऊन जातं. (मे २००६) निवडक अंतर्नाद १८९