पान:निवडक अंतर्नाद.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्यांना वाटते. कारण ती त्याची एकट्याची हानी नसून एकूण सांस्कृतिक क्षेत्राचीच हानी आहे जे इतरांना वाटत आले, ते याच्या संवेदनक्षम मनाला कधी जाणवलेच नसेल काय? कोणत्या प्रेरणेला बळी पडून याच्या हातून अशी नकारात्मक कामे घडत असतील? चांगले पाहण्याची व जाणून घेण्याची दृष्टी मंदावल्यामुळे असे होत असेल, की सृजनशक्ती क्षीणबल झाल्यामुळे? आपले अस्तित्व अट्टाहासाने टिच्चून दाखवण्याचा हा प्रकार असावा काय ? तशी भांडणे विकत घेण्याची याची सवय जुनीच आहे लोकांची उणीदुणी काढायची व कारण नसताना आपणहून त्यांच्या अंगावर धावून जाण्याची खोडही नवी नाही. मध्यमवर्गीय कचखाऊ मनाला असे पाहण्याची ही सवय नसते, मग करण्याची हिंमत तर दूरच. लोकांना नको तेव्हा व नको त्याबद्दल दुखवण्याची व वैराची लागवड उत्साहाने करण्याची एखाद्याची आंतरिक गरज असते काय? मी सगळ्यांनाच भले म्हणतो असा त्याचा माझ्यावर आक्षेप आहे. अशी भले म्हणण्याची वृत्ती दुर्बलतेपोटी किंवा भीतीपोटी येत नसते, आत्मविश्वासाच्या अभावी बचावात्मक सावधगिरी म्हणूनही येत नसते, पण दुसऱ्याचे वाईटच तेवढे पाहायचे, तेवढेच लक्षात ठेवायचे, तेवढेच अखंड चघळत बसायचे, या आवडीपोटी नकळत वाईटाचीच उपासना आपल्या हातून घडत असते, त्यापायी दुसऱ्याजवळ जे आणि जेवढे चांगले असेल, ते अजिबात न पाहण्याची कृपणता वाढीस लागते व ते नाकारण्याचे करंटेपण वाट्याला येते. दुसऱ्याचे चांगले ते अव्हेरण्याच्या या सवयीमुळे त्या चांगल्याच्या परिणामांच्या शक्यताही आपण अवरुद्ध करून ठेवीत आहोत, हेही लक्षात येत नाही. त्याचे अलीकडचे गद्यलेखन वाचून माझेही मन गोंधळून जाते. मनात शंका अशा येतात, की हाच का तो आपला मित्र की ज्याने मातृभूमीचे भावोत्कट स्तोत्र गायिले, तिच्या विद्यमान दुरवस्थेबद्दलच्या स्फोटक भावना व्यक्त केल्या ? उभा देश झाला आहे आज बंदिशाळा. इथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला. कसे पुण्य दुदैवी अन् पाप भाग्यशाली ? किंवा - कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली? किंवा आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही न वाली! यांसारख्या काळीज कातरणाऱ्या ओळी लिहिल्या? 'सखी मी मज हरपून बसले ग', 'आज गोकुळात रंग खेळतो हरी', 'मालवून टाक दीप', 'मलमली तारुण्य माझे', 'गीतगंगेच्या तटावर' यांसारखी मन हुरळून यकणारी गीते लिहिली? स्पंदने ज्ञानेश्वरांची माझिया वक्षात व्हावी इंद्रियावाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी अशी मनीषा व्यक्त करणाऱ्या ओळींमधून अभद्र भाषा कशी निघू शकते? प्राजक्ताच्या ओठांनी हळुवारपणे दहिवर चुंबून घ्यावे, अशा अलवार कल्पना प्रसवणाऱ्या मनात विषारी द्वेषाचा अंगार कसा फुलून येतो? ज्ञानेश्वर, तुक्याच्या आकाशगंगेत न्हाऊन आलेल्याने, गालीब- उमरखय्यामने दिलेली पश्मिन्याची शाल पांघरून शिमग्याचे गटार उपसण्यास का प्रवृत्त व्हावे ? खरोखर, हा कविता लिहितो आणि गातो, त्यावेळी तो प्रत्यक्ष परमेश्वराचीच मैफिल भूषवीत असतो. अशा भाग्यशाली प्रतिभावंताला अधूनमधून असे नरकपुरीचे डोहाळे का लागावे? हा कधी काळी ओसाड जागी असेल, वैराण वाराही असेल, पण एकदा बाहूत मधुमास घेतल्यावर ओंगळ पिचकाया यकण्याचा मोह याला का व्हावा ? माणसांच्या मध्यरात्री हिंडणाऱ्या सूर्या आपल्या गीतांना द्वेषाचा जुना आधार असल्याचे ठणकावत अंधाराची स्तोत्रे का आळवावीत? आज आपण जे गीत गातो, ते उद्या सारे जग गाणार असल्याचा उदंड आत्मविश्वास बाळगणाऱ्या सुरेल झंझावाताला माझा हा एकच साधा प्रश्न आहे त्याला लाख नकोत, एकच समाधानकारक उत्तर मिळाले, तरी पुरेसे आहे. परवा तो पुन्हा अचानक दिसला, मला पाहिल्यावर त्याने अपेक्षेप्रमाणे मान फिरवली. मला त्याचे वैषम्य वाटले नाही, आश्चर्य वाटले नाही. पण विलक्षण कीव आली. त्याला सर्वार्थाने समजावून घेणारे एखादे जवळचे माणूस अशा वेळी त्याच्याजवळ असायला हवे, असे बाकी तीव्रतेने वाटले. मला या बाबतीत पुढाकार घेता येणार नाही, हे उघड आहे त्याच्याशी बरोबरीच्या नात्याने बोलू शकणाऱ्या समवयस्क स्थानिक मित्रांनाही पुढाकार घ्यावासा वाटणार नाही. कळवळ्यापोटी केलेल्या या सामंजस्याच्या कृतीतून गैर अर्थ काढून त्याचा अपप्रचार होण्याचीच मित्रांना काळजी वाटते. पण त्याने सतत चालवलेल्या आगीच्या वर्षावातही गतकाळातील काही क्षण मला विसरता आले नाहीत. गेल्या अर्धशतकापासूनची त्याची मैत्री, आपण अमरावतीच्या कॉलेजमध्ये वाड्मय मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असताना अनाहूतपणे येऊन, भर पावसात चिंब भिजत त्याने आपला केलेला एकाकी प्रचार, वेळोवेळी निरपेक्षपणे दिलेल्या रकमेची त्याने ऐन वास्तुशांतीच्या मुहूर्तावर अनपेक्षितपणे केलेली परतफेड, विदर्भ साहित्य संघाबद्दल मन कलुषित असतानाही आपण अध्यक्ष म्हणून निवडून आल्याचा, शंभर रुपयांची मिठाई वाटून त्याने प्रगट केलेला आनंद, मनाविरुद्ध पण केवळ आपल्या दमदाटीपणामुळे त्याने शल्यक्रियेसाठी दाखविलेली सिद्धता - असे काही प्रसंग प्रयत्न केला तरी मला विसरता येणार नाहीत. काळोखामध्ये दिलासा देणाऱ्या तेज किरणांच्या पूजनाची माझी ही वृत्ती अनेकदा निकटवर्तीयांच्या रोषाला पात्र ठरली आहे त्याच्याबद्दल घेतले जाणारे आक्षेप खोटे नाहीत. कारण ते अनुभवावर आधारलेले आहेत. सांभाळू पाहणारे मन व सावरू शकलेले हातही अशा दाहक अनुभवांनी होरपळून निघाले आहेत. पण खुशामतखोरीला वश झालेल्या व बळी पडलेल्या बलदंड बेगुमानाची हतबलता व अगतिकता पाहावी लागणे होरपळण्यापेक्षा कमी दाहक नसते. त्याला परिस्थितीपोटी करावी लागलेली ही तडजोड त्याच्या आत्मसमाधानासाठी पुरेशी असेल. पण हितचिंतकांना ती फारच केविलवाणी वाटते, एवढे मात्र खरे ! (मार्च २०००) निवडक अंतर्नाद १८५