Jump to content

पान:निवडक अंतर्नाद.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तरीपण आपल्या सोनचाफ्याचा कुवारगंध त्यांच्यापर्यंत पोचत असावा या केवळ शक्यतेनेदेखील आपले मन हुरहुरल्यासारखे का व्हावे? आपण गेटमधून आत प्रवेश करताना 'विन्मुख मुलगी सन्मुख झाखेती आपल्याकडेच येणार असावी हे कसे कळावे' या विधानात स्टेटमेंट प्लस काहीतरी असेल का? तथापि 'तुझ्या मनातले मला कसे कळणार?' हा त्यांचा प्रश्न मात्र should be weighed in gold या तोलामोलाचा वाटला आपणाला, नाही का? खरंच, माझ्या मनावर पडलेले तुमच्या व्यक्तिमत्वाचे गारूड तुम्हांला कळणारच नाही कधी! ही तर माझी जादुईउमर अशी आहे, की इथे आभाळ सदैव निळे असते, संध्याकाळी पश्चिमेला रंगांची उतारपेठ असते, पण त्या नंतरची कातरवेळ मात्र बेचैन करणारी असते. मला तर ओंजळीत चेहरा झाकून घ्यावा अशी लाज वाटते. वैभवी खानोलकर येताना मृद्गंध घेऊन आली आणि वळिवानंतरच्या सोनेरी उन्हात चुकार थेंबांच्या ओल्या पावलांनी निघून गेली हे खरे असले, तरी ती अजूनही आपल्या मनात ठाण मांडून बसली आहे असे माधवरावांना वाटले. ....तंग सलवार, कुर्ता तिला नऊवारी सारखाच शोभून दिसला, नाही का? उत्तरीय सावरणारा तिचा फुलपाखरी आविर्भाव भर्जरी पदर वागविणाऱ्या शालीन, चाफेगौर बोटांसारखाच वाटला. तिचे वय हीच एक कविता होती आणि तिचा बिनधास्तपणा हा तिच्या बिलोरी व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार होता. 'आपणाला सुंदर इंग्रजी लिहायला शिकायचं आहे हे सांगण्यात तिचा नेमकेपणाच जाणवला. दुर्बिणीमधून पक्षीनिरीक्षण करीत असताना जाणावणाऱ्या मोहक हालचाली तिच्या व्यक्तिमत्त्वात प्रकाशत होत्या. तिचे वडील माझे स्नेही हे तर खरेच, पण तेवढ्या भांडवलावर भेटणे ह्य तिच्या आत्मविश्वासाचा भाग होता. फ्रेज या शब्दाची तिने सांगितलेली व्याख्या टीव्हीवरील निवेदनासारखी वाटावी यात सारेकाही आले. तीनचार महिन्यात तिला लेखनकलेची ओळख व्हावी. तिचे असणे ही जशी कविता असू शकते, तसेच तिचे वागणे हा निबंधच म्हणायला हवा. या मुलीला घडविण्यात आनंदच आहे. तथापि आपणही स्वत:ला सावरत जबाबदारीनेच वागायला हवे, घरी मुलास शिकवताना असे प्रश्न आले नाहीत. निरांजन उजळताना दीपकळी थरथरते, पण बोटाला चटका बसण्याची ही शक्यता असते. म्हणून तर आपण सावध असायला हवं, कारण कॉलेजमधील आपले रेकॉर्ड अगदीच सोनोपंत दांडेकरी नव्हते. गेले दोनतीन महिने शनिवारी रविवारी वैभवी बिनचूक क्लासला जात राहिली. गृहपाठ ती चोख करून येत असल्यामुळे १६० निवडक अंतर्नाद माधवरावांच्या अपेक्षेप्रमाणे तिची प्रगती त्यांना जाणवत राहिली. रोज पाच शब्द याप्रमाणे मुखोद्गत केलेल्या तीनशे शब्दांची वहीही तिने दाखविली. नकळत अधिक मोकळेपणाने वागत असल्यामुळे ती आपल्या अधिक जवळ येत तर नाही ना, या विचाराने माधवराव बेचैन झाले. आपली तैलबुद्धी वापरून आपणाभोवती नकळत ती एक अदृश्य मायाजाल तर विणत नसेल ना, अशी त्यांना शंका आली. वर्गात तिची गुणवत्ता सिद्ध होत असतानाच नकळत ती एका अनाकलनीय दिशेने इथे ढकलली जात होती. घरातील हिंडत्याफिरत्या पत्नीच्या व्यक्तिमत्त्वाचा अनामिक धाक आपल्या जवळपास वावरत असावा, असे बहुधा त्या दोघांना जाणवत असावे. . शिकविताना केला जाणारा विनोद निखळ होता; पण हसणे चोरटे होते. लिहीत असताना मधूनच तिचे पाहणे अधिक गोमटे होते; तरीपण ते अगदी साळसूदही वायवे. गुरूच्या शब्दोच्चारांचा नाद शिष्येच्या ओठांतून निनाद होऊन बाहेर पडे तिमाही परीक्षेत इंग्रजी विषयात ती पहिली आली. मॅडमनी तिला टेबलाजवळ बोलविले आणि उत्तरपत्रिकेतील तिचा निबंध भरवर्गात वाचून दाखवायला सांगितले. शनिवारी ती माधवरावांना म्हणाली, "अंकल, यस्टरडे आय वॉज ऑन क्लाउड नाइन !" ऑक्टोबर उजाडला. एका रविवारी नऊला वैभवी अशीच नेहमीप्रमाणे आली होती. बागेतली फुलझाडे, वेली वायुलहरीवर शहारत होत्या. वैभवीचा गोरापान, गुबगुबीत हात टेबलावर विसावला होता. तिची निमुळती बोटे गुलाबी होती. तिच्या बोटांनी माधवरावांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्यातील कॉलेजमधील मुलाने तिच्या हातावर आपला ओथंबून आलेला हात टेकवला. एका हातातील ऊब व थरार दुसऱ्या हाताला जाणवला न जाणवला तोच वैभवीने आपला हात झटकन काढून घेतला. तेवढ्यात काकू आल्या आणि चहाचे दोन पेले ठेवून निघून गेल्या. ... त्यांच्यातील सीसीटीव्ही सदैव कार्यरत होता का? कसे घडले हे माधवरावांना कळलेच नाही. नंतर दोघांनीही हसत खेळत चहा घेतला. जणू काहीच घडले नव्हते. एक ढग आला. त्याची सावली भुईंवरून सरकत गेली. मातीखालच्या मातीत हिरवळ शहारली. नंतर पुन्हा ऊबदार ऊन पडले. ढगात वीज होती आणि इंद्रधनुष्याचे स्वप्नही होते. काही वेळाने वैभवी निघून गेली. जाताना तिने बाहेरून गेटचे दार काळजीपूर्वक लावून घेतले, पट्टी अडकविली आणि ती पाठमोरी झाली.