पान:निवडक अंतर्नाद.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्पर्श श्रीरंग विष्णु जोशी "वैभवीचा गोरापान, गुबगुबीत हात टेबलावर विसावला होता. तिची निमुळती बोटे गुलाबी होती. तिच्या बोटांनी माधवरावांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्यातील कॉलेजमधील मुलाने तिच्या हातावर आपला ओथंबून आलेला हात टेकवला. एका हातातील ऊब व थरार दुसऱ्या हाताला जाणवला न जाणवला तोच वैभवीने आपला हात झटकन काढून घेतला.' " सरत्या मे महिन्यातली वळिवाची पहिली सर झाडे, छपरेच नव्हे, तर अवघा आसमंत सुस्नात झालेला. तृप्त वातावरणातून दरवळणारे मातीचे अत्तर इथेतिथे साचलेल्या पाण्यामधून थरथरणारे रेशमी ऊन, टेलिफोनच्या खांबावरील वायरवर एका ओळीत बसलेल्या चिमण्या मैत्रिणी पदरावरचे विविध रंग मोजता यावेत असे बिलोरी इंद्रधनुष्याचे आरस्पानी सप्तरंग वायुलहरीने वेलींच्या पानापानामधून अवचित सांडणारा मोतियाचा चुरा, माधवरावांना घरात बसवेना. निनादत राहणारी चर्चमधील घंटा आणि नंतरचे प्रार्थनेचे घनगंभीर सूर. त्यांनी टीव्ही बंद केला आणि ते बागेत आले. त्यांचे मन मोहरले. पन्नाशीची झुळूकदेखील ते विसरले. त्यांचे गेटकडे लक्ष गेले. बाहेर एक मुलगी उभी होती. काळसर मखमलीची तंग तुमान, पांढराशुभ्र कुर्ता, स्वप्निल उत्तरीय, हसरा चेहरा आणि पाठ झाकून टाकणारे घनदाट केशधन, माधवराव गेट जवळ गेले. त्यांच्या मनात आले; पंधरा सोळा वर्षांची असेल. सुदृढ उंच. विलक्षण पाणीदार टपोरे डोळे. गेटवरील नावाच्या पाटीकडे बघत ती किणकिणली, "आपणच ना?" "होय, या देहाला माधवराव सरपोतदार म्हणतात " मधेच ते थबकले... किती गहिरे भावपूर्ण डोळे! "मी वैभवी खानोलकर कडी काढल्याशिवाय आत कशी येणार मी ?” माधवरावांना हसू आले. मिस्किल आणि लबाड दिसते पोर! त्यांचाही मूड जरा हलकाफुलका बनला. ते म्हणाले, "तुझ्या मनातलं मला कसं कळणार? त्यात तू गेटजवळ पाठमोरी उभी होतीस!” त्यांच्या मनात वाऱ्यावर उडणारे तिचे घनगच्च केस. "विन्मुख मुलगी सन्मुख झाल्याखेरीज ती आपल्याकडेच येणार असावी हे कसे कळावे?" "तुमच्याकडेच आलेय. एक स्कूटरवाला भर्रकन गेला जवळून, म्हणून वळले मी. हे टपोरे हिरो महाइब्लिस! बरं, बाबांचा फोन आला होता का?" १५८ निवडक अंतर्नाद "ओहो, चिंतामणराव खानोलकरांचा ना? डोंबिवली बँकेचे मॅनेजर, बरोबर त्यांची तू मुलगी का!” “तेच. सध्या नोटाबंदीमुळे बाबांना घडीची फुरसत नाही. अहो, त्यांच्या स्वप्नातदेखील माणसांचा क्यूच! खरं तर तेच येणार होते माझ्याबरोबर, ” दोघेही व्हरांड्यात आले. व्हरांड्यात टेबलासमोर एक आणि बाजूला एक अशा दोन खुर्च्या भिंतीला काचेचे पुस्तकांचे कपाट सिलिंगपर्यंत पोचलेले. 'बैस वैभवी, आलोच; इथेच बसू प्रकाश उदंड आहे इथं. आलोच हूं” माधवराव आत गेले. वैभवीने सुरेख रंगविलेला व्हरांडा पाहून घेतला. डाव्या बाजूला भिंतीत सर्व्हिस विंडो. चहा, कॉफी वगैरे किचनमधून देण्यासाठीच्या संपर्क- गवाक्षाची कल्पना तिला विशेष आवडली. पश्चिमेकडील ग्रिलवर जाड काचेचे भक्कम तावदान. अगदी बागेत बसल्यासारखा फील येतोय. माधवराव चष्मा चढवून आले. स्मित करीत म्हणाले, "वैभवी, बोल आता कितवीत आहेस तू?" "दहावीत आहे मी. सुंदर इंग्रजी कसं लिहायचं हे शिकायला तुमच्याकडे आलेय.” "कोणत्या क्लासला जातेस सध्या ?” "द शेक्सपीयर इंग्लिश क्लासेस मी जॉइन केलाय. पण मला नॉनअकॅडॅमिक इंग्रजी शिकायचं आहे.” "पण ते मी कसे शिकविणार ?” "तुम्हीच शिकवाल, अंकल. त्यामुळेच तर तुमचा मुलगा बोर्डात नामवंतांच्या यादीत आला असं म्हणत होते बाबा, " “अग, नामवंत विद्यार्थ्यांची यादी आता बंद झालीय ना? त्याने म्हणे, इतरांच्या भावना दुखवतात!" माधवराव हसत म्हणाले. "तुम्ही तर कमाल करता हं, काका! अहो, प्रसिद्धी बंद झाली तरी सिद्धी उरतेच ना? नथ्थिंग डुइंग! कधीपासून येऊ तेवढं सांगा."