पान:निवडक अंतर्नाद.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तरी माझ्या मनात येईल का?" "मग आज भांडण न काढता एवढी तारीफ ?” "इतकी भांडते का हो मी तुमच्याशी ? असेनही भांडत. दुसरं कोण आहे ज्याच्याशी मी भांडू शकेन? म्हणून साऱ्या जगाशी करायचं भांडण मी तुमच्याशी भांडून घेते. पण सर, तुम्ही कसे असे राहू शकता? मी कितीही भांडले तरी तुमचा आवाज कधी चढलेला मी ऐकला नाही. डिपार्टमेंट, कँपस, आपल्या विषयांच्या सोसायट्या, मंडळं सगळीकडे तुमच्याशी खडूसपणे वागणाऱ्या लोकांशीही तुम्ही प्रेमाने वागता-बोलता, आता सावित्रीमॅडमशीही तुम्ही भांडत असाल असं मला वाटत नाही. जी काही भांडणं असतील ती सर्व एकतर्फीच असणार. " "असं अजिबात नाही. कोणाच्याही बाबतीत मी सुरुवातीला बराच वेळ ऐकून घेतो, समजावून सांगतो, इन अ वे, आय गिव्ह द अदर पर्सन अ लाँग रोप टू हँग हिमसेल्फ ऑर हरसेल्फ, पण कडेलोट झाला तर मीही समोरच्याला चांगलंच सुनावतो, सावित्रीची तर गंमतच आहे. ती उत्तम गृहिणी आणि प्रेमळ आई आहे, हे खरं, पण त्यासोबतच ती किती भयंकर संशयी आणि हेकेखोर आहे हे तुला मी सांगायला नकोच. लग्नानंतर मी तिला कॉन्फरन्सला वगैरे सोबत घेऊन जायचो, पण मला लोकांना भेटण्यात, चर्चेत रस, तर तिला फक्त शॉपिंगमध्ये शिवाय ती मला सतत कॉन्फरन्सला आलेल्या माझ्याशी बोलणाऱ्या बायकांबद्दल विचारत बसे. उदाहरणार्थ, ती म्हणे, 'ती मॉव्ह कलरची शिफॉनची साडी नेसलेली बाई होती बघा, स्लीव्हलेस ब्लाऊजवाली, ती इतका वेळ तुम्हांला काय विचारत होती ?' ह्यावर माझे प्रतिप्रश्न 'कुठे? लेक्चर हॉलमध्ये की जेवताना?' 'लेक्चर हॉलमध्येच हो. तुमच्याशी जेवताना बोलत होती तिची साडी मरून कलरची होती. शिवाय ती फार वेळ बोलली नाही. सोबत तिचा नवरा की बॉयफ्रेंड होता. मी म्हणते आहे ती वेगळीच. तुमच्या लक्षात नाही असं बिलकुल दाखवू नका. तुम्हांला सारं काही व्यवस्थित लक्षात राहतं हे मला माहीत आहे. ' 'माझ्या ह्यावर माझं उत्तर साधारण असं असायचं भाषणानंतर माझ्याशी सुमारे सात-आठ स्त्रिया बोलल्या. त्यातल्या तिघी जणी प्रत्येकी पाच मिनिटांहून जास्त वेळ बोलत होत्या. त्यापैकी किती जणींचे नवरे, बॉयफ्रेंड्स इत्यादी आसपास आहेत ह्याची मला कल्पना नाही व मी तसं त्यांना विचारलंही नाही. एकीने मला विचारलं होतं, की भक्ती संप्रदायातल्या स्त्रियांच्या बंडखोरीबद्दल मला काय वाटतं? दुसरीला लिंगायत व महानुभाव चळवळी जातिअंताच्या दिशेने पुढे का गेल्या नाहीत ह्यावर माझं मत हवं होतं. तिसरीने मला विचारलं, की तुमची बायको तुमच्यावर सतत पाळत ठेवून का असते? तू ह्यांपैकी कोणाबद्दल बोलते आहेस?”” "ग्रेऽऽट! मग काय झालं?" " तिने माझ्यासोबत कॉन्फरन्सला येणं सोडलं. पण मग मला तिथून परतल्यावर तिला सविस्तर रिपोर्टिंग करावं लागे. किती बायका होत्या? त्यात तिच्या माहितीतल्या कोण कोण होत्या? किती जणी सुंदर होत्या? मी ग्रुपसोबत एखाद्या प्रेक्षणीय स्थळी गेलो असेन, तर माझ्याशेजारी कोण बसलं होतं?... मला वैताग यायचा ह्या प्रश्नांचा, पण चिडचिड केली किंवा उत्तरं दिली नाही तर बाईसाहेबांचा पारा आणखी चढायचा. मग ही सिच्युएशनही मी माझ्या पद्धतीने हॅन्डल करायला शिकलो. उदाहरणार्थ - सावू, परवाच्या कॉन्फरन्समध्ये एकूण २५३ डेलिगेट्स आले होते. १६३ पुरुष व ९० बायका, त्यांतल्या सुमारे ३० जणी आपला नवरा, बॉयफ्रेंड किंवा तत्सम पुरुष पात्रासोबत आल्या होत्या. बाकीच्यांना एकतर असं पात्र अजून भेटलं नसावं किंवा त्यांना त्याच्यासोबत जाण्यात इंटरेस्ट नसावा अशी माहिती मला माहीतगार सूत्रांकडून मिळाली.' असं म्हणताच ती एकदम चवताळलीच म्हणून समज, मग मी तिला तिच्या माहितीच्या चार- पाच बायकांची नावं घेऊन त्या तुझी चौकशी करत होत्या व तू नसल्यामुळे त्या किती बोअर झाल्या हे सांगत होत्या असं सांगत बसे. मग गाडी थोडी वळणावर येई. ?? ★ ★ ★ कौसानीला ऑल इंडिया सोशल सायन्सेस कॉन्फरन्स होती. अचानक त्या भागात बर्फाचं वादळ आल्यामुळे वाहतूक कोलमडली, बरेच डेलिगेट्स पोहचू शकले नाहीत, आम्ही मात्र आदल्या सकाळीच पोहोचल्यामुळे वाचलो. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून तिथला सुप्रसिद्ध सूर्योदय पाहायला निघालो तेव्हा हॉटेलच्या लॉबीत आम्हां दोघांशिवाय इतर कोणीही नव्हतं. पहाटेचा गारवा, जवळजवळ निर्मनुष्य रस्ता. हातात हात केव्हा आले कळलंच नाही. शब्दांची गरज नव्हती, त्यांचा अडसरच झाला असता. रस्ता छोटयसा होता. केव्हा संपला ते कळलंच नाही. पॉइंटपाशी आलो, तेव्हा आमच्यासारख्या काही जोड्या उभ्या असलेल्या दिसल्या. एकमेकांना खेटून परस्परांच्या डोळ्यात पाहत आम्ही उभे राहिलो, हातात ह्यत होतेच. हळूहळू सभोवतालची वर्दळ वाढत गेली. खाली दरीतून लोट वर यायला लागले. आम्ही मंत्रमुग्ध होऊन समोर पाहू लागलो. अंधाराचं जाळं हळूहळू विरळ होत गेलं. क्षितिजाच्या भव्य रंगमंचावर एक स्वर्गीय नाट्य आकाराला येत होतं आणि आम्ही स्तिमित होऊन ते पाहत होतो, जगत होतो, भोगत होतो, परस्परांसोबत असण्याचं आणि त्या विराट सृष्टिनाट्याचे नशीबवान प्रेक्षक असल्याचं अशी सारी सुखं एकाच वेळी भोगत होतो. आकाशाचे रंग कैकदा बदलले. धुक्याचा पडदा उचलला गेला आणि अचानक रत्नांच्या राशी ओतल्यासारखी झगमगीत हिमशिखरं दिसू लागली. विस्फारलेल्या पापण्या झुकण्यापूर्वीच धुक्याचा दुसरा पडदा पडला आणि ते दृश्य झाकोळून गेलं. कधी लागोपाठ असे पडदे उचलले जात आणि एकापाठोपाठ एक अशा कितीतरी शिखररांगा लखलखत झळाळत साकार होत. अशी अनेक दृश्यं डोळ्यात मनात साठवत आम्ही हॉटेलवर परतलो. बाकीची मंडळी अजूनही उठली नव्हती. आम्ही ब्रेकफास्ट माझ्या रूमवरच मागवला. निवडक अंतर्नाद १५३ -