पान:निवडक अंतर्नाद.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुटका "इतके दिवस सेवा शुश्रूषा केली त्यांची दोन वर्षांपासून दादा बिछान्यावर पडून आहेत. गेले तीनचार महिने तर सारे विधी अंथरुणातच होताहेत. कलावतीलाच हे सारं करावं लागतं. शेवटी तिच्याही काही शारीरिक मर्यादा आहेत. कुठेतरी तिलाही थोडी विश्रांती हवी आहे. दादा तुझेही वडील आहेत. तुझंही काही कर्तव्य आहेच ना? तेव्हा आता काही काळ तू त्यांना तुझ्याकडे नेलंस तर काय हरकत आहे?” जगन्नाथ घायकुतीला येऊन आपल्या धाकट्या भावाला सांगत होता, हे सांगण्यासाठी त्यानं अशोकला अनेक निरोप पाठवले होते. आज अशोक उगवला होता, जगन्नाथचं तळमळून सांगणं तो निर्विकारपणे ऐकत होता. कलावतीबाई उंबऱ्याच्या आत उभ्या राहून भावाभावांचं हे बोलणं ऐकत होत्या, खरं तर अशोकला हे निक्षून सांगण्यासाठी त्याच वारंवार जगन्नाथला भरीला घालत होत्या. धाकट्या भावाला किती अधिकारवाणीनं ते सांगतात हेच त्यांना पाहायचं होतं. "मी काय सांगितलं, ते ऐकलंस ना?” जगन्नाथनं थोडंसं चिडूनच विचारलं. विचारात पडलेल्या अशोकनं भानावर येऊन जगन्नाथकडे पाहिलं. "ऐकतोयस ना मी काय म्हणतोय ते?" पुन्हा एकदा त्यानं विचारलं. "हो, ऐकतोय ना! संपूर्ण ऐकतोय,” थोड्याशा पडलेल्या आवाजात तो उत्तरला, "नुसतं ऐकून काय उपयोग? नुसतं ऐकवायला निरोप पाठवले नव्हते मी! यावर तू काय करणार आहेस ते मला हवं आहे थोडे दिवस तू आता दादांना घेऊन जा," ठामपणे जगन्नाथ म्हणाला. अशोकनं थोडंसं खाकरून घेतलं; आतून कलावती वहिनीचं लक्ष आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. एक मिनीट गप्प बसून थोड्याशा पडत्या आवाजातच तो बोलला. "तू म्हणतो आहेस ते कळतंय मला. पण माझ्याही काही समस्या आहेत. त्याचा तू विचार केला आहेस काय?” "समस्या कुणाला नसतात? सगळ्यांनाच असतात. आम्हालाही आहेत त्या ! म्हणून का जन्मदात्या बापाला रस्त्यावर सोडायचं? शेवटी त्यांनी तुलाही जन्म दिला आहे, वाढवलं आहे, शिक्षण दिलंय, लग्न करून दिलंय. " आणखी काय बोलावं हे जगन्नाथला कळेना. त्यानं अगतिक होऊन आपल्या पत्नीकडे नजर टाकली. त्या करड्या नजरेनं ठामपणं नवऱ्याकडे पाहत होत्या. "हो! ते खरं आहे. मीही नाकारत नाही ते! माझं कर्तव्य आणि जबाबदारी दोन्हीही मला कळतात. मी नाही कुठे म्हणतो ?” अशोक उत्तरला, "हे बघ, नुसते मुद्दे मान्य करून चालत नाही. त्यावर कृती काय करणार हे महत्त्वाचं आहे. दादांना तू तुझ्याकडे कधी घेऊन जाणार आहेस ते मला हवं आहे. आणि आपण त्याबद्दलच बोलू.' " "तेच सांगतोय मी माझा फ्लॅट केवढा आहे, ठाऊकच आहे तुला! वन बेडरूम किचन आहे. एका बेडरूममध्ये आम्ही असतो. दोन्ही मुलं बाहेरच्या छोट्या हॉलमधे असतात. मग दादांना नेऊन किचनमध्ये का ठेवायचं?" थोड्याशा त्राग्यानं तो बोलला. "आम्हीही कुठे एखाद्या राजवाड्यात नाही राहात आहोत! इथेही प्रश्न आहेत, समस्या आहेत. पण त्या साऱ्यांना तोंड देत सांभाळलंच ना त्यांना इतके दिवस ? तुलाही काही रस्ता काढावा लागेल, " जगन्नाथ तिरीमिरीतच बोलला. “आता बोलू नये, पण वेळच आली म्हणून बोलतोय. दादांचं हे घर नाही म्हटलं तरी माझ्या घेतलेल्या फ्लॅटपेक्षा केवढं तरी मोठं आहे आणि ते तू सारं घेतलेलं आहेस. मी त्याबद्दल आजवर काही बोललो नाही. आता हे सारं घेतो आहेस, तर त्यांची जबाबदारी थोडीफार घेतलीस तर बिघडलं कुठं?" अगदी धैर्य करून अशोक बोलला, त्याची बायको नेहमी त्याच्या कानीकपाळी जे व्यवहारज्ञान ओतत होती, ते एकदाचं त्यानं आपल्या भावासमोर ओतलं. "छान! म्हणजे या घरात मी राहतो आहे, म्हणून दादांची सारी जबाबदारी माझ्यावर टाकून तू मोकळा होतो आहेस, असंच आम्ही समजायचं का?” "मला अगदीच तसं म्हणायचं नाही; पण माझीही अडचण तू समजावून घेतली पाहिजेस. शिवाय माझी पत्नी नोकरीला आहे. आम्ही दोघेही नोकरी करतो म्हणून तो फ्लॅट मी घेऊ शकलो. दोघेही नोकरीला गेल्यावर दादांना बघणार कोण?" अगदी साळसूदपणे अशोक म्हणाला. त्या जुन्या घराच्या बाहेरच्या छोट्याशा हॉलमध्ये त्यांची ही चर्चा चालू होती. हॉल कसला, ती एक छोटीशी खोलीच होती! बाजूला एका छोट्याशा कॉटवर विनायकराव पडूनच होते. त्यांना काही कळतं का, बोललेलं काही समजतं का, हेही कळत नव्हतं. डॉक्टर येऊन पाहून जात. 'शेवटचे काही मोजकेच दिवस राहिले आहेत विनायकरावांचे,' असं डॉक्टर सांगून जातील या आशेवर जगन्नाथ आणि कलावती दिवस काढत होते; पण डॉक्टर त्यांना तपासून नुसता सुस्कारा सोडत नवनवीन औषधं लिहून देत. बरं आपण तरी डॉक्टरांना कसं विचारायचं ते कधी जातील म्हणून? ही जगन्नाथपुढची समस्या होती. या प्रश्नातून कसं बाहेर पडायचं या प्रयत्नात ते नवरा बायको दोघंही होते आणि अशोक त्यांना दाद देत नव्हता. एवढ्यात विनायकरावांना खोकल्याची उबळ आली. कलावतीबाई लगबगीनं बाहेरच्या खोलीत आल्या नॅपकीननं त्यांनी विनायकरावांचं तोंड पुसलं. फुलपात्रातील थोडंसं पाणी चमच्यानं त्यांच्या तोंडात सोडलं आणि पुन्हा एकदा त्यांचं तोंड पुसून त्या आतल्या खोलीत गेल्या. निवडक अंतर्नाद १३३