पान:निर्माणपर्व.pdf/198

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यंदा दोन ऑक्टोबरपूर्वी निवड झालेल्या सर्व १ लाख ६० हजार कुटुंबांना जगण्याची साधने पुरविण्यासाठी शासन वचनबद्ध आहे व पुढील वर्षी पुन्हा इतकीच कुटुंबे निवडण्याचे व त्यांना साधने पुरविण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आलेले आहे. 'गांधीजी के दरिद्र नारायण की सेवा के आदर्श से प्रेरित यह योजना राज्य के प्रत्येक गाँव मे प्रतिवर्षी सबसे गरीब ५ परिवारों की सहायता करने के उद्देश्य से बनाई गई है।' प्रतिवर्षी प्रत्येक गावातील गरिबांतील गरीब कुटुंबे निवडीत निवडीत ही योजना अखेरच्या टप्प्यापर्यंत नेण्याची शासनाची कल्पना आहे व सध्या तरी शासन याबद्दल खूपच आशावादी आहे.
 सुमारे ८० हजार अन्त्योदयी परिवारांना जगण्याची जी साधने आतापावेतो पुरविली गेली त्यांची विभागणी अशी आहे-

 जमीन      २६,३६६
 कर्जरूपाने मदत २४,५७५
 रोजगार ५,५४१
 वृद्ध-निवृत्ति-वेतन २३,१५१
 इतर १,८०९
_________
 एकूण परिवार संख्या ८१,४४२

 याशिवाय हातमाग, शिवणयंत्रे, बैलगाडी किंवा उंटगाडी, मेंढीपालन, चर्मोद्योग इत्यादी साधनांच्या रूपानेही मदत पोचविण्याची योजनेत तरतूद आहे.

 प्रत्यक्षात आजमितीस यांपैकी किती कुटुंबांच्या हातात साधने नक्की पोचली हा संशोधनाचा विषय आहे. २-४ दिवसांत हे संशोधन करू म्हटले तरी अशक्य आहे. विशेषतः वृद्धवेतन - निवृत्तिवेतन याबाबतीत वस्तुस्थिती आणि सरकारी आकडेवारी यांत फार अंतर नसावे.कारण यात योजनेने लाल फितीला वाव ठेवलेला नाही. निवड झालेल्या वृद्ध-निराधार कुटुंबियाला यासाठी जयपूरला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे घालण्याचीही आवश्यकता नाही. चाळीस रुपयांचे वृद्धवेतन-निवृत्तिवेतन अशा निवडल्या गेलल्या कुटुंबियाला म. ऑ. ने घरपोच मिळण्याची व्यवस्था आहे. जमीन वा इतर साधने पुरविण्याचे काम फार किचकट व वेळ खाणारे असते असा सर्व ठिकाणचा अनुभव आहे. राजस्थान सरकार संकल्प आणि सिद्धी यातील ही नेहमीची दरी किती लवकर भरून काढते तेवढाच प्रश्न आहे. अचरोलला ४/५ अन्त्योदयी परिवार निवडले गेले आहेत असे कळले. म्हणून एकाची भेट घेतली. ती नुकतीच विधवा झालेली एक स्त्री होती, ८।१० वर्षांचा मुलगा शाळेत शिकणारा होता. तिने शिवणयंत्राची मागणी केली होती, पण अद्याप शिवणयंत्र तिला मिळालेले नव्हते. येत्या ८।१५ दिवसात ते मिळेल असे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी सर्वांदेखत तिला आश्वासन दिले.

-१३
मुक्काम जयपूर, राजस्थान । १९७