Jump to content

पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुस्तक वाचनप्रक्रियेविषयी बरीच शास्त्रीय व संशोधित माहिती देते. माणसाच्या वाचनाचे स्वरूप एकसारखे नसते, ते स्वभावपरत्वे बदलत असते. छंद, मनोरंजन, अभ्यासव्यासंग, फावल्या वेळेचे साधन, साधना अशी वाचनाची अनेक रूपे आहे. सर्वसामान्य माणूस वाचनाकडे फावल्या वेळेचे साधन म्हणून किंवा एक छंद म्हणून पाहताना दिसतो. परंतु ही गोष्ट एवढ्यापुरती सीमित नाही, ती अजून बरेच काही आहे. त्याविषयी या पुस्तकात पुष्कळ आले आहे. वाचन शब्दाच्या उत्पत्तीपासून अर्थापर्यंत आणि व्याख्यांचाही विस्ताराने विचार येथे करण्यात आलेला आहे. वाचनाचा मूलगामी विचार करणारे जगभरातील विचारवंत-अभ्यासक वाचनाकडे कोणत्या नजरेने पाहतात, हे त्यांनी केलेल्या व्याख्यांवरून दिसून येते. वास्तविक अभ्यासकांमध्ये वाचन प्रक्रियेविषयी मतभिन्नता दिसून येते. ही मतभिन्नता अभ्यासण्यासाठी वाचनाविषयीच्या काही व्याख्या पुरेशा आहेत. त्या येथे देण्यात आलेल्या आहेत. वाचन ही अंतिमतः ज्ञानप्राप्तीसाठीची आणि आकलनाची पद्धत आहे. आपले शब्दज्ञान, भाषाज्ञान, जाणिवांचा विकास, समजविस्तार आणि एकूणच व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. त्यासाठी वाचन हा परिपाठ किंवा कर्मकांड करून चालणार नाही; तर वाचन एक सायास, सहेतुक कृती असल्याचे सांगायला डॉ.लवटे विसरत नाहीत. वाचनाचे स्वरूप बहुव्याप्त आहे. त्यामुळेच वाचनाच्या अनुषंगाने अनेक उक्ती, सुभाषिते, सुविचार, घोषवाक्ये वाचनव्यवहाराशी संबंधित दिसतात. त्यापैकी काही प्रसिद्ध लेखकांचे, विचारवंतांचे विचार लेखकाने उद्धृत केले आहेत. हे सर्व विचार वाचनप्रक्रिया समजून घेण्यासाठी खूप आवश्यक आहेत. वाचन ही एक कृती, वाचन एक कला आणि वाचन एक विज्ञान या मुद्यांच्या आधाराने वाचन या संकल्पनेची व्याप्ती विश्लेषिली आहे. त्यानंतर वाचनाच्या विविध उद्देशांची चर्चा केली आहे. हे उद्देश वाचल्यानंतर वाचनातून मिळणाच्या अनेक गोष्टींची ओळख होते. शब्द, शब्दार्थ, आकलनात पडणारी भर, भाषिक सौंदर्याची अनुभूती, भाषिक कौशल्यांचा वापर आणि तिथे घडणारी भाषिक पातळीवरची सर्जनशीलता, साहित्याभिरुचीचा विकास, संवाद, संपर्कविकास, कल्पनासामर्थ्य, भावसाक्षरता, आत्मभानविकास असे वाचनातून होणारे फायदे शास्त्रीय पद्धतीने विशद केले आहेत. । वाचनप्रक्रिया ही वाचनविषयक कौशल्यावर निर्धारित राहते. त्यामुळे वाचनप्रक्रिया काय असते, वाचनाचे टप्पे कोणते आणि वाचनाची कौशल्यं कोणती- या प्रश्नांची चर्चा या पुस्तकातून मुळातून समजून घेण्यासारखी वाचन/१६८