गोपाळरावांच्या सुंदर व मुद्देसूद साक्षीनें त्यांची वाहवा झाली! हिंदुस्थानांतील त्यांच्या मित्रांचा आनंद गगनात मावेना!! रानड्यांसही समाधान झालें!!! नवीन पुढारी आपणांस लाभला असें जनतेस वाटू लागले. हा आपले पांग फेडील असे दुःखी कष्टी भूमातेस वाटलें असावें. अशा प्रकारें गोखले आनंदांत होते, त्यांचे मित्र त्यांच्या गळ्यांत यशाची माळ घालण्यास इकडे उत्सुक होते, परंतु विधिघटना होती वेगळीच!
जगांत अशी गंमत आहे कीं, ज्या वेळेस दुःखाचा मागमूसही नसतो. सुखसमाधानांत लोक पोहत असतात, अशा वेळेस एकाएकीं सर्व स्थिति पालटून जाते. काळेकुट्ट ढग जमतात; आकाशांतील चंद्रमा लोपून जातो; सोसाट्याचा झंझावात वाहू लागतो; मेघांच्या गडगडाटानें कानठळ्या बसून जातात; विजेचा लखलखाट होतो आणि दरएक क्षणीं वाटते हा विजेचा गोळा कोठे तरी पडणार; या प्रचंड वादळाने गांवच्या- गांव उध्वस्त होणार; आणि असे उत्पात आपण अगदी शांत आणि प्रसन्न वातावरण असतांना पाहतों. तसेंच गोखल्यांच्या बाबतींत झालें. पायसांत मिठाचा खडा पडला. एकंदरीत दैवाला सर्व चांगले पहावत नाहीं हें खरें!
गोपाळराव इंग्लंडमध्ये गेले, परंतु मागें इकडे पुण्यांत हलकल्लोळ माजला. नवीन रोगाची साथ आली. मुंबई, पुणे, नाशिक, धारवाड, बेळगांव या महाराष्ट्रांतील बहुतेक सर्व ठिकाणी ग्रांथिक संन्निपातानें- प्लेगने हलकल्लोळ माजविला. हजारों लोक मृत्युमुखी पडले. कुटुंबेच्या कुटुंबे बसली. लोक अगदी हवालदिल झाले. कधीं कोणाच्या प्राणांवर बेतेल याचा नेम नव्हता. सरकारने या नवीन रोगाचा वेळींच प्रतिरोध करावा या सद्धेतूनें, त्याचें उच्चाटण व्हावे म्हणून शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानें लस टोचण्याचा जालीम उपाय शोधून काढला. रोग नवीन आणि त्यावर पसंत केलेला उपायही नवीन लोकांस टोचून घेण्याची कल्पनाच सहन होईना. याशिवाय जो कोणी या रोगाने पछाडला असेल त्याच्या आईबापांचे, भावाबहिणीचें म्हणणें, केविलवाणें रडणें, आरडणें. यांपैकी कशासही न जुमानतां त्याची क्वारंटाईनमध्ये रवानगी होई.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/९४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
गोखल्यांची वाहवा.