डल्विच् कॉलेजमध्ये ते गेले. तेथे अर्धा दिवस मोठ्या मजेत गेला. फराळ करतांना प्रिन्सिपालना प्रश्नांवर प्रश्न विचारून गोपाळराव भंडावून सोडीत. नंतर बेडफर्ड या मुलींच्या कॉलेजांत ते गेले. तेथें एक पार्शी बाई शिक्षकीण होत्या. मुलींच्या शिक्षणाबद्दल त्यांनी माहिती करून घेतली. केंब्रिज येथे या वेळेस परांजपे होते, त्यांस भेटण्यास गोखले अर्थातच विसरले नाहींत. सर वुइल्यम हन्टर या प्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञासही ते भेटले.
शिक्षणाच्या काँग्रेसमध्ये स्त्रियांच्या शाखेपुढे त्यांनी हिंदुस्तानांतील स्त्रीशिक्षण हा निबंध वाचला. या निबंधांतील पहिल्याच अधिकरणांतील एक वाक्य फार गोड व मार्मिक आहे. हिंदुस्तान पिकले फळ होतें आणि इतर राष्ट्र कच्चीं फळें होतीं. "Time, however, which brings ripeness to the raw fruit brings also decay to the ripe one and the country which was once the cradle and long the home of a noble religion, a noble philosophy, science and art of every kind, is at the present day steeped in ignorance and superstition and all the moral helplessness which comes of such darkness." नंतर शिक्षणाचा इतिहास सांगितला आहे; मिशनरींचे प्रयत्न वर्णिले आहेत; हिंदुस्तानांतील सध्यांच्या शिक्षणाचे शेकडा प्रमाण मुलांमुलींत किती आहे तें सर्व आंकडे देऊन दाखविले आहे. स्त्रीशिक्षणास हिंदुस्तानांत होणारा विरोध दिवसेंदिवस कसा कमी होत आहे आणि हिंदुस्तानांतील शिक्षण विशेष उपयुक्त अगर मताची वाढ करणारें नसून केवळ डोक्यांत कोंबले जाणारे कसे आहे हेंही त्यांनी विशद करून या निबंधांत दाखविलें आहे.
अशा रीतीनें इंग्लंडमध्ये इतर कामे चालली होती. आतां ते दुसऱ्या एका मित्राकडे राहण्याची सोय झाल्यामुळे वाच्छांकडून निघून गेले. नंतर इंग्लंडमध्ये ज्या कामासाठीं ते मुख्यत्वेकरून आले होते तें काम आलें. तें काम त्यांनी उत्तम प्रकारें पार पाडलें. त्यांची उलट तपासणी कसून घेण्यांत आली, परंतु गोपाळराव कचरले नाहीत; डगमगले नाहीत. त्यांची तयारी पूर्ण असल्यामुळे त्यांची त्रेधा तिरपीटही उडाली नाहीं.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/९२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
हिंदुस्तानातील स्त्रीशिक्षणावर निबंध.