Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
गोखल्यांचें राष्ट्रीय सभेतील पहिले भाषण.

स्थिति इतउत्तर नसल्यामुळे हा कर रद्द व्हावा, यावर गोपाळराव बोलले होते. हें भाषण सर्वांस आवडले. गोखले अद्याप लहान- २४ वर्षांचे होते. राजकारणाच्या क्षितिजावर हा नवीन तेजोमय तारा उदय पावत आहे- हा पुढे मोठा मुत्सद्दी होईल असे उद्गार त्यांच्यासंबंधी ऐकण्यांत येऊ लागले. गोपाळरावांसही धन्यता वाटली. हळूहळू गोपाळराव देशाच्या कारभारांत लक्ष घालूं लागले. १८९१ च्या नागपूरच्या सभेतही त्यांनी भाषण केलें. जें काय आपणांस बोलावयाचे असेल तें आधीं समर्पक लिहून काढून मगच ते बोलत. जबाबदारपणे काम करण्यास प्रथम अशीच शिस्त लावून घ्यावी लागते. गोपाळरावांस ही शिस्त उत्तम लागली आणि ती त्यांनी शेवटपर्यंत पाळली. भाषा कशी असावी, विचार कसे असावे याचाही रानड्यांजवळ त्यांनी अभ्यास केलाच होता.
 आयर्लंड वगैरे देशांनी आपआपल्या पुनरुज्जीवनार्थ अंगीकारिलेले मार्ग हिंदुस्थानांत शक्य नाहीत- अडवणूक येथें चालणार नाहीं. करतांच येणार नाहीं. देशांत नाना प्रकारचे, नाना पंथांचे, नाना धर्माचे, नाना मतांचे व नाना संस्कृतींचे लोक आहेत. आपला देश म्हणजे लहानसें खंड आहे. आयर्लंडसारख्या चिमुकल्या एकजिनसी निर्भेळ राष्ट्रांत जे शक्य होत नाहीं तें या अफाट देशांत सुतरां अशक्य आहे असें रानड्यांचे मत होतें. आपल्या लोकांस अद्याप नवीन राज्यपद्धति समजलीही नाहीं. परिस्थितीचं ज्ञान नाहीं. ज्यांच्याशीं आपणांस झगडावयाचे ते प्रबळांतील प्रबळ राष्ट्र. एक चतुर्थांश जग आज त्यांच्या सत्तेखालीं. तेव्हां बंडाचे, अत्याचाराचे मार्ग मनांत आणूं तरी ते आत्मघातकीच ठरणार. या सरकारशीं त्याच्याच शस्त्रांनी लढले पाहिजे. त्याच्याच पद्धतीनें आंकडे मांडून, परिस्थिति समजावून देऊन, लोकांस सुशिक्षित करून, जागे करून, त्यांस वळण देऊन, त्यांचें मत सरकारास पटवून देऊन, सरकारला त्याची चूक दाखवावयाची आणि ही चूक सुधारा असे सर्व जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर सरकारास सुचवावयाचें. आपण विचार करीत करीत, स्वतःची सुधारणा करीत करीत, लोकांस शिक्षण देत देत, सरकारजवळ मागावयाचें आणि मागत असतां सुधारणा चालू ठेवावयाची. लोकांस एकदम क्षुब्ध करून काय होणार? लोकांत जोम