Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमच्यापुढे येण्याचे कारण निरनिराळ्या पुस्तकांना ग्रंथकारांनीं लिहिलेल्या प्रस्तावना होत, आम्ही तर असें म्हणतों कीं, प्रत्येक प्रकाशकानें पुस्तकाबद्दल ठरलेल्या अटी त्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीबरोबर प्रसिद्ध कराव्या म्हणजे मागाहून वकिलांची भर करण्याचें कारण पडणार नाहीं.
 सदर चरित्राला सुप्रसिद्ध वाङ्मयभक्त प्रो. दत्तो वामन पोतदार यांनी प्रस्तावना लिहून आम्हांस ऋणी केल्याबद्दल आम्ही त्यांचे फार आभारी आहों. या चरित्रांत घालण्यास लेख लिहून दिल्याबद्दल रानडे चरित्राचे लेखक श्रीयुत न. र. फाटक यांचे किती व कसे आभार मानावे हें आम्हांस कळत नाही. उत्तरोत्तर उपरिनिर्दिष्ट उभय वाङ्मयभक्तांनीं नवीन नवीन प्रकाशनकार्य अंगावर घेण्यास उत्तेजन देऊन आम्हांस ऋणी करावे अशी आमची त्यांस विनंति आहे. या चरित्रांत घातलेले सूचीपत्र इतिहासभक्त श्रीयुत आबा चांदोरकर यांनी तयार केले आहे. या पुस्तकाचीं मुद्रितें येथील 'टिळक राष्ट्रीय पाठशाळे'चे मुख्य अध्यापक खादीभक्त रा. रा. वा. वि. साठे, वाङ्मयविशारद, यांनी तपासली असून प्रत्येक पानाला हेडिंग देण्याचें श्रेयही त्यांनाच आहे. ह्या उभयतांचे आम्ही आभारी आहों. पुस्तकांत घातलेला नामदारांचा फोटो व हस्ताक्षर आर्यभूषणचे चालक श्रीयुत वामनरावजी पटवर्धन व व्यवस्थापक केशवरावजी बाळ यांनी आम्हांस दिल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानण्यास आम्हांला फार आनंद होत आहे. या चरित्राला योग्य तो आश्रय देऊन आम्हांस पुढील चरित्रे प्रसिद्ध करण्यास लोकांनी उत्तेजन द्यावे अशी विनंति करून आम्ही हे चार शब्द पुरे करतों.

विश्वनाथ गणेश ताम्हनकर.

ता. २७-२-२५.