Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


विहंगावलोकन.

ले. (श्री. न. र. फाटक बी. ए.)


 ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचें निधन होऊन आज दहा वर्षे लोटली. या अवधींत आणखी कित्येक लोकाग्रणी दिवंगत झाले. त्यांतल्या एकाचें चरित्र-वाङ्मन महाराष्ट्रामध्यें बरेंच बाहेर पडलें, परंतु गोखल्यांचें विस्तृत व ज्यामध्ये त्यांच्या अनेकविध कतृत्वासंबंधीं संकलित माहिती दिलेली आहे असे एकही चरित्र आजवर प्रसिद्ध झालें नव्हतें. गोखल्यांची महाराष्ट्रीयांनी लिहिलेली इंग्रजी, मराठी दोन्ही मिळून चार संक्षिप्त चरित्रें उपलब्ध आहेत. त्यांमध्ये चरित्रनायकाच्या चरित्राची रूपरेषा पहावयास सांपडते. याच लहान लहान पुस्तकांनी इतके दिवस जिज्ञासूंचे समाधान केलें आहे. मराठीप्रमाणेच अन्य प्रांतांत व अन्य भाषांमध्ये गोखल्यांचीं बरीच चरित्रे आहेत. ज्या वर्षी गोखले इहलोक सोडून गेले त्या वर्षातच यांतल्या पुष्कळ चरित्र पुस्तकांचा अवतार झाला असून त्यांच्याच खपानुसार आवृत्या निघाल्याची उदाहरणे आहेत. परंतु त्यापेक्षां जास्त मोठ्या प्रमाणावर या बाबतीत झालेला पहिला प्रयत्न म्हणजे रा. साने यांनी लिहिलेलं प्रस्तुत चरित्र होय. रा. साने यांचे याविषयीं अभिनंदन करणें अवश्य आहेच, पण त्यापेक्षां जास्त अभिनंदनाला खरोखर या पुस्तकाचे प्रकाशक रा. ताम्हनकर हेच पात्र होत, असे एकदर परिस्थिति लक्षांत घेतल्यास प्रत्येकाला कबूल करावे लागेल. त्यांनी मनावर घेतलें नसतें तर हें चरित्र इतक्या लवकर प्रसिद्धीस येण्याचा संभव नव्हता.
 या चरित्रासंबंधांत पहिली ध्यानांत ठेवण्यासारखी गोष्ट ती ही कीं, आजवर इतकें विस्तृत चरित्र मराठीत झालेले नाहीं. टिळकांचीं लहान मोठीं बरींच चरित्रे असल्याने त्यांची बाजू समजण्याचें साधन लोकांपुढे आहे. गोखल्यांच्या चरित्राची बाजू मसजण्याचें साधन उपलब्ध नव्हते, ही उणीव कांही अंशी रा. साने यांनी भरून काढली आहे व त्याबद्दल सत्यान्वेषी तरुण पिढीकडून त्यांना निःसंशय धन्यवाद मिळतील. प्रयत्नशील पुरुष चिकाटीच्या