Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४
जें सनदशीर तें सर्वच शहाणपणाचें अगर जरुरीचें नसतें !

करणें या गोष्टीपासून तों थेट कर न देणें या गोष्टीपर्यंत सर्व कांहीं सनदशीर आहे. कर न देणें हें कायदेशीर आहे असें या व्याख्यानांत गोखल्यांनी स्पष्टच म्हटले आहे. परंतु त्यांचें एक म्हणणें असें कीं- 'Everything that was constitutional was not necessarily wise and expedient'- म्हणजे जें जें सनदशीर आहे तें तें सर्व शहाणपणाचे किंवा आज जरुरीचें आहे असें नाहीं, आम्हांस अमुक द्या असे सरकारला सांगण्यापेक्षां प्रथम या सर्व कल्पनांचा जनतेंत फैलावा केला पाहिजे. आपल्या मागें सर्व जनता उभी आहे असे सरकारास समजले पाहिजे म्हणजे मग आपल्या न्याय्य आकांक्षा सरकार अगदींच लाथाडील असें नाहीं.
 सरकारी शिक्षणसंस्थांवर बहिष्कार घालणे हेही घातुक आहे असें त्यांनी अलाहाबाद येथें स्पष्ट सांगितलें, "The building up of National Schools and Colleges all over the country out of private resources, on any scale worth speaking about, would take years and years of time and a tremendous amount of sacrifice on the part of the people and before anything substantial had been done, to talk of boycotting existing institutions was sheer madness." स्वार्थत्याग लोकोत्तर असला पाहिजे. लोकांत स्वार्थत्याग कितपत आहे हें अजमावण्यासाठी करबंदीचा जालीम उपाय सुरू करून पहा असे गोखल्यांनी या भाषणांत सुचविलें. कारण हा मार्ग सुचविल्यावर प्रत्येकावर जबाबदारी येईल आणि टाळाटाळीस वाव राहणार नाहीं. लोकांची तयारी जर दिसणार नाहीं तर इतर गोष्टींनी- शाळांवर बहिष्कार, कोर्टावर बहिष्कार, असल्या क्षुल्लक बहिष्कारांनी कांहीं एक होणार नाही. त्यांनी या आपल्या स्मरणीय व्याख्यानांत सरतेशेवटी मोठ्या कळकळीनें सांगितले, 'आपसांतील भेदभाव आतां विसरा व एक व्हा. क्षुल्लक गोष्टीसाठी रक्तपातावर जाऊं नका. जो स्वदेशीचें व्रत आचरतो, जो स्वार्थत्याग दाखवितो, जो देशाची राजकीय, औद्योगिक, सामाजिक कोणत्या तरी रीतीनें उन्नति व एकीकरण करण्याचा प्रयत्न करितो तो देशप्रेमी समजा- तो देशभक्त आहे असें समजा,