Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व चिरस्थाई होतात व समाजाची प्रगति फार झपाटयानें व निश्चयानें होते. मानवी प्रगतीच्या दरबारांत विचारस्रष्टे आणि कार्यकर्ते या दोघांनाहि सर्वोच्च स्थानें दिली पाहिजेत हें जरी खरे आहे तरी त्यांतल्या त्यांत विचारस्रष्ट्यांचा मान उजव्या बाजूस बसण्याचा आणि कार्यकर्त्यांचा मान डाव्या बाजूस असण्याचा आहे, हा फरक ध्यानांत ठेविला पाहिजे.
 याप्रमाणे विचार केला तर नामदार गोपाळराव गोखले हे विचारस्रष्ट्यांच्या उच्च कोटींत बसवितां येत नाहींत. त्यांचे गुरु रानडे यांचे ठायीं पहिल्या कोटीची म्हणजे विचारी कोटीची कला निःसंशय होती. तशीच चमक सुप्रसिद्ध आंकडेशास्त्री व महापंडित कै. रा. ब. गणेश व्यंकटेश जोशी यांचे ठिकाणीं होती. रानडे व जोशी या दोघांचाहि निकट सहवास गोपाळराव यांस लाभला होता व त्याचा त्यांनी भरपूर उपयोग करून घेऊन आपली लायकी वाढविली. कॉलेजांतले गोपाळरावांचें अध्यापन किंवा पुढे उदयकालांतील कौन्सिलांतील लोक सेवा हीं पाहतां त्यांत सूक्ष्म अभ्यास, दीर्घ दृष्टि, नेमस्तपणा, मुद्देसूदपणा, सफाईदारपणा, भारदस्तपणा आणि मधुरपणा इत्यादि पुष्कळ प्रशंसनीय गुण दिसले तरी विचारांची अभिनवता किंवा कल्पकता हें भरारीचे गुण आढळत नाहींत. आणि म्हणूनच गोखल्यांचे लिहिणें, बोलणें कधींहि 'आर्ष' (क्लासिक) कोटींत पडणार नाहीं. परवां (ता. १९/२/२५) डॉ. मेक्निकल् यांनींहि गोपाळरावांना 'ऋषि' कोटीत दाखल केलें नाहीं त्याचें मर्म हेंच होय. सीअर, द्रष्टा किंवा ऋषि ह्या कोटीची छटा रानड्यांत होती ती शिष्यांत उतरली नाहीं. शिष्याचा सर्व काळ 'धकाधकीच्या मामल्यांत'च गेला.
 या धकाधकीच्या मामल्यांत मात्र गोपाळरावांची कामगिरी स्पृहणीय झाली. त्यांच्या मोठेपणाचे बीज सर्व यांतच आहे. वयाच्या विशीच्या आंत पदवीधर होऊन वयाच्या पन्नाशीच्या आंत परकीय सरकाराच्या दरबारी प्रजापक्षाचा खंदा वीर म्हणून त्या सरकारची आदब संभाळून तडाखे देत देत त्याजकडूनहि 'धन्य धन्य' असें उद्गार वदविणें ही कामगिरी असामान्य कोटीतली आहे यांत संदेह नाहीं.
 ही अपूर्व कामगिरी गोपाळरावांनी ज्या गुणांचे जोरावर बजाविली ते