Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२
पुणें म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष गोखले.

कौन्सिलच्या बैठकीचें दरवर्षाचें काम त्यांना करावे लागलेच, परंतु त्याबरोबर कित्येक नवीन कामें उत्पन्न झालीं होतीं. या वर्षी त्यांस पुणे म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष निवडण्यांत आलें. तेथेही त्यांनीं पुष्कळ सुधारणा केल्या. इंग्लंडांत चालू असलेलें जें इंडिया पत्र त्याला हिंदुस्तानांत वर्गणीदार मिळवून देण्याचे काम त्यांनीं आपल्या शिरावर घेतलें होते. रानडे यांच्या स्मारकासाठीं फंड गोळा करावयाचा होता. याच सुमारास म्हणजे १२ जून १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाज स्थापन केला. या समाजाचे जे पहिले सभासद होणार होते त्यांचा शपथविधि या दिवशीं झाला. या समाजाची घटना कशी असावी, कायदे, नियम कोणते असावे याची वाटाघाट पुढे दोन वर्षांनी करण्यांत आली. सध्यां मनांत जी कल्पना घोळत होती तिला त्यांनी थोडे मूर्त स्वरूप देण्याचा उपक्रम केला. परंतु या सर्व कामांपेक्षां एक जास्त जबाबदारीचें काम त्यांच्यावर सोपविण्यांत आलें. तें म्हणजे इंग्लंडमध्ये शिष्टमंडळांत जावयाचें.

बंगालची फाळणी व गोखल्यांची
विलायतेतील शिष्टाई.

 १९०४ सालच्या काँग्रेसच्या वेळीं वेडरबर्न साहेबांनी मोठ्या कळकळीनें सांगितलें होतें कीं, प्रत्येक प्रांतानें दोन दोन प्रतिनिधि किंवा एकेक तरी इंग्लंडमध्यें हिंदुस्तानची बाजू मांडण्यासाठी पाठवावा. १९०५ साल उजाडलें आणि हिंदुस्तानांतही नवीन युग निर्माण झालें. या नवीन युगाचें- नवीन क्रांतीचें सम्यक् स्वरूप लक्षांत येण्यासाठीं आपण जरा आजूबाजूसही पाहिलें पाहिजे.
 आशियांतील राष्ट्रांसंबंधी एकोणिसाव्या शतकांत युरोपांतील राष्ट्रांची अशी समजूत झाली होती की, आशियांतील राष्ट्रे म्हणजे निर्माल्यवत्. त्यांच्यावर गोऱ्या लोकांचेंच स्वामित्व राहणार. गोऱ्या राष्ट्रांची इभ्रत, त्यांचे शास्त्रीय ज्ञान, त्यांचे व्यापारांतील प्रभुत्व आणि या प्रभुत्वामुळें प्राप्त झालेली संपत्ति, या सर्व समन्वयामुळे युरोपांतील राष्ट्रांस स्वर्ग चार