वडिलांचें धोतर गोपाळरावांनींही जपून ठेवले होते. आईविषयीं गोपाळरावांस फारच आदर व भक्ति वाटे. ज्या वाड्यांत आई निवर्तली त्या भाटवडेकरांच्या वाड्यांत गोखले जेव्हां जेव्हां जात, तेव्हां तेव्हां आपल्या आईच्या मृत्यूच्या खोलींत जाऊन ते साष्टांग नमस्कार घालीत. केवढी ही मातृभक्ति! अशी मातृभक्ति अलीकडे किती विवाहित तरुणांमध्ये असते? वडील माणसांबद्दल आदर त्यांच्या मनांत फार असे आणि अलीकडे दुर्मिळ होणारा हा गुण गोपाळरावांमध्ये मरेपर्यंत होता.
१९०० मध्यें गोपाळरावांचें द्वितीय कुटुंब निवर्तलें. संसारांतील जबरदस्त ओढा नाहींसा झाला. तोडावयास कठिण अशी ग्रंथि आपोआप तुटली. संसारामधील माया आपण सोडूं म्हणतां सोडतां येत नाहीं. समर्थांचे 'चपलपण मनाचें मोडितां मोडवेना! कठिण स्वजन-माया तोडितां तोडवेना" हे शब्द किती सत्य आहेत! गोपाळरावांनीं मेथांस पत्र लिहिलें त्या वेळेस त्यांची पत्नी इहलोक सोडून गेली होती. त्यांचे गुरु रानडे मृत्युशय्येवर होते. अशा प्रसंगी गोपाळरावांच्या मनांत कोणते विचार खेळत होते! गोपालकृष्णाने यशोदेला ज्याप्रमाणें विश्वरूप- दर्शन घडविलें त्याप्रमाणे येथे या गोपाळकृष्णाला रानडे, आगरकर यांच्या सहवासानें विश्व दिसूं लागलें होतें. छोटा संसार डोळ्यांपुढे न येतां देशाचा संसार दिसूं लागला. आपलीच मुलें डोळ्यांसमोर न खेळतां देशांतील अजाण मुलें खेळू लागली. देशासाठीं शेष आयुष्य घालवावें, फकिरी पतकरावी असें ते मनांत म्हणूं लागले. फर्ग्युसन कॉलेजमधील मुदतही संपत आली होती. कॉलेजमधून तीस रुपयांचें पेन्शन मिळणार होतें आणि गणिताच्या पुस्तकाबद्दल त्यांस महिना १००-१२५ रुपये मिळत असत. या पैशावर त्यांचे व कुटुंबांतील मंडळीचे भागणार होतें. तेव्हां तीही कटकट नव्हती. मेथांच्या राजीनाम्यामुळे १८९७ पासून मनांत येणारे विचार बळावले. निःसंगत्वाची त्यांनी तयारी केली आणि लंबकाप्रमाणें आशानिराशांच्या लाटांवर मन हेलकावत असतां त्यांनी फेरोजशहांस पत्र लिहिलें.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/११४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
द्वितीय कुटुंबाचा मृत्यु.