पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पहिले


रंगेल तोच तगेल


 'मी कसा झालो?' हा प्रश्न प्रत्येक मातापित्याला आपल्या मुलाकडून कधी ना कधी ऐकावा लागतोच. काहीजण प्रश्न टाळतात, काहीजण थापा मारतात, काही थोडे पद्धतशीर उत्तर देतात. आईबापांनी उत्तर दिले नाही, तरी यथावकाश निर- निराळ्या मार्गांनी मुलांचे शंकासमाधान होत असतेच. स्वतःच्या जन्माबद्दल जितकी सार्वत्रिक उत्सुकता असते, तितकी नसली तरी बऱ्याच प्रमाणात माणसाला 'हे विश्व कसे जन्माला आले ? पृथ्वी कशी घडली ? जीव कसे निर्माण झाले ? ' या आणि अशा प्रश्नांबद्दल कुतूहल असते. म्हणूनच की काय, माणसाच्या जीवनाबद्दल सम्यक् विचार मांडणाऱ्या प्राचीन धर्मग्रंथांनी अशा प्रश्नांची खरीखोटी उत्तरे अगदी ठामपणे देण्याचा प्रयत्न केला आहे.
 हिंदूंच्या अवतार कल्पनेमधली मत्स्य - कूर्म - वराह वगैरे यादी पाहिली तर असे वाटते, की यात उत्क्रांतीची धूसर कल्पना गर्भित असावी. पृथ्वीवर जीव प्रथम पाण्यात