पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/67

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


मग मी चक्क मूक-बधिर मुलांना शिकवायचा कोर्स केला. बिनपगारी रजा घेतली; पण ठरवून टाकलं की, सचिनला शिकवायचं... बोलतं करायचं. हट्ट आणि प्रतिसाद यात दरी होती; पण चढत, चालत राहिलो.
 या धडपडीत एक गोष्ट लक्षात आली की, मुक्यांच्या शाळेत ठेवलं तर, सचिन मुकाच राहणार. म्हणून मी भाग्यश्रीताईंच्या सल्ल्यानं शाळा बदलली. त्याला चेंबूरच्या श्री नारायण आचार्य विद्यालयात घातलं. दरम्यान माझी बदली अलिबागला झाली. मी सचिनला नागठाण्याच्या पेट्रोकेमिकल स्कूलमध्ये घातलं. तिथं तो पाचवीपर्यंत शिकला. सचिननं माझी उमेद वाढवली. तो पास होत गेला. तसा मला विश्वास आला... माझा आत्मविश्वास वाढला; पण नोकरी... बदली, ड्यूटी या सर्वांतून सचिनला शिकवणं, सांभाळणं, शाळेला नेणं-आणणं... त्यातले कष्ट, ताप कुणाच्याच वाट्याला येऊ नये... एकदा तर सचिनची टेस्ट होती. माझी नेमकी ड्यूटी त्याच वेळी लागली. ड्रायव्हिंगची.. मी मोठ्या साहेबांना विनंती केली. त्यांनी परवानगी दिली. त्यांच्याकडे गेलो म्हणून खालचा साहेब खट्ट... मला सचिनशिवाय काही दिसायचं नाही... सहका-याला विश्वासात घेऊन मस्टरवर सही करून मारली दांडी... टेस्ट करून येतो, तर बरॉकीत महाभारत... त्या ड्रायव्हरनं केला अॅक्सिडेंट, ड्यूटी माझी रेकॉर्डवर. ३५ सेक्शनखाली मला नोटीस शिवाय सायबाची सुभाषितं ऐकायला लागली ती वेगळीच.
 त्या दिवशी मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन गावी आलो. सात हजारांचा पगार सतराशे पेन्शनीवर आला. उपाशी राहीन; पण सचिनला शिकवीन, असं मी सचिनसमोर सायबाला चैलेंज केलं. परतताना सचिन मला अडखळत म्हणाला, “बाबा... मी... साहेबच होणार...' त्याच्या या वाक्यानं मी भरून पावलो; पण स्वप्न आणि सत्यातलं अंतर मी रोजच कापत आल्यानं मी जमिनीवरचे माझे पाय कधी अधांतरी होऊन दिले नाहीत...
 सर, असं करत सचिन एस.एस.सी. झालाय... कोणीच कॉलेजमध्ये त्याला घेत नाही... तुम्ही घ्याल असं अनेकांनी सांगितलं... तुमच्या ओट्यात सचिनला घालायला आणलाय... नाही म्हणू नका सर... घर, शेत विकतो हवं तर... काही कमी पडू देणार नाही.

 सचिनला घेण्या न घेण्याचा प्रश्न नव्हता. प्रश्न होता हॉस्टेलची सोय. त्याचं एकदम शहरात येणं... कॉलेजचं हाय-फाय वातावरण... कॉलेजच्या

दुःखहरण/६६