Jump to content

पान:दानशूर महाराजा सयाजीराव.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 लोककल्याणार्थ कार्य करणाऱ्या अनेक पिढ्या घडण्याचे कार्य नामांकित संस्थांतून घडते, हे त्यांनी ओळखले होते. म्हणून महाराजांनी अशा संस्थांना मदत केली. यामध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालय, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन- पुणे, फर्ग्युसन महाविद्यालय- पुणे, शिवाजी शिक्षण संस्था पुणे अशा शैक्षणिक, सामाजिक आणि इतर क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक संस्थांचा समावेश होता. महाराजांनी ज्या संस्थांना मदत केली, त्या संस्थांमधून लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. या संस्थांच्या माध्यमातून अनेकांना मदत झाली. या केलेल्या मदतीमुळे सयाजीराव महाराज हे आधुनिक भारताचे शिल्पकार ठरतात. समाजसेवेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना महाराजांनी सर्व प्रकारची मदत केली. ही मदत अनेक वेळा व्यक्तिगत पातळीवरील असली तरी मदत घेणारी व्यक्ती समाजासाठी कार्य करत असल्याने ती मदत महाराजांनी मुक्तहस्ते केली. यामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, पंडित मदनमोहन मालवीय, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर वि.रा. शिंदे, धोंडो केशव कर्वे या आणि त्या काळातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व इतर क्षेत्रांतील लोकांचा समावेश होता. अशा समाजधुरीणांना मदत केल्यामुळे त्या व्यक्तींनी सुधारणांचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

दानशूर महाराजा सयाजीराव / २३