Jump to content

पान:दानशूर महाराजा सयाजीराव.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

अनेक हुजूरहुकूम काढले. त्यानुसार 'प्रत्येक बाबतीत काटकसर होऊ लागली. त्यामुळे 'यथा राजा तथा प्रजा' या म्हणीप्रमाणे महाराजांच्या कुटुंबातील सदस्य आणि अधिकारी वर्ग यांनासुद्धा बचतीची सवय लागली.
राजवाड्यातील काटकसर
 महाराजांची राजवाड्यातील काटकसरीची काही उदाहरणे पाहिली म्हणजे महाराज राज्याच्या खर्चाबाबत किती दक्ष होते, हे समजेल. यामध्ये सर्वप्रथम त्यांनी खाजगी खर्चात कपात केली. राजवाड्यात होणारे अवास्तव खर्च कमी केले. महाराजांच्या दत्तक मातोश्री महाराणी जमनाबाई यांना विडा खाण्याची सवय होती. यासाठी राजवाड्यात दररोज दोन शेर चुना मागवण्यात येई. तसेच राजवाड्यात जेवण करणारी माणसे आठ होती; परंतु जेवणानंतर त्यांच्या मुखशुद्धीसाठी दोन डझन सफरचंदे मागवावी लागत. महाराजांच्या चाणाक्ष नजरेतून या बाबी सुटल्या नाहीत; परंतु अशा खर्चावर ताबडतोब नियंत्रण आणणे शक्य नव्हते. अशा वेळी त्यांनी महाराणी जमनाबाई यांना समजावून सांगितले. अशा अवास्तव बाबी टप्प्याटप्प्याने कमी केल्या. अशा बाबींवर नियंत्रण आणताच राजवाड्यातील रूढी व परंपरांना चिकटून राहणाऱ्या आणि परंपरावादी विचारसरणीच्या नातेवाइकांनी तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. त्या वेळी महाराजांनी त्यांना कधी सबुरीने, तर कधी नियमाने नवे धोरण आणि योजना यांचा स्वीकार करण्यास भाग पाडले.

दानशूर महाराजा सयाजीराव /13