Jump to content

पान:दानशूर महाराजा सयाजीराव.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराजांनी याबाबत अधिकारी आणि नोकरांना तारतम्याने वागण्याच्या सूचना दिल्या. अशा प्रकारचा अवास्तव खर्च त्यांनी राज्यकारभाराच्या प्रारंभीच कमी केला. समाजातील प्रत्येकाने व्यवहार करताना काटकसर केली पाहिजे, याबाबत महाराज नेहमीच आग्रही होते. महाराज प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वतःपासूनच करत. यामुळे इतरांना- विशेषतः राजवाड्यातील नातेवाईक आणि संस्थानातील अधिकाऱ्यांना मनात नसतानासुद्धा तिचा स्वीकार करावा लागत असे.
 राजवाड्यात महाराज, महाराणी आणि कुटुंबातील इतरांच्या सेवेत खूप सेवक असत. हा आकडा साधारणपणे चारशेच्या आसपास होता. त्यामुळे विशेषत: महाराजांची सोय न होता गैरसोयच अधिक होत असे. कोणावरही एका कामाची जबाबदारी नसे, त्यामुळे प्रत्येक जण काम दुसऱ्यावर ढकलून रिकामा होत असे. महाराजांच्या चाणाक्ष नजरेतून ही बाब सुटली नाही. कामाच्या आणि केवळ हुजरेगिरी करणाऱ्या सेवकांना त्यांनी दुसऱ्या खात्यात वर्ग केले किंवा कामावरून कमी केले. चारशे नोकरांचा आकडा जवळजवळ चाळीसवर आणला. त्याचप्रमाणे देशांतर्गत प्रवास करताना आणि परदेश केवळ दिखाऊपणा व डामडौलासाठी खूप मोठा लवाजमा त्यांच्या सोबत असे. ही बाब त्यांच्या लक्षात येताच हाही लवाजमा कमी केला. महाराजांनी प्रत्येक नोकराची जबाबदारी निश्चित केली. त्यामुळे अमुक एका अव्यवस्थेला कोण कारणीभूत आहे याबाबत लगेचच 'खुलासा होत असे. राजवाड्यातील अनेक लोकांची आणि खात्यांची

दानशूर महाराजा सयाजीराव / ११