पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुलांमुलींना पाठ करण्याकरिता
तुकारामाचे निवडक अभंग अथवा “बालगाथा."


 "'ज्या"'स तुकारामाचा एकादा अर्धा अभंग येत नाही, असा महाराष्टांत
 मनुष्य सांपडणें नाहीं. सर्व जातींच्या व दर्जाच्या महाराष्ट्रीयांना हा
 कवि अत्यंत प्रिय आहे. पंढरीचे वारकरी तर ज्ञानोबा तुकाराम
या नामांचा घोष अहर्निशीं करितांना आपण पहातो. तुकारामाची अभंगवाणी ही
त्यांचे धर्मजीवन होय. अशा या महाराष्ट्रीय भगवद्भक्ताच्या उपदेशामृताचा मुलां-
मुलींना लाभ घडावा ह्मणून त्याची अभंगाची गाथा मंथन करून ही उत्तमोत्तम व
अत्यंत बोधपर अशी ३५१ अभंगांची बालगाथा तयार केली आहे. मातृप्रेम,
आईबापांची योग्यता, गुरु, अभ्यास, प्रेम, नम्रता, दया, क्षमा, शांति, गर्व, वैर, लाज,
पोट, शरीर, आशा, नीति, संगति, एकान्त, मन, चित्तशुद्धि, आत्मस्थिति, बोलणे व
आचरण, भूतांच्याठायीं ईश्वर, संत, दुर्जन, ढोंगी लोक, दृष्टान्तपर व उपदेशपर अभंग,
श्रद्धा, देवाच्या ठायीं विश्वास, भक्तिज्ञान व भक्ति, अनन्य भक्ति, करुणापर, स्वतः
विषयीं, अशी अभंगांची विषयवारी मांडणी केली असून शिवाय अत्यंत बोधपर असे
१०० वेचे दिले आहेत. ठिकठिकाणीं टीपा देऊन शेवटी कठिण अभंगांचे स्पष्टीकरण
व कोश दिले आहेत, आरंभी तुकारामाचे चित्र व चरित्र ही जोडिलीं आहेत.

 शाळांतून नीतिशिक्षणाकरितां व धर्मशिक्षणाकरितां या पुस्तकाचा प्रवेश झाल्यास
उत्तम. परंतु तो योग जुळून येणे कठिण असल्यामुळे गृहशिक्षणांतच असल्या पुस्त-
कांचा अवश्य समावेश झाला पाहिजे. मुलांमुलींना धर्मशिक्षण मिळत नाही, ही ओरड
फार जुनी आहे. तसेच सर्वमान्य अशीं धर्मशिक्षणाची पुस्तके मुलांमुलींकरितां लिहि-
लेली नाहींत. ही उणीव अंशतः तरी या पुस्तकानें दूर होईल अशी आशा आहे.
राष्ट्रीय शील बनविण्याच्या कामी अशा पुस्तकांचा जितका उपयोग होईल तितका
कशाचाही होणार नाही.'

 मुलांमुलींकडून लहानपणी पाठांतर करविण्याची पूर्वीची रीत एकेपरी फार चांगली
होती. पूर्ववयांत पाठांतर लवकर होते आणि पुढे त्याची विस्मृति सहसा पडत नाहीं.
भावी वर्तनावर त्याचा सुपरिणाम होतोच होतो. नाटकांतील अश्लील गाण्यांची पुस्तकें
मुलांमुलींच्या हाती पडून त्यांचा सदैव घोष करतांना आपण त्यांना पहातो. अशा
अनिष्ट गोष्टी बंद करून वडील मंडळी त्यांना अशी पुस्तके मुद्दाम विकत घेऊन देतील,
ती त्यांना शिकवतील, समजावून सांगतील तर त्यांचे मुलांवर किती बरे उपकार
होतील ? प्रौढ स्त्रीपुरुषांना तसेच लेखक, वक्ते, हरिदास, पुराणिक ह्यांनाही या पुस्तका-
पासून बराच उपयोग होईल. किंमत पांच आणे; टपाल खर्च अर्धा आणा.

***गोविंद शंकर वावीकर
झावबाची वाडी,चाळ नं. ३८,ठाकुरद्वार,पोष्ट नं.२,मुंबई

-

-----विजय छापखाना - गिरगाव, मुंबई-----