पान:तीन तत्वज्ञानी.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जॉर्ज बार्क्ले

सर्व कांहीं चिन्मय आहे, कारण जड वस्तु ही मानवी मनाच्या संवेदना होत.

 पण या सिद्धांतावर एक जबरदस्त आक्षेप येतो तो हा की, बाह्य वस्तु व सृष्टि ही संवेदनांसारखी क्षणिक ठरते. संवेदना अनुभवण्यास मनुष्य नसला की जग नाही असे यावरून सिद्ध होते. आपण निजलों की जग नाहीसे झाले या दृष्टीने 'आप गई डुब गई दुनिया' ही म्हण खरी ठरते. व ज्या वेळी जगावर मानवी प्राणी नव्हते तेव्हां जग नव्हते, असेहि या दृष्टीने निष्पन्न होते. या आक्षेपाच्या निराकरणांत बार्क्ले, परमेश्वरविषयक तत्व पुढे येते. मनुष्य पहात नसला, मानवी मन विनाश पावले तरी बाह्य सृष्टि विनाश पावत नाही. कारण अविनाशी व शाश्वत असा परमेश्वर आहेच. तेव्हां मनुष्य जरी निजला असला तरी जग नाहीसे होत नाही. कारण परमेश्वर सदा पाहत आहे. कारण बाह्य वस्तु जर संवेदनासमुदाय होत तर कोणत्या तरी मनाच्या, परमेश्वरी किंवा मानवी, संवेदना सतत चालूच आहेत. तेव्हां बार्क्लेच्या मतें बाह्य सृष्टि म्हणून कांही एक स्वतंत्र तत्त्व नाही. ते सर्वस्वी परमेश्वरावर अवलंबून आहे. परमेश्वर शाश्वत व अविनाशी आहे म्हणून सृष्टि ही शाश्वत व अविनाशी आहे. कारण सृष्टि ही परमेश्वराची संवेदनाच आहे, तेव्हां जगात दोन चिन्मय तत्वे आहेत एक परमेश्वर किंवा परमात्मा व दुसरें मनुष्य किंवा जीवात्मे. मनुष्याचे सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे, या संवेदना अन्वर्थक किंवा सूचक आहेत. म्हणजे एका प्रकारच्या सवेदनांवरून दुसऱ्या प्रकारच्या संवेदनांचे अनुमान करता येते. ज्याप्रमाणे वस्तूच्या रंगाच्या आकृतीवरून वस्तूचे अंतर आपल्याला कळते, त्याचप्रमाणे एका प्रकारच्या संवेदनांवरून दुसऱ्या प्रकारच्या संवेदनांचा आपल्याला अंदाज करता येतो. सृष्ठीचे ज्ञान म्हणजे या संवेदनांच्या सूचकत्वाचे ज्ञान होय. हे ज्ञान मनुष्याला अनुभवाने व संवईने येते. अमक्या संवेदनांचा अमुकच अर्थ कां याला काहीएक कारण देतां येत नाही. तसा आपला अनुभव आहे इतकेच आपल्याला म्हणतां येते.

७५